गोंदिया,
Maharashtra Assembly Elections : विधानसभा निवडणुकीसाठी आज, 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा, आमगाव व अर्जुनी मोरगाव या चार मतदारसंघात रिंगणातील 64 उमेदवारांचे भाग्य मशिनबद्ध झाले. जिल्ह्यात सरासरी 67 टक्के मतदान झाले. आमगाव मतदारसंघात सर्वाधिक 67.31 टक्के तर सर्वात कमी मतदान तिरोडा मतदारसंघात 60.32 टक्के झाले.
विधानसभा निवडणुकीमुळे ऐन थंडीच्या दिवसात जिल्ह्यातील वातावरण तापलेले दिसले. उमेदवार निवडीपासून ते उमेदवार ठरविल्यावर प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपांनी निवडणुकीची रणधुमाळी उडाली. जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात 64 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात अर्जुनी मोरगाव मतदार संघात 19 उमेदवार, तिरोडा मतदार संघात सर्वाधिक 21, गोंदिया विधानसभा क्षेत्रात 15 उमेदवार व सर्वात कमी आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघात 9 उमेदवार आहेत. या चारही मतदारसंघातील 64 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला आज 20 नोव्हेंबर रोजी मशिनबंद झाला. आमगाव व अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी सकाळी 7 ते दुपारी 3 वाजतापर्यंत मतदान केले. गोंदिया व तिरोडा विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजतापर्यंत मतदान झाले. चारही मतदारसंघात सकाळी 7 ते 9 वाजतादरम्यान 7.94 टक्के मतदान झाले.
यात अर्जुनी मोरगाव 9.54 टक्के, तिरोडा 6.5, गोंदिया 5.62 व आमगाव मतदारसंघात 10.66 टक्के मतदान झाले. 7 ते 11 वाजतादरम्यान 23.32 टक्के मतदान झाले असून यात अर्जुनी मोरगाव 27.4, तिरोडा 19.54, गोंदिया 18.47 व आमगाव मतदारसंघात 29.26 टक्के मतदान झाले. सकाळी 7 ते दुपारी 3 वाजतादरम्यान 40.46 टक्के मतदान झाले. यात अर्जुनी मूोरगाव 46.98, तिरोडा 34, गोंदिया 33.98 व आमगाव मतदारसंघात 48.5 टक्के मतदान झाले. 7 ते सायंकाळी 5 वाजतापर्यंत 65.09 टक्के मतदान झाले. यात अर्जुनी मोरगाव 67.3, तिरोडा 60.32, गोंदिया 65.45 व आमगाव मतदारसंघात 67.31 टक्के मतदान झाले. तर सायंकाळ 6 वाजतापर्यंत चारही मतदारसंघात सरासरी 67 टक्के मतदान झाले.
मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात एकूण 5 हजार 724 अधिकारी-कर्मचारी मतदान पथकात कार्यरत होते. जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर सेल्फी पॉईंटची व्यवस्था करण्यात आली होती. महिलस च युवा मतदारांनी उत्साहाने मतदान करुन या सेल्फी पॉईंटसमोर आपली छायाचित्रे काढून ती समाजमाध्यमावर टाकली. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 10 मतदान केंद्रांचे व्यवस्थापन महिलांच्या हाती होती. दिव्यांग व वयोवृध्द मतदारांनी देखील उत्साहाने मतदान केले. निवडणूक विभाग व पोलीस विभागाच्या समन्वयाने जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
जिल्हाधिकार्यांनी उधळला पोहा वाटपाचा कार्यक्रम
गोंदिया विधानसभा क्षेत्रातील हिवरा, रतनारा व आयटीआय फुलचूर येथील मतदान केंद्रांवर मतदारांना प्रलोभन दाखविणारा प्रकार दिसून आला. फुलचूर येथील दोन राजकीय पक्षांच्या मंडपात मतदारांसाठी पोहा, चहा वाटपाचे स्टॉल लावले होते. मतदान केंद्राची पाहणी करण्याकरिता जिल्हाधिकारी नायर हे आले असता त्यांनी हा कार्यक्रम बंद पडला. तसेच नास्ता जप्त केला. त्यामुळे या केंद्रावर काहीकाळ गोंधळ उडून तणावाची स्थिती निर्माण झाली होती. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मंडपात अधिक खुर्च्या टेबल होते ते व नाश्ता जप्त करून कारवाईसाठी प्रस्तावित केले असल्याचे जिल्हाधिकारी नायर यांनी सांगितले.
वयोवृद्ध नागरिकांचे उत्स्फूर्त मतदान
यंदा निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नागरिकांना गृहमतदानाचा अधिकार दिलेला असताना अनेक मतदान केंद्रावर अनेक वयोवृद्ध नागरिकांना नवमतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी मतदान केंद्रावर येऊन मतदान केले. यात शंभरी गाठण्याच्या जवळ असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होता.
लाडक्या बहिणी मते ठरविणार निर्णायक
जिल्ह्यातील चारही मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. जिल्ह्यात 5 लाख 71 हजार 405 महिला मतदार असून यात अर्जुनी मोरगाव मतदारसंघात 1 लाख 29 हजार 996 मतदार, तिरोडा 1 लाख 38 हजार 173, गोंदिया 1 लाख 67 हजार 505 व आमगाव मतदारसंघात 1 लाख 35 हजार 730 महिला मतदार आहेत. आज, महिला मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केल्याचे दिसून आले. त्यामुळे लाडक्या बहिणींचे मते ही निर्णायक ठरणार असल्याची चर्चा होती.