ट्रम्पशाहीमुळे ट्रुडो जात्यात

    दिनांक :17-Nov-2024
Total Views |
- प्रा. डॉ. विजयकुमार पोटे
India - Canada : अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचे जगावर काय परिणाम होतील, याची चर्चा अजून थांबलेली नसतानाच ट्रम्प आणि त्यांच्या निवडणुकीतील पाठीराखे एलन मस्क यांनी केलेल्या वक्तव्याचे आता कॅनडात पडसाद उमटायला लागले आहेत. आतापर्यंत खलिस्तानी अतिरेक्यांना पाठीशी घालणार्‍या आणि भारताविषयी सातत्याने फुत्कार करणारे कॅनडाच्या पंतप्रधान ट्रुडो यांची भाषा दोनच दिवसांत बदलली आहे. अर्थात, भाषा बदलली, तरी मूळ स्वभाव थोडाच बदलतो? एकीकडे कॅनडामध्ये खलिस्तानी अतिरेकी असल्याचे मान्य करायचे आणि त्याच वेळी भारताच्या भूमिकेवर टीका करायची, ही दुटप्पी नीती झाली; परंतु असे असले, तरी ट्रम्प आणि मस्क यांच्या इशार्‍यामुळे जस्टिन ट्रुडो आणि त्यांचे समर्थक चांगलेच चिंतित एक तर कॅनडाची अर्थव्यवस्था संकटात आहे. तिथे बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. महागाईने कळस गाठला आहे. अशा परिस्थितीमध्ये देशांतर्गत प्रश्नांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी जस्टिन ट्रुडो भारतविरोधी मोहिमेला बळ देत होते. ट्रम्प यांच्या विजयामुळे जगभरातील अनेक देश आनंदी असतानाच अनेक देशांमध्ये तणाव स्पष्टपणे दिसून येत आहे. अमेरिकेच्या शेजारी देश कॅनडामध्येही तणाव दिसून येत आहे. ट्रुडो इतके चिंतित आहेत की, त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसर्‍या कार्यकाळाबद्दल चिंता दूर करण्यासाठी कॅनडा-अमेरिका संबंधांवर विशेष कॅबिनेट समितीची पुनर्स्थापना केली. कॅनडा लवकरच निवडणुकीला सामोरे जात आहे. या निवडणुकीत जस्टिन ट्रुडो यांचे काही खरे नाही, अशी चर्चा सुरू असतानाच मस्क यांनी आता जस्टिन ट्रुडो यांची आहे, असे वक्तव्य केल्याने कॅनडातील सत्ताधारी पक्ष आणखी चिंतेत पडला आहे.
 
 
trodo
 
कॅनडाने स्थापन केलेल्या विशेष मंत्रिमंडळ समितीचे अध्यक्षपद देशाच्या उपपंतप्रधान क्रिस्टिया फ्रीलँड यांना देण्यात आले आहे. त्या देशाच्या अर्थमंत्रीही आहेत. या समितीमध्ये परराष्ट्र व्यवहार, सार्वजनिक सुरक्षा आणि उद्योगमंत्र्यांसह इतर उच्चपदस्थ अधिकारीही असतील. ट्रम्प यांच्या विजयानंतर कॅबिनेट समिती कॅनडा-अमेरिकेच्या महत्त्वाच्या लक्ष केंद्रित करेल, असे ट्रुडो यांच्या कार्यालयाने सांगितले. कॅनडा हा जगातील व्यापारावर सर्वाधिक अवलंबून असलेला देश आहे. कॅनडाची ७५ टक्के निर्यात अमेरिकेमध्ये होते. ट्रम्प हे ‘नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड अ‍ॅग्रीमेंट’ (नाफ्ता) वर फेरविचार करण्याच्या हालचाली आणि ऑटो सेक्टरवर २५ टक्के शुल्क लावण्याचा विचार करत असल्याच्या अहवालाने कॅनडाच्या सरकारच्या पोटात गोळा आला आहे. फ्रीलँड यांनी ‘ट्रम्प आणि त्यांच्या टीमसोबत आमचे घट्ट नाते आहे. कॅनडा आणि अमेरिका यांच्यातील संबंध खूप चांगले आहेत’ असे सांगितले असले, तरी ट्रम्प यांनी जस्टिन ट्रुडो यांना अनेकदा फटकारले आहे. कॅनडाने २०२३ मध्ये आपल्या लष्करी बजेटवर जीडीपीच्या १.३३ टक्के खर्च केला आहे. यासंदर्भात दोन टक्के रक्कम करण्याची गरज आहे. दररोज चार लाख कॅनेडियन जगातील सर्वात लांब आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडतात आणि सुमारे आठ लाख कॅनेडियन अमेरिकेत राहतात. ट्रम्प पुन्हा एकदा सत्तेवर आल्याने अनेक देशांची चिंता वाढली आहे. या यादीमध्ये कॅनडा पहिल्या क्रमांकावर आहे.
 
