तभा वृत्तसेवा
वर्धा,
Maharashtra Assembly Elections : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याह हिंदूत्त्ववादी संघटनांविषयी नेहमीच खालच्या पातळीवर टीका करणार्या कराळे मास्तरला आज बुधवार 20 रोजी उमरी मेघे परिसरात नागरिकांनी बुक्क्यांचा चांगलाच चोप दिला.
या ना त्या कारणाने खदखद मास्तर म्हणून प्रचलित असलेले नितेश कराळे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आहेत. ते नेहमीच प्रसिद्धी झोतात असतात. काही दिवसांपूर्वी सालोड हिरापूर येथे कामगारांना पेटी वाटप कार्यक्रम सुरू असताना या कार्यक्रमात नितेश कराळे यांनी अडथळा निर्माण केला होता. त्यावेळीही त्यांना धक्काबुक्की करून हाकलून देण्यात आले होते. आज तर त्यांनी कमालच केली. उमरी मेघे येथील मतदान केंद्राच्या 100 मीटर दूर असलेल्या एका बुथवर जाऊन नागरिकांना कायदे सांगत असताना ताप अनावर झालेल्या नागरिकांनी त्यांना चांगलाच बुक्क्यांचा मार दिला.
नितेश कराळे हे कुटुंबीयांसह देवळी-पुलगाव मतदार संघातील मांडवा येथे मतदान करण्यासाठी गेले होते. मतदान केल्यानंतर परतीच्या प्रवासात असताना ते उमरी मेघे येथील मतदान केंद्रावर थांबले. एका बुथवर थांबून बुथवरील एका महिलेशी त्यांनी
हुज्जत घातली. कराळे मास्तरला समजावून सांगत असतानाही ते समजून घेण्यास तयार नव्हते. बुथवरील कामात अडथळा निर्माण होत असल्याने या प्रकारामुळे राग अनावर आला आणि तेथील नागरिकांनी मास्तरला चांगलाच बुक्क्यांचा मार दिला. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचत कराळे मास्तर आणि नागरिकांना सावंगी पोलिस ठाण्यात आणले. दोघांनीही परस्पराविरुद्ध तक्रार दिली. वृत्तलिहिस्तोवर सावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.