संतांचा भक्ती प्रेम विचार

17 Nov 2024 05:50:00
संत प्रबोधन
Devotion to saints : परमेश्वराविषयी असलेला नितांत आदर व प्रेम, त्याच्या सहवासातून फुललेला आनंदरंग हा भक्तीतून प्रकट होताना दिसतो. संतांचा भक्ती प्रेम विचार म्हणजे आनंदाचा सोहळा. प्राणसखा पांडुरंग, परमप्रिय श्रीकृष्ण, मर्यादापुरुषोत्तम आळवताना त्यांचे भक्त एकरूप झालेले दिसतात. ‘तुज मज नाही भेद’ अशी अवस्था त्यांची झालेली असते. ही अवस्था म्हणजेच त्या साक्षात भगवंताविषयीची भक्ती प्रेमाची भावना होय.
 

sant 
 
भक्ती प्रेम म्हणजे काय?
जगातील सर्वांच्या ठायी चैतन्यरूपाने ओतप्रोत भरलेल्या परमेश्वराच्या चरणी नितांत असणारी प्रेमभावना म्हणजे भक्ती प्रेम होय. भक्ती प्रेमासारखे दुसरे सुख कशातच परमेश्वराबद्दल असणारी प्रेमभावना शब्दातीत आहे. ती शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही. एखाद्या मुक्या माणसाने ज्याप्रमाणे साखर खावी; त्याचे वर्णन तो जसा करू शकत नाही, परंतु त्याचा आनंद त्याच्या मनातच अवर्णनीय असतो. भक्ती ही शांतिमय असून परम आनंद देणारी आहे. भक्ती प्रेम भावनेने भगवंताची साधना केली तर तो भक्ताला भेटतो. प्रेम कसे आहे? तर, संत तुकाराम सांगतात -
भक्तीप्रेम नेणवे आणिकां |
पंडित वाचकां ज्ञानियांसी ॥
आत्मनिष्ठ जरी जाले जीवन्मुक्त |
तरी भक्ती सुख दुर्लभ त्यां ॥
तुका म्हणे कृपा करिल नारायण |
तरि च हें वर्म पडे ठायीं ॥
(तु. गा. ३०३९)
भक्ती प्रेमाचा आनंद अवर्णनीय असून त्यामध्ये जे सुख आहे, ते शब्दातीत आहे. भगवंताच्या भक्ती प्रेमाला कशाचीही उपमा देता येत नाही. ते अनुपम आहे. त्याचा ज्याला अनुभव येईल तो धन्य धन्य होईल. भक्ती प्रेम ही एक अनुभूती आहे. ईश्वराला प्राप्त करण्यासाठी ती एक साधना असून ती भावना निर्माण झालेल्या मनामध्ये पवित्र संस्काराचे रोपण होत असते. संत भक्तीचा अवर्णनीय असा आनंद व्यक्त केला आहे-
गोड लागे परी सांगताचि न ये |
बैसे मिठी सये आवडीची ॥
वेधले वो येणे श्रीरंगे |
मी माझी अंगे हारपली ॥
परते चि ना दृष्टी बैसली ते ठायी |
विसावोनि पायी ठेले मन ॥
तुक्याच्या स्वामीसवे जाली भेटीड |
तेव्हा जाली मागिल्यांची ॥
(तु. गा. ३९८)
सर्वव्यापक ईश्वराविषयी असणारी प्रेमभावना म्हणजे भक्ती प्रेम होय. ईश्वर साक्षात्काराच्या उद्देशाने ही क्रिया केली जाते. संत तुकारामांनी केलेल्या भक्तीच्या विविध व्याख्या अशा -
भक्ती ते नमावे जीव जंतु भूत |
शांतवूनि ऊत कामक्रोध ॥
(तु. गा. २६५६)
भक्ती ते नमन ॥
(तु. गा. ३८५०)
म्हणजे भक्ती, अशी साधी-सोपी व्याख्या संत तुकाराम करतात.
हेचि थोर भक्ती आवडती देवा |
संकल्पावी माया संसाराची ॥
(तु. गा. ३३३५)
 
