जागतिक शाश्वत वाहतूक दिवस कशासाठी?

    दिनांक :24-Nov-2024
Total Views |
- मेधा इनामदार
 
युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी जागतिक शाश्वत Transportation day वाहतूक दिवस साजरा केला जाईल, असे घोषित केले आहे. २०१६ मध्ये पहिल्या युनायटेड नेशन्स ग्लोबल सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट कॉन्फरन्समध्ये या कल्पनेची बीजे रोवली गेली. संयुक्त संघराष्ट्राने पर्यावरणपूरक वाहतूक आणि इतर प्रकारच्या वाहतूक समस