श्यामकांत जहागीरदार
नवी दिल्ली,
Sharad Pawar-Sudhakar Naik : महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद दीर्घकाळ भूषवलेले वसंतराव नाईक यांचे पुतणे सुधाकरराव नाईक महाराष्ट्राचे अकरावे मुख्यमंत्री हाेते. मात्र, नाईक यांचे पुतणे म्हणून त्यांना मुख्यमंत्रिपद मिळाले नाही तसेच पुतण्याला मुख्यमंत्री करण्यासाठी काका वसंतराव नाईक यांनी काेणतेच प्रयत्न केले नाही. कारण, प्रयत्न करण्यासाठी ते हयातच नव्हते.
विदर्भातील चार नेत्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवण्याची संधी मिळाली. त्यातील एक सुधाकरराव नाईक हाेते. वसंतराव नाईक, माराेतराव कन्नमवार आणि देवेंद्र फडणवीस या विदर्भातील अन्य नेत्यांनीही मुख्यमंत्रिपद भूषवले. गहुली गावचे सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल असा सुधाकरराव नाईक यांचा राजकीय प्रवास हाेता. सुधाकरराव पुसदमधून पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले. 1978 मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून विजयी झाले. त्यानंतर 1980, 1985, 1990 आणि 1999 असे पाचवेळा ते आमदार हाेते.
शरद पवार यांचा नरसिंहरावाच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर सुधाकरराव नाईक यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. शरद पवार यांनी आपले वजन नाईक यांच्या पारड्यात टाकल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 25 जून 1991 ते 22फेब्रुवारी 1993 असा त्यांचा पावणेदाेन वर्षांचा कार्यकाळ हाेता.
आपण मुख्यमंत्री केल्यामुळे सुधाकरराव नाईक आपल्या ओंजळीने पाणी पितील, असे शरद शरद पवारांना वाटत हाेते. पण, वर्षभरातच नाईकांनी पवारांच्या नाही तर आपल्याच ओंजळीने पाणी पिणे सुरू केले. त्यामुळे पवारांचा इगाे दुखावला. एखादे सावज नजरेच्या टप्प्यात आले की मी ते लगेच टिपताे, असे एक विधान नाईक यांनी केले. या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
नाईक आणि पवार यांच्यातील मतभेद तीव्र झाले. त्यातच छगन भुजबळ यांच्यासह काही पवार समर्थक मंत्र्यांना नाईक यांनी मंत्रिमंडळातून काढले. बाबरीच्या पतनानंतर राज्यात हिंदू-मुस्लिम दंगली सुरू झाल्या, त्यावर नाईक यांना नियंत्रण मिळवता आले नाही. त्यातच पवारांशी असलेले मतभेद यामुळे नाईक यांना पावणेदाेन वर्षांतच मुख्यमंत्रिपदावर पाणी साेडावे लागले. म्हणजे, शरद पवारांमुळे मुख्यमंत्रिपद मिळालेल्या सुधाकरराव नाईक यांना शरद पवारांमुळेच ते पद गमवावे लागले.
सुधाकरावांनी शरद पवारांकडून मुख्यमंत्रिपद घेतले आणि राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याचकडे मुख्यमंत्रिपद साेपवले. मात्र, जेवढा काळ नाईक मुख्यमंत्री हाेते, त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. मुंबईतील माफिया राज त्यांनी संपवले. पप्पू कलानीच्या मुद्यावरून त्यांचे शरद पवारांशी मतभेद झाले हाेते. अमरावती विद्यापीठ तसेच रामटेक येथे कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना त्यांच्या कार्यकाळातच झाली. जलसंधारण तसेच महिला आणि बालविकास ही खाती त्यांनीच सुरू केली. पाणी अडवा, पाणी जिरवा ही माेहीमही त्यांनी राबवली. स्वत: जिल्हा परिषद अध्यक्ष राहिल्यामुळे की काय, जि. प. अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जाही त्यांच्याच कार्यकाळात मिळाला. राज्यात विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय त्यांच्या कार्यकाळात सुरू झाली.
मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये राज्यपाल म्हणून त्यांना पाठवण्यात आले. राज्यपालपदावरून उतरल्यानंतर 1998 मध्ये वाशीम लाेकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढले आणि जिंकले. शरद पवारांमुळे मुख्यमंत्रिपद गमवावे लागले असले, तरी सुधाकररावांनी नंतर शरद पवारांशी जुळवून घेतले. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले.