तभा वृत्तसेवा
वर्धा,
Maharashtra Assembly Elections : लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, याकरिता जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रम, जनजागृतीतून 100 टक्के मतदान करण्याचे आवाहन केले. यातच आज बुधवार 20 रोजी मतदानाच्या दिवशी शहरातील सुजाण नागरिकांनी शहरातून बाईक रॅली काढून मतदनाला चला... मतदानाला चला... अशी मतदारांना साद घातली. शिवाजी चौकात युवकांनी मतदान करा असे आवाहन करणारे फलक दाखवत हात जोडले.
दिवाळीनंतर प्रचाराला सुरूवात झाली. जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट आणि वर्धा या चार मतदार संघात 60 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक काळात जिल्हा प्रशासनाने मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले. स्वीप अंतर्गत विद्यार्थ्यांनी या मोहिमेत पुढाकार घेत 100 टक्के मतदानासाठी पाल्य, नातेवाईकांना हजारो पत्र लिहिले. प्रचाराचा काळ संपला आणि 20 रोजी मतदानाचा दिवस उजाडला. लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी शासनाने सर्व शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालयांना सुटी जाहीर केली. सोबतच हॉटेल, कारखाने, प्रतिष्ठाने येथील कर्मचार्यांना मतदानासाठी सवलत देण्याचे निर्देशही दिले.
आज बुधवार मतदानाच्या दिवशी शहरातील अनेक दुकाने, हॉटेल्स, प्रतिष्ठाने व्यापार्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली. त्यामुळे बाजारात शुकशुकाट होता. दरम्यान, शहरातील काही सुजाण नागरिकांनी सकाळपासून आगळ्यावेगळ्या पद्धतीने नागरिकांना मतदानासाठी साद घातली. स्थानिक शिवाजी चौकात आज छुट्टी का दिन नही जिम्मेदारी निभाने का दिन है, राष्ट्रहित सर्वप्रथम- मतदान अवश्य करें, तुमचं अमुल्य मत तुमचा विकास घडवेल, असे पोस्टर दाखवत मतदारांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर शिवाजी चौक, बोरगाव मेघे, दयालनगर, मार्केट लाईन, रामनगर अशी बाईक रॅली काढून मतदानाला चला... मतदानाला चला... अशी मतदारांना साद घातली.
या बाईक रॅलीत आनंद भुतडा, गोविंद भुत, ओम केला, विवेक टिबडेवाल, अजय मुनोत, अनुराग राठी, पराग मुरारका, पलाश मुरारका, सचिन सिंघानीया, ललित राठी, अमित अग्रवाल, गिरश जोशी, शैलेश सिन्हल, स्पर्श नरेटी, रितेश कुलधरीया, राम अग्रवाल, महेश सिंघानीया, निलेश मुंजे, राजेश ठाकूर, गिरश टिबडेवाल, पंकज मुरारका, रजत बत्रा, संजू शर्मा आदींनी सहभाग घेतला होता.