अर्थचक्र
- कैलास ठोळे
Economic cycle : मोदी सरकारच्या कार्यकाळात मध्यमवर्गीयांवरील कराचा बोजा कमी झाला आहे. विशेषत: २० कमी उत्पन्न असलेल्या मध्यमवर्गावरील कराचा बोजा कमी होत आहे, तर ५० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या प्राप्तिकराचे परतावे दाखल करणार्यांच्या संख्येत पाच पटींनी वाढ झाली आहे. गेल्या दशकात प्राप्तिकर भरणार्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे ही आकडेवारी दर्शवते. सध्याच्या सरकारने लागू केलेल्या करचोरी आणि काळ्या पैशाविरोधातील कडक कायद्यांमुळे करदात्यांची संख्या वाढल्याचे मत आहे. प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनुसार, ५० लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पदन दाखवणार्या लोकांची संख्या २०२३-२४ मध्ये ९.३९ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. हा आकडा २०१३-१४ मधील १.८५ लाखांपेक्षा पाचपट अधिक आहे. ५० लाखांपेक्षा जास्त कमाई करणार्यांचे प्राप्तिकर दायित्व २०१४ मध्ये २.५२ लाख कोटी रुपयांवरून २०२४ मध्ये ९.६२ लाख कोटी रुपयांपर्यंत म्हणजेच पटीने वाढले आहे. भारतीय दुचाकी बाजारासाठीही एक आनंदाची बातमी आहे. केवळ ऑक्टोबर महिन्यात दुचाकींची विक्री २१.६४ लाख युनिट्सवर पोहोचली. ऑक्टोबर २०२३ मध्ये हा आकडा १८.९६ लाख होता. ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स’ने या संदर्भात नवी आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये देशातील एकूण दुचाकी विक्रीत १४.२ टक्क्यांनी वाढ झाली ऑक्टोबर २०२४ मध्ये दसरा आणि दिवाळी या दोन प्रमुख सणांमुळे चांगली खरेदी झाल्याचे ऑटोतज्ज्ञांचे म्हणणे आहे. पारंपरिकपणे, या काळात लोकांना वाहने खरेदी करण्याची इच्छा असते. या उत्सवाचा वाहन उद्योगावर सकारात्मक परिणाम होत आहे.
ऑक्टोबर २०२४ मध्ये ‘पॅसेंजर व्हेईकल’ने ३.९३ लाख युनिट्सची आतापर्यंतची सर्वाधिक विक्री नोंदविली. या दरम्यान तीनचाकी वाहनांच्या गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत ०.७ टक्क्यांची घट झाली आहे. काही बाजार विश्लेषकांच्या मते दुचाकींच्या विक्रीत वाढ होण्याचे कारण ग्रामीण भागातील लोकांचे वाढलेले उत्पन्न आहे. एकूणच, भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाने ऑक्टोबर २०२४ मध्ये विक्रीच्या बाबतीत संमिश्र कामगिरी पाहिली. ‘सियाम’च्या मते, ऑक्टोबरमध्ये भारतात एकूण ३,६७,१८५ प्रवासी वाहनांची निर्मिती झाली. यामध्ये १,२८,०९७ प्रवासी २,२६,९२४ युटिलिटी वाहने आणि १२,१६४ व्हॅनचा समावेश आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये भारतात १,५६,२५० प्रवासी कार, २,१३,३८० युटिलिटी वाहने आणि १२,७५९ व्हॅन्सची निर्मिती झाली. म्हणजेच प्रवासी कार आणि व्हॅनच्या उत्पादनात अनुक्रमे १८ टक्के आणि ४.७ टक्क्यांची घट दिसून आली आहे; परंतु ऑक्टोबर २०२४ मध्ये युटिलिटी वाहनांच्या उत्पादनात ६.३ टक्क्यांची वाढ आली. असाच ट्रेंड देशांतर्गत विक्रीमध्येही दिसून आला आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये २,२५,९३४ युटिलिटी वाहने विकली गेली तर ऑक्टोबर २०२३ मध्ये १,९८,३५६ युटिलिटी वाहने विकली गेली; म्हणजेच १३ टक्के वाढ झाली. ‘ह्युंदाई मोटर इंडिया’ वाहन उद्योगातील तेजीमुळे उत्साहित आहे. वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी ह्युंदाईने अलिकडेच पुण्यात नवीन प्लांट बांधून उत्पादन वाढवली. भारतीय बाजारपेठेचे चित्र लक्षात घेऊन धोरणात्मक उत्पादन केंद्र तयार करत असून मध्य पूर्व, आफ्रिका, दक्षिण आशिया आणि लॅटिन अमेरिकेत वाढणार्या वाहनांच्या मागणीचा फायदा घेण्याची तयारी ह्युंदाई करत आहे.
