जिल्हा परिषद कार्यालयात शुकशुकाट

13 Nov 2024 19:34:29
गोंदिया, 
Zilla Parishad Office : जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या धडाका सुरू आहे. हल्ली नेहमीच गजगजलेले येथील मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषद कार्यालयात शुकशुकाट पसरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
 
 
OFC
 
 
भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. या तारखेपासूनच जिल्हा संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक पार पाडावी यासाठी निवडणुकीच्या कामात अधिकारी व कर्मचारी व्यस्त आहेत. यामुळे जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असणार्‍या जिल्हा परिषद भवनात शुकशुकाट पसरला आहे. यामुळे नागरिकांच्याही कामाचा खोळंबा होऊ लागला आहे. विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागल्यानंतर अनेक शासकीय कार्यालयांतील कर्मचारी व अधिकार्‍यांची नेमणूक निवडणुकीच्या कामासाठी करण्यात आली आहे. या कालावधीत सर्व शासकीय योजना व विकासकामे बंद असल्याने शासकीय कार्यालयांमधील लोकप्रतिनिधी, नागरिक व ठेकेदारांची वर्दळ ठप्प आहे.
 
 
 
जिल्हा परिषदेतही हेच चित्र असून, आचारसंहिता लागल्यापासून सर्वच विभागांत शुकशुकाट आहे. आचारसंहितेमुळे अधिकारी व कर्मचार्‍यांवरील कामाचा ताण कमी झाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर समाधानाचे वातावरण आहे. मात्र, कार्यालयीन कामकाजातून जराशी विश्रांती मिळते ना मिळते तोच निवडणूक कामासाठी आयोगाने अधिकारी व कर्मचार्‍यांना आदेश काढले आहे. त्यामुळे या निवडणूक कामासाठी हे कर्मचारी हजर झाले आहेत. येत्या 20 तारखेला जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. यात अनेक कर्मचार्‍यांना कर्तव्यावर लावण्यात आले आहे. त्याचा परिणाम ही शासकीय कार्यालयांसह जिल्हा परिषद कार्यालयातील विविध विभागांच्या आस्थापनेत दिसून येतो आहे.
Powered By Sangraha 9.0