 
Devotion to saints : संसारावरील आसक्ती टाकणे म्हणजेच भक्ती, ही भक्तीची दुसरी व्याख्या संत तुकारामांनी केली आहे.
नारद भक्तिसूत्रात आलेल्या भक्तीच्या व्याख्या अशा -
पूजादिवनुराग ईति पराशर्याः ॥
पाराशर ऋषींचे पुत्र श्री यांच्या मते परमेश्वराच्या पूजेमध्ये प्रेम असणे म्हणजे भक्ती.
कथादिष्विति गर्गः ॥
श्री गर्गाचार्यांच्या मतानुसार, भगवंताच्या कथा, गोष्टी, पराक्रम याविषयी प्रेम असणे म्हणजे भक्ती.
आत्मरत्याविरोधेनेति शांण्डिल्य ॥
(शाण्डिल्य ऋषी)
आत्मप्रेमाविषयी अनुकूल असणार्‍या विषयात प्रेम असणे ही भक्ती होय.
नारदश्तु तदर्पिताखिलाचारता
तव्दिस्मरणे परमव्याकुलतेति ॥
सर्व कर्मे ईश्वरार्पण करणे आणि परमेश्वराचे थोडेही झाले असता अत्यंत व्याकूळ होणे म्हणजे भक्ती.
द्रुतस्य भगवद्धरर्माद् धारावाहिकतां गता |
सर्वेशे मनसो वृत्तिः भक्तिरित्यभिधीयते ॥
(ज्ञानेश्वरी प्रस्तावना- भक्तिरसायनकार)
सर्वेद्रियांच्या मनोवृत्ती अत्यंत चढत्या-वाढत्या प्रेमाने ईश्वराकडे धावणे म्हणजे भक्ती.
सात्वस्मिन् परमप्रेमरुपा ॥ -(देवर्षी नारद)
भक्ती म्हणजे परम्यात्म्याच्या ठिकाणी नितांत प्रेम
सा परानुरक्तिरीश्वरे ॥
(शाण्डिल्य भक्तिसूत्र -२९, ३०, ३१, ३२)
ठिकाणी नीरतिशय प्रेम असणे यालाच भक्ती म्हणतात.
ता ऐष्वर्याणां काश्यपः परतत्वात ॥
(कश्यपमुनी)
सर्वसमर्थ परम्यात्म्याच्या षडैश्वर्याचे ध्यान करणे, नामसंकीर्तन करणे, हेच भक्ती लक्षण आहे.
आत्मैकपरा बादरायणः ॥
(बादरायण व्यास)
आपल्या आत्मचैतन्याचे अखंड स्मरण असणे, हेच उत्तम भक्ती लक्षण आहे.
उभयं परां शाण्डिल्यः ॥
 
 
(शाण्डिल्य)
Devotion to saints : आत्मतत्त्व व ईश, सामर्थ्य-ऐश्वर्य या ध्यान, पूजन, अनुसंधान असणे हेच श्रेष्ठ भक्ती लक्षण आहे.
मोक्षकारण सामग्-यां भक्तिरेव गरीयसी |
स्वस्वरूपानुसंधान भक्तिरित्यभिधियते ॥
(विवेकचुडामणी)
मोक्षसाधनात भक्ती हेच श्रेष्ठ साधन आहे व स्वस्वररूपानुसंधान म्हणजेच भक्ती होय, अशी भक्तीची व्याख्या शंकराचार्य करतात.
परि तेचि भक्ति ऐसी | पर्जन्याची सुटिका जैसी ॥
धरावाचुनी अनारिसी| गतीचि नेणे ॥
तैसे | न धरत प्रेम एकसरे |
मजमाजी संचरे | मीचि होऊनि ॥
(ज्ञाने. ११/६८६, ८८)
पावसाच्या धारेला पृथ्वीवर येण्याशिवाय दुसरी गतीच नाही. त्याचप्रमाणे सर्वभावपूर्णरीतीने मी होऊन माझ्यात एकरूप होणे म्हणजे भक्ती. ज्ञानेश्वर महाराजांप्रमाणे एकनाथ महाराजसुद्धा भक्तीची व्याख्या करतात.
काया वाचा मनसा | माझे भक्तीचा पडिला ठसा |
भजता नाठवे निशा | भक्तीची दशा या नावे ॥
(ए. भा. ११/१११०)
काया, वाचा, मने, रात्रंदिवस प्रेमयुक्त अंतःकरणाने हरिचरणी अखंड निष्ठा म्हणजे भक्ती.
एरव्ही तिजी ना चौथी | हे पहिली ना सरती |
पै माझिये सहजस्थिती | भक्ति नाव ॥
(ज्ञाने. १८/१११३)
 
 
Devotion to saints : परमेश्वराच्या सहजरूप स्थितीला भक्ती हे नाव आहे.
उत्तममध्यमाधमा भूती भगवद्भावअहोराती |
या नावे मुख्य भगवद्भक्ती | स्वप्न सुषुप्तीं भगवंत ॥
(भावार्थ रामायण, अ. २४, युद्धकांड )
भक्ती प्रेम हा अलौकिक विचार संतांनी समाजाला दिलेला आहे. भक्ती प्रेमामध्ये जे सुख आहे ते अनन्य कुठेही पाहायला मिळत नाही. साक्षात भगवंताविषयी प्रीती, लडिवाळपणा आणि त्याच्या सहवासातून फुललेला हा भक्तिरंग अवघ्या महाराष्ट्राला, जगाला एक आनंदाची, समाधानाची शिकवण देत असतो. भक्तीत तल्लीन झालेले संत नामदेव, संत गोरा कुंभार, भक्तीत तल्लीन झालेली संत मीराबाई, जनाबाई, भक्त प्रल्हाद ही सर्व उदाहरणे त्यांच्या जीवनामध्ये भक्तीच्या अतिउच्च शिखरावर पोहोचलेले पाहायला मिळतात.
 
- प्रा. डॉ. हरिदास आखरे
- ७५८८५६६४००
Powered By Sangraha 9.0