चांदूर रेल्वे,
Attack on Pratap Adsad's sister धामणगाव विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार प्रताप अडसड यांची बहिण अर्चना रोठे (अडसड) यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीतील सातेफळ फाट्यावर हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री 9.30 वाजताच्या दरम्यान घडली. सदर हल्ल्यात त्यांच्या हाताला जखम झाल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले. माहितीनुसार, १८ नोव्हेंबर रोजी भाजपाचे उमेदवार प्रताप अडसड यांची बहीण अर्चना रोठे या मतदारसंघात प्रचार करून परतत असताना मतदार संघातील सातेफळ फाट्यावर अज्ञात हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केल्याचे समजते.
त्या हल्ल्यात अर्चना रोठे यांच्या हाताला गंभीर घाव झाल्याचे समजते. त्यांची गाडी क्रमांक एम.एच. २७ डी.बी. ५००१ या गाडीचे समोरील काच फोडण्याचाही प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली आहे. Attack on Pratap Adsad's sister हल्ला करून हल्लेखोर अंधारात पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शनी यांनी सांगितले. घटनेनंतर अर्चना रोठे यांना चांदूर रेल्वे शहरातील डॉ. क्रांतिसागर ढोले यांच्या खाजगी दवाखान्यात आणून प्राथमिक उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी अमरावती पाठविण्यात आले. कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल करण्याकरिता चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन एकच गर्दी केली होती. सदर घटनेचा पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस करीत आहे.