वेध
- अनिल उमाकांत फेकरीकर
काश्मीरचे नाव काढताच निसर्गरम्य वातावरण डोळ्यांपुढे येते. त्या खर्या जम्मू-काश्मिरात जाण्याची बहुतांश लोकांची मनोमन इच्छा असते. याकरिता ते लोक लाखो रुपये खर्च करून आपली इच्छा पूर्णही करतात. पण मंडळी विदर्भातील काश्मीरकडे भटकतही नाही. असे का व्हावे? याचा विचार करण्याची वेळ प्रत्येकावर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी आणि रामटेक तालुक्यात Kashmir in Vidarbha विदर्भातील काश्मीर वसले आहे. या काश्मीरचा नियोजित विकास करून येथे आपण डॉलरचा पाऊस पाडू शकतो, एवढी ताकद या भागाची आहे. पण सातत्याने होत असलेली उपेक्षा आणि स्थानिकांची निराशा विदर्भातील काश्मीर निसर्गसंपन्न असतानाही मागे पडले आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातील कोलितमारा, कुंवारा भिवसेन, कामठी खैरी येथील पेंच प्रकल्प जलाशय, तोतलाडोह येथील मेघदूत जलाशय, अंबाखोरी, खिंडसी, रामटेक गडमंदिर, नगरधनचा किल्ला, मनसर येथील स्तूप, पारशिवनी येथील ऐतिहासिक तलाव, घोगरा महादेव, कालभैरव पेठ येथील ऐतिहासिक मंदिर, घाटकुकडा, धवलापूर, देवलापार या भागातील निसर्गसौंदर्य दीपवून टाकणारे आहे.
Kashmir in Vidarbha : ज्या व्यक्तीला रामटेक गडमंदिरावर सकाळ पाहायला मिळाली, त्याला येणारी अनुभूती स्वर्गसुख देणारी असते. एवढे तेथील वातावरण आल्हाददायक आहे. मग आपण मागे का पडलो याचे मंथन करायला हवे. पहिले कारण येथील वाहतूक व्यवस्था मजबूत नाही. याकरिता रेल्वे मंडळाशी बोलून तातडीने सेवाग्राम एक्सप्रेस, पॅसेंजर गाड्या आणि इतरही गाड्या येथून सुरू करायला हव्यात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनावर घेतले तर पारशिवनीपर्यंत महामेट्रो येऊ शकते. ती मेट्रो रेल्वे आल्यास पर्यटक वाढतील, पर्यायाने लोकांना जाणे-येणे सोपे होईल. समजा मेट्रो आणणे खर्चीक असल्यास मनसर डुमरी येथून पारशिवनीपर्यंत रेल्वे मार्ग टाकण्यात यावा; जेणेकरून पारशिवनी रेल्वे मार्गाशी जुळेल. त्यात अडचणी आल्यास खापरखेडा पारशिवनीपर्यंत रेल्वे मार्ग आणता येईल. पाहा, इच्छा असेल तर कुठूनही रेल्वे पारशिवनीत येऊ शकते. इच्छा नसेल तर मग काहीच होणार नाही. तसे पाहता पारशिवनी तालुका सन १९८० मध्ये उदयास आला, पण इतरांच्या तुलनेत मागेच पडला. पारशिवनी येथील साधा बसस्थानकाचा विषय वर्षानुवर्षे रखडला होता. पण आता दिवस बदलले आहेत. लोकांना विकास हवा आहे. कुठलीही व्यक्ती प्रतीक्षा करायला तयार नाही.
Kashmir in Vidarbha : ही नव्या युगातील मंडळी वायुवेगाने समोर जाण्यासाठी आसुसलेली आहे. अशा नव्या युगाचा विचार करता सरकारनेही पुढाकार घ्यावा. सरकार समजा तयार नसेल तर त्यांनी खाजगी विश्वासू कंपन्यांना याकरिता नेमावे. रामटेक तालुक्यातील मनसर येथे पर्यटक महर्षी चंद्रपाल चौकसे यांनी स्वबळावर रामधामची निर्मिती लिम्का बुकमध्ये आपले नाव सुवर्ण अक्षराने नोंदविले. त्यांनी तर सरकारकडून मदतही घेतली नाही. मग एक व्यक्ती स्वबळावर एवढे काही करू शकते, तर सरकारने समजा विचार केल्यास चमत्कार घडू शकतो, नाही का? ही सर्व चर्चा करण्याची गरज म्हणजे या भागातील खनिज संपत्ती, वनसंपदा, वनसौंदर्य, वन्यप्राण्यांची वाढलेली संख्या पाहता येथे पर्यटन वाढू शकते. मागे जलसंपदा विभागाने पारशिवनी तालुक्यातील कामठी खैरी येथील पेंच प्रकल्प धरणाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले होते. तेव्हा त्यांनी आहे त्याला विकसित न करता सर्व तोडून धरणासह पिंपळाच्या आकारातील उद्यानाचा सत्यानाश केला. ज्यांनी पिंपळाचे उद्यान पाहिले होते, ती मंडळी आज धरण भागात गेल्यावर अक्षरश: रडतात. एवढी विदारक परिस्थिती पिंपळाच्या आकारातील उद्यानाची केली आहे. ज्या सुपिक डोक्यातून ही कल्पना आली होती आणि ज्यांनी हे काम केले त्यांच्याकडून या नुकसानीची भरपाई करायला हवी. विकास म्हणजे भकास करणे होत नसते. कदाचित त्यांनी तोच विचार केला आणि होतकरू अधिकार्यांसह कर्मचार्यांनी केलेल्या मेहनतीवर पाणी फेरले. विदर्भातील काश्मीरमध्ये वन उपज संपदा भरपूर आहे. त्यावर प्रक्रिया करणारा उद्योगच नाही. नाशिकमध्ये द्राक्षापासून वाईन काढली तर जगमान्यता मिळते. पण विदर्भाच्या काश्मीरमधील लोकांवर मात्र मोहफुलापासून दारू काढल्यास गुन्हा दाखल होतो. यावर गांभीर्याने विचार करून त्यांनाही सनदशीर मार्गाने मोहफुलापासून अर्क काढण्याची परवानगी शासनाने द्यायला हवी. कदाचित तोही चांगला उद्योग या क्षेत्रातील लोकांना लाभदायक ठरेल.
- ९८८१७१७८५९