मुंबई वार्तापत्र
- नागेश दाचेवार
Assembly elections : एका मुख्यमंत्रिपदासाठी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसणारे उद्धव ठाकरे यावेळी पुन्हा गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याचे दिसते. अर्थात हा चर्चा किंवा अंदाज नव्हे, तर प्रत्यक्षात त्यांच्या घरगड्याने याबाबतचा दावा केलाय्. दुसरीकडे महाविकास आघाडीतला मोठा भाऊ असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेदेखील बाशिंग बांधून तयार असल्याचं त्यांच्या वक्तव्यातून दिसले. बरं; अद्याप निकालाचा पत्ता नाही. वेगवेगळ्या सर्व्हेंमधून महायुतीला झुकतं माप देण्यात आलं आहे. तर, सट्टेबाजाराने महायुतीला फेव्हर केल्याचे दिसते. अशात कुठूनही सत्ता येण्याची चिन्हे नसताना, मुख्यमंत्रिपदासाठी दावे-प्रतिदावे, मारामारी करून गुडघ्याला बाशिंग बांधून फिरण्याच्या प्रकाराला ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’ असे म्हणतात.
राज्यात कुणाची येणार हे आज स्पष्ट होणार आहे. मात्र, त्याआधीच काँग्रेस आणि उबाठा गटाला मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. यात सर्वांत चतुर पक्ष हा शरद पवारांचा आहे. नेहमी एकदम सेफ खेळी करत असतात. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सातत्यानं सांगताहेत की, आम्ही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही. अर्थात संख्याबळ मिळालं, तर शरद पवार आपल्या हयातीत मुलीला मुख्यमंत्री बनविल्याशिवाय राहणार नाहीत; किंबहुना त्यांची हीच शेवटची इच्छादेखील म्हणता येईल. पण माणसाच्या सर्वच इच्छा एका जन्मात पूर्ण होत नसतात, ही दुसरी बाजूदेखील असल्याने व जनता आपल्या पदरात सत्तास्थापनेसाठी लागणारी मॅजिक फिगर टाकते किंवा नाही याबाबत कदाचित शरद पवारांच्या मनात संभ्रम असल्याने सावध पावलं टाकत असल्याचे दिसत आहे. तसे शरद पवारांइतकं महाराष्ट्राला कोणी ओळखून नाही, असे म्हणतात. त्यामुळे शरद पवारांना महाराष्ट्राच्या मनात काय आहे, याची कुणकुण लागली असावी; त्याहीमुळे कदाचित पवार आणि त्यांचे नेते दूर बसून काँग्रेस आणि उबाठामध्ये चाललेला तमाशा बघत बसले असावेत. बरं; यात दोन्ही घरचा घरगडी आपल्या मालकाच्या दुसर्या मालकाच्या मुलीचे नाव चालविण्याऐवजी जयंत पाटलाचे नाव पुढे करू लागला आहे.