 
India - Canada : यापूर्वी खलिस्तान्यांच्या समर्थनार्थ बोलून कंटाळलेल्या ट्रुडो यांचा खलिस्तानी आणि इतर शीख वेगळे आहेत, विश्वास बसत नव्हता. अलिकडे मात्र त्यांनी खुल्या व्यासपीठावर हे सत्य स्वीकारले. खलिस्तान समर्थक फुटीरतावादी संपूर्ण शीख समुदायाचे प्रतिनिधित्व करत नाहीत, असे ते अलिकडेच म्हणाले. जस्टिन ट्रुडो यांनी ट्रम्प यांचे अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले आणि कॅनडा आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीबद्दल बोलले; परंतु त्यांच्या मनातील चिंता कायम आहे. या नेत्यांमधील संबंध अनेकदा तणावाचे राहिले आहेत. दोघेही सार्वजनिक ठिकाणी एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. दोन महिन्यांपूर्वी, सप्टेंबरमध्ये, ट्रम्प यांनी एका पुस्तकातून जस्टिन ट्रुडो यांच्याबद्दल अफवा पसरवल्या होत्या. त्यात ते क्युबाचे दिवंगत हुकूमशहा फिडेल कॅस्ट्रो यांचे पुत्र आहेत, असे म्हटले होते. जस्टिन ट्रुडो आणि उपपंतप्रधान क्रिस्टिया फ्रीलँड यांच्या विधानांवरून कॅनडाच्या गोंधळाचा अंदाज लावला जाऊ शकतो. ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतल्याने त्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही, अशी ग्वाही या दोघांनी दिली असली, तरी त्यात आत्मविश्वासाचा आणि खात्रीचा अभाव होता. अमेरिकेला खूश ठेवणे ही कॅनडाची मोठी मजबुरी आहे. आपल्या एकूण निर्यातीच्या अंदाजे ७५ टक्के निर्यात अमेरिकेला करत असल्याने त्या देशाशी पंगा घेण्याचा केला, तर कॅनडा पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतो.
 
 
दुसरीकडे खलिस्तानी दहशतवादी निज्जर याच्या हत्येमुळे भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडले होते. निज्जर यांच्या हत्येला भारत जबाबदार असल्याचा आरोप कॅनडाने सुरुवातीपासूनच केला आहे; मात्र, भारत सरकारने सुरुवातीपासूनच कॅनडाचा हा आरोप निराधार असल्याचे म्हटले. ट्रम्प यांच्या धोरणाचा कॅनडाचे हवामान, व्यापार, सुरक्षा आणि इमिग्रेशन परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली. उपपंतप्रधान फ्रीलँड यांनी पत्रकारांना सांगितले की, बरेच कॅनेडियन काळजीत आहेत आणि मी कॅनडियन लोकांना खात्रीने सांगू इच्छिते की, कॅनडा पूर्णपणे ठीक होईल. अमेरिकेसोबत आमचे मजबूत संबंध आहेत. ट्रम्प आणि त्यांच्या टीमसोबत आमचे घट्ट नाते आहे. अर्थात त्यांच्या या वक्तव्यावर अमेरिकन अब्जाधीश यांनी लगेच पाणी फेरले. जस्टिन ट्रुडो या वेळी निवडणुकीत हरणार आहेत, असे ते म्हणाले. मस्क आणि ट्रम्प यांची भूमिका लक्षात घेता ट्रुडो यांच्यासाठी येणारे दिवस चांगले नाहीत, असा त्याचा अर्थ आहे. त्याच वेळी भारत आणि कॅनडामधील वाद इतका वाढला आहे की, दोन्ही बाजूंच्या राजनैतिक अधिकार्‍यांना माघारी बोलावण्यात आले आहे. यांच्यासारख्या बलाढ्य व्यक्तीने ट्रुडोबद्दल असे काही बोलणे, हा एक धक्का आहे. आधी ट्विटर विकत घेऊन आणि आता ट्रम्प यांना अमेरिकेचे अध्यक्ष बनवून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. यामुळेच मस्क यांनी जस्टिन ट्रुडो यांच्या पराभवाची भविष्यवाणी केल्यापासून भारतात ‘सोशल मीडिया’वर ट्रुडो यांची खिल्ली उडवली जात आहे; मात्र मस्क काय म्हणाले विनोदाचा विषय नाही.
 
