तभा वृत्तसेवा
आर्वी,
Supriya Sule : शेतकर्यांना वार्यावर सोडून भ्रष्टाचारांना थारा देण्याच काम, इडीचा धाक दाखवुन पक्षाची फोडफाडी करण्याच काम भाजपाचं आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. त्यासाठी मयूरा काळे यांना विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
महाविकास आघाडीच्या उमेदवार मयूरा काळे यांच्या प्रचारार्थ स्थानिक गांधी चौकात मंगळवार 12 रोजी रात्री 9.30 वाजता आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी खा. अमर काळे, शिवसेना (उबाठा)चे जिल्हा प्रमुख आशिष पांडे, प्रल्हाद नांदुरकर, समन्वयक दशरथ जाधव, तालुका अध्यक्ष शिरीष काळे, जिपच्या माजी अध्यक्ष कलावती वाकोडकर, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
खा. सुळे पुढे म्हणाल्या देवेंद्र फडणवीस आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात. त्यांनीच आमचा पक्ष फोडला. ज्यांच्यावर 7 हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच पक्षात घेतले व मंत्री केले. भाजपा म्हणजे वॉशिंग मशीन झाले आहे. भारताला आधी ईडी म्हणजे काय माहीत नव्हते. मात्र, भाजप सत्तेत आल्यापासुन ईडी हे नाव घराघरात पोहोचले आहे. एकीकडे कापूस, सोयाबीन पिकांना भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. आत्महत्या करीत आहेत तर दुसरीकडे अदानी, अंबाणीची तिजोरी तुडूंब भरल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
महाविकास आघाडी सत्तेवर आली तर लाडकी बहीण योजना बंद होईल, प्रवास सवलत बंद होईल असे बिंबवण्याचा प्रयत्न प्रसिद्धी माध्यमाच्या वतीने केल्या जात आहे. मात्र, विश्वास ठेवून नये. महाविकास आघाडीची सत्ता आली तर महिलांना 3 हजार रुपये दिल्या जाईल सोबतच शेतकर्यांचे तीन लाखपर्यंतचे पीक कर्ज सुद्धा माफ केले जाईल. भाववाढीच्या माध्यमातून भावांचे असो अथवा शेतकर्यांचे खिसे कापल्या जाणार नाही असे आश्वासन सुद्धा त्यांनी दिले.
यावेळी खा. अमर काळे, उमेदवार मयूरा काळे, दशरथ जाधव, प्रा. पंकज वाघमारे, कलावती वाकोडकर, प्रेमराज पालीवाल, सविता पुरी यांनीही महाविकास आघाडीच्या उमेदवार मयूरा काळे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.