Economic cycle : दुसरीकडे भारताच्या मोबाईल मार्केटमध्येही विक्रमी व्यवसाय होताना दिसत आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये भारतात बनविलेल्या आयफोन्सच्या निर्यातीचा विक्रम सात अब्ज डॉलरवर आहे. स्मार्टफोन निर्यातीचे मागील सर्व विक्रम मोडीत काढत आयफोन निर्यातीने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांमध्ये (एप्रिल-ऑक्टोबर) ६० हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. याचा अर्थ असा की, दर महिन्याला सरासरी एक अब्ज डॉलरचे आयफोन निर्यात केले जातात. ‘अॅपल’ भारतातून केवळ आयफोन १४, १५ आणि १६ ची निर्यात करत तर यावर्षी ऑक्टोबरमध्ये स्थानिक पातळीवर आयफोन १६ प्रो आणि प्रो मॅक्सचे उत्पादन सुरू केल्यानंतर या मॉडेल्सचीही निर्यात करत आहे. प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेल्सचे मूल्य इतर आयफोन मॉडेल्सच्या तुलनेत सुमारे दीड ते दुप्पट जास्त आहे. त्याच वेळी ‘सायबर मीडिया रिसर्च’ या मार्केट रिरसर्च फर्मने म्हटले आहे की, जुलै-सप्टेंबर तिमाहीमध्ये टॅब्लेट पीसी बाजार वार्षिक आधारावर ४६ टक्क्यांनी वाढला आहे. २० ते ३० हजारांच्या दरम्यान असलेल्या टॅब्लेटच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १०८ टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. ३४ टक्के शेअरसह ‘अॅपल’च्या ‘आयपॅड’ने या विभागाचे नेतृत्व केले.
भारत सौर ऊर्जेच्या क्षेत्रातही सतत वाढ नोंदवत आहे. भारताच्या सौर उत्पादनांची निर्यात दोन वर्षांमध्ये २० पटींनी वाढून दोन अब्ज डॉलर झाली आहे. एका अहवालानुसार, २०२२ ते २०२४ या काळात भारताच्या सौर फोटोव्होल्टेईक (पीव्ही) उत्पादनांच्या निर्यातीत २३ पट वाढ झाली आहे. ‘इन्स्टिट्यूट फॉर एनर्जी इकॉनॉमिक्स अँड फायनान्शियल अॅनालिसिस’ आणि ‘जेएमके रिसर्च अँड अॅनालिसिस’च्या अहवालानुसार भारतातील सौर उत्पादनांच्या क्षेत्रात ही लक्षणीय प्रगती आहे. सोलर पीव्ही निर्यातीसाठी अमेरिका एक प्रमुख बाजारपेठ म्हणून उदयास आली आहे. २०२३ आणि २०२४ या दोन्ही वर्षांमध्ये भारतीय सौर पीव्ही निर्यातीपैकी ९७ टक्क्यांहून अधिक अमेरिकेला गेली. ‘एमएनआरआय’च्या मते, ४५३ गीगावॉटच्या एकूण वीज निर्मिती क्षमतेमध्ये अक्षय ऊर्जेचा वाटा वाढून ४६ टक्के झाला आहे. देशाची एकूण अक्षय ऊर्जा क्षमता २०० गीगावॉटच्या गेली आहे. भारताची अक्षय ऊर्जा क्षमता केवळ एका वर्षात २४.२ गीगावॉट (१३.५ टक्के) ने वाढून ऑक्टोबर २०२४ मध्ये २०३.१८ गीगावॉटवर पोहोचली आहे. दुसरीकडे भारतीय दागिन्यांच्या ई-कॉमर्स मार्केटमध्ये जबरदस्त व्यवसाय होताना दिसत आहे. विक्रेते आणि खरेदीदार ऑनलाईन ई-कॉमर्सचा आनंद घेत आहेत. एका अहवालानुसार, ज्वेलरी ई-कॉमर्स मार्केटने तीन वर्षांमध्ये २२ अब्ज व्यवसाय केला आहे. पुढील दोन-तीन वर्षांमध्ये ऑनलाईन विक्री २० टक्क्यांपर्यंत वाढेल. ती सध्या एक टक्का आहे. सोन्याच्या खरेदीच्या पारंपरिक प्रवृत्तीला मोठे आव्हान पेलावे लागणार आहे, असे या व्यवसायातील तेजीवरून दिसून येते.
Economic cycle : भारतातील सणासुदीने विक्रमी व्यवसाय केला आहे. सणासुदीच्या हंगामातील विक्री १२ टक्क्यांनी वाढून १.१८ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याचे अहवालात आहे. यामध्ये केवळ मोठ्याच नाही, तर छोट्या शहरांचाही समावेश आहे. फॅशनविश्वातील विक्रीमध्ये सर्वाधिक वेगाने वाढ झाल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. सामान्य व्यावसायिक महिन्यांच्या तुलनेत सणांच्या काळात विक्री तिपटीने वाढली आहे. फॅशनशिवाय इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घरगुती वस्तू आणि किराणा मालाची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे. अंतराळ गुंतवणुकीत भारताचे उड्डाण इस्रो भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी एक महत्त्वाची माहिती देताना सांगितले की, ‘इस्रो’ने खर्च केलेल्या प्रत्येक रुपयाला २.५ रुपये परतावा मिळतो. अंतराळ क्षेत्राने २०१४ ते २०२४ दरम्यान सकल देशांतर्गत उत्पादनात ६० अब्ज डॉलरचे योगदान देऊन लाखो रोजगार निर्माण केले आहेत. एस. सोमनाथ म्हणाले की, या कामगिरीवरून हे येते की, अंतराळ क्षेत्रात भारत जगात आघाडीवरचा देश म्हणून उदयास आला आहे. २०२३ पर्यंत भारतीय अंतराळ क्षेत्राचा महसूल ६.३ अब्ज डॉलर्स इतका वाढला आहे. अवकाश क्षेत्राने ४.७ दशलक्ष नोकर्या निर्माण केल्या आहेत. त्यात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील ९६ हजार नोकर्यांचा समावेश आहे. एकंदरीत अनेक आघाड्यांवर देशातील उद्योग आणि सेवा वेगवान वाटचाल सुरू आहे. ही गती पुढील काही वर्षे अशीच सुरू राहण्याची अपेक्षा आहे.