तभा वृत्तसेवा
वर्धा,
Maharashtra Assembly Elections : मतदानाची टक्केवारी वाढावी, नागरिकांची पाऊले मतदान केंद्रांकडे वळावी, याकरिता जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघातील 25 मतदान केंद्र विशेष आकर्षक पद्धतीने सजविली होती. यात येथील केसरीमल कन्या शाळेत मतदान केंद्राला बापूकुटीचे स्वरूप देण्यात आले. या मतदान केंद्राने नागरिकांमध्ये भूरळ घातली होती. या विशेष मतदान केंद्रात महिलांचा सन्मान वाढविणारे पीक मतदान केंद्र, पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देणारे ग्रीन मतदान केंद्र, नवमतदार आणि तरुणांना मतदानाचे महत्त्व पटवून देणारे यूथ मतदान केंद्र, दिव्यांगांचा सन्मान वाढविणारे दिव्यांग मतदान केंद्रांची निर्मिती केली होती.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज बुधवार 20 रोजी मतदान प्रक्रिया राबविली. निवडणुकीचा एक भाग म्हणून यापूर्वी दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांसाठी गृहमतदान प्रक्रिया राबविण्यात आली. आर्वी विधानसभा मतदारसंघातील 155 केंद्रांवर वेब कास्टिंग झाले. पीक मतदार केंद्र 3, ग्रीन मतदान केंद्र 1, दिव्यांग मतदान केंद्र 1 तर युथ मतदान केंद्र 1 होते. हिंगणघाट मतदार संघात 176 केंद्रांवर वेब कास्टिंग झाले असून पीक मतदार केंद्र 2, दिव्यांग मतदान केंद्र 2 आणि युथ मतदान केंद्र 1 होते. देवळी मतदारसंघात 168 केंद्रांवर वेब कास्टिंग झाले. तर पीक मतदार केंद्र 2, ग्रीन मतदान केंद्र 2, दिव्यांग 1 तर युथ मतदान केंद्र 1 राहणार आहे. वर्धा मतदार संघात 173 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग झाले. पीक मतदान केंद्र 2, ग्रीन मतदान केंद्र 2, दिव्यांग मतदान केंद्र 2 तर युथ मतदान केंद्र 2 होते.