तभा वृत्तसेवा
वर्धा,
Ramdas Tadas : आ. पंकज भोयर यांनी विकासाच्या बाबतीत राजकीय भेद व जातीपातीचे राजकारण केले नाही. सेलू तालुक्यातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी निधी दिला. 10 वर्षांपुर्वीची गावांची स्थिती व आताची परिस्थिती यामध्ये मोठा बदल दिसून येतो. हे केवळ आ. भोयर यांच्या प्रयत्नामुळे शक्य झाले. काँग्रेसने सेलू तालुक्याच्या विकासाला कधीच महत्त्व दिले नाही. सेलूच्या विकासाला गती द्यायची असेल तर आ. पंकज भोयर यांना पुन्हा विधानसभेत पाठवा, असे आवाहन माजी खा. रामदास तडस यांनी केले.
महायुती भाजपाचे उमेदवार डॉ. पंकज भोयर यांच्या प्रचारार्थ आज 13 रोजी घोराड, हिंगणी, केळझर, सेलडोह येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. याप्रसंगी अशोक कलोडे, अशोक मुडे, जयश्री खोडे, दामिनी डेकाटे, ज्योती घंगारे, मिलिंद भेंडे, विनोद लाखे, तारा तेलरांधे, रामनारायण पाठक, आदींची उपस्थिती होती.
तडस पुढे म्हणाले की, विदर्भाची पंढरी असलेले घोराड विकासापासून वंचित होते. आ. भोयर यांनी विविध योजनांच्या माध्यमातून निधी देऊन गावात विकासाची अनेक कामे केली आहे. हिंगणीत प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे अशी अनेक वर्षांची मागणी होती. मात्र, ती मागणी कोणीच पुर्ण करू शकले नाही. आ. भोयर याला अपवाद ठरले. त्यांच्या प्रयत्नामुळे हिंगणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची वास्तू आज उभी झाली. येथे उपचार सुरू झाले. अशी वास्तू जिल्ह्यातील एकाही आरोग्य केंद्राची नाही. यावरूनच विकासाबाबत ते किती सजग आहे, हे दिसून येते. केळझर येथील सिद्धी विनायक मंदिर, पीर बाबा टेकडी, बौद्ध तपोभमीच्या विकासासाठी त्यांनी कोट्यवधीचा निधी दिला. सर्व धर्म व समाजासाठी त्यांनी कार्य केले आहे. केळझर येथे पाणीपुरवठा योजना त्यांच्यामुळे उभी झाली. सेलू शहराचा देखील त्यांनी काया पालट केला असल्याचे माजी खासदार तडस म्हणाले.
आ. डॉ. पंकज भोयर यांनी विकासाचे चक्र अबाधित ठेवण्यासाठी मतदारांना आशीर्वाद मागितले.