 
India - Canada : जगभरातील सरकारे बनवण्यात आणि पाडण्यात शक्तिशाली देशांची खूप महत्त्वाची भूमिका असते. बांगलादेशमधील हसिना सरकार कसे पाडले गेले हे आपण पाहिले. यामागे अमेरिकेचा हात होता हे सर्वांना माहीत आहे. कॅनडाची परिस्थिती बांगलादेशसारखी नसली, तरी फारशी चांगलीही नाही. ट्रुडो यांनी निज्जर हत्याकांडातून भारताशी वैर पत्करले. त्यामुळे भारताने कॅनडातील दूतावास बंद केले. जगभरातील बलाढ्य देश अनेक देशांमध्ये आपल्या फायद्यासाठी सरकारे बनवत आहेत. पाकिस्तान, बांगलादेशसारखे छोटे आणि कमकुवत देश असोत किंवा कॅनडासारखे मोठे देश; मोठ्या देशांच्या प्रभावामुळेच येथे प्रमुख निवडून आले आहेत. कॅनडामध्ये जस्टिन ट्रुडो यांच्यावर आपले सरकार स्थापन करण्यासाठी चीनची मदत घेतल्याचा आरोप आहे. जस्टिन यांच्या विजयात चीनची असल्याचा आरोप कॅनडातील विरोधक सातत्याने करीत आहेत. एवढेच नाही, तर ट्रुडो यांना कॅनडात निवडून आणण्यामागे चीनच्या भूमिकेबाबत एक चौकशी समितीही स्थापन करण्यात आली आहे. अध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांना शेजारी चीन समर्थित कोणतीही व्यक्ती इतकी मजबूत रहावी, असे अमेरिकेला वाटणार नाही. मस्क आणि ट्रम्प ज्या प्रकारे कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांचा करतात, त्यावरून दिसते की ट्रुडो पुन्हा सत्तेवर येणार नाहीत. ट्रम्प यांनी ट्रुडो यांना डाव्या विचारसरणीचे वेडे म्हणत त्यांची खिल्ली उडवली. कॅनडातील लोक आधीच ट्रुडो यांना कंटाळले आहेत. ते पंतप्रधानांवर खूप नाराज आहेत, याचे मुख्य कारण तेथील ढासळलेली अर्थव्यवस्था आहे.
 
 
India - Canada : कोरोना महामारीनंतर जगाची परिस्थिती बिकट झाली आहे. युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यामुळे आणखी बिकट झाली आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त विजेचे दर गगनाला भिडले आहेत. घरांच्या किमती वाढल्या असून परवडणारे घर मिळणे कठीण झाले आहे. नोकर्‍यांसाठी रांगा वाढत आहेत. आठवडाभर चाललेल्या रेल्वे कर्मचार्‍यांच्या संपाने कॅनडा ठप्प झाला होता. कॅनडा ही जगातील नवव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. २०२२ मध्ये तिचा जीडीपी २.२ ट्रिलियन होता. विकास दर ०.५ टक्क्यांच्या खाली आहे. यावरून या देशाची सध्याची स्थिती काय असेल हे समजू शकते. मतदारांची नाराजी पाहून किमान चार मंत्र्यांनी पुढची निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले आहे. काही खासदारांनाही पराभवाच्या भीतीने निवडणूक लढवायची नाही. यावरून ट्रुडो यांची स्थिती लक्षात यायला हरकत नाही.