Assembly elections : महत्त्वाचं म्हणजे जयंत पाटलासाठी ठाकरे गटाचा पाठिंबा असल्याचेदेखील जाहीर करून टाकले घरगड्याने. आता हा सर्व प्रकार मालकाला विचारून केलाय् की दुसर्या मालकाच्या इशार्यावर करताय् हा मात्र गुलदस्त्यातला विषय आहे. पवार गट स्वतः मुख्यमंत्रिपदावर दावा करत नसताना, घरगड्याला उपद्रव करायला सांगितलं तरी कोणी, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कदाचित काँग्रेसवर कुरघोडी करण्याचा हा प्रयत्न असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्हाला नाही तर तुम्हालाही नाही... या सूत्रावर आधारित हा प्रकार उबाठाकडून सुरू केला असण्याची शक्यता आहे. काही का असेना, पण मुख्यमंत्रिपदाच्या लोभात आंधळे झालेल्या काँग्रेस आणि उबाठाला नाही आहे की, अद्याप जनादेश आपल्या बाजूला आलेला नाही. सगळे सर्व्हे आणि एक्झिट पोल हे महायुतीच्या बाजूने दाखविले जात आहेत. सट्टाबाजारात दिलेले दर हे कुठेही जुळत नाहीत; त्यात जमीन-आसमानचा फरक आहे. त्यामुळे काटेकी टक्कर आहे असे म्हणता येईल, अशातला भागदेखील नाही. त्यात फार मोठी तफावत आहे. महायुतीला ते केवळ पैसे तर आघाडीला ६ रुपये देत आहेत. सगळ्या शक्यता आणि संकेतांकडे कानाडोळा करत महाविकास आघाडीतील तीन पक्षांपैकी दोन म्हणजे काँग्रेस आणि उबाठा हे बैठका काय घेत आहेत, रणनीती काय बनवत आहेत, मुख्यमंत्रिपदाचे चेहरे घोषित करण्याची चढाओढ काय चालली आहे, आमदार सुरक्षित ठेवण्याची रणनीती काय आखली जात आहे, नवनियुक्त आमदार संपर्कात येणार नाही, याची काळजी काय घेतली जात आहे, सारं काही हास्यास्पद. बरं; या सगळ्या सर्कसजन्य वागणुकीत काँग्रेस तर उबाठापेक्षा दोन पावलं पुढे निघाली आहे. त्यांनी राष्ट्रीय पातळीवरून उपाययोजना आखण्याची व्यवस्था करणे, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्र्यांची आमदारांच्या सुरक्षेसाठी नेमणूक करणे आणि विजयी आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित स्थळी हलवण्याची आखणे, आमदारांसाठी सुरक्षितस्थळ निवडणे, कदाचित यालाच ‘मुंगेरीलाल के हसीन सपनें’ असे म्हणत असावेत.
Assembly elections : राज्यात मतदान झाल्यानंतर विविध वृतवाहिन्यांनी एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. त्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, सर्वाधिक जागा भाजपाला दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाजपा आणि महायुतीच्या घटक पक्षांच्या गोटात सध्या गुड’चे वातावरण आहे. शिवाय तसाच काहीसा ग्राऊंड रिपोर्ट येत आहे. जेथे लोकसभेत भाजपाचा दारुण पराभव झाला, त्या लोकसभा मतदारसंघातही भाजपा-महायुतीचे घटक पक्ष चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. सर्व स्तरावरून चांगले संकेत येत असताना महायुतीतील घटक पक्ष मुख्यमंत्रिपदावरून मारामारी तर सोडा; साधी चर्चादेखील करण्यात स्वारस्य दाखवताना दिसत नाही. खर्या अर्थाने महाराष्ट्रातील जनता संधी देत असल्याचे सबळ संकेत मिळत असताना, महायुतीचे घटक पक्ष काँग्रेस आणि उबाठासारखा आततायीपणा करताना दिसत नाहीत. भाजपाचे देवेंद्र फडणवीस तर सध्याच्या राजकारणातील चाणक्यच आहेत. ते आपली रणनीती प्रत्यक्षात अमलात येईपर्यंत माहिती होऊ देण्यात माहीर आहेत. पण शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांनीदेखील परिपक्वता दाखविली आहे. या संयमाला आणि राजकीय चातुर्यालाच परिपक्वता म्हणतात. जी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये दिसली नाही; किंबहुना त्यांच्यात नाहीच. त्यामुळेच कशात काही नसताना नाना पटोले, उद्धव ठाकरे गुडघ्याला बाशिंग बांधून फिरताना दिसत आहेत. शिवाय सार्वजनिकपणे स्वतःच्याच अब्रूचे धिंडवडे काढत निघाल्याचे दिसत आहे. उद्या दुपारपर्यंत बेस्ट सीएम व त्यांच्या घरगड्याच्या हास्य आणि उसनं अवसान हे गळून पडेल, यात शंका नाही.
- ९२७०३३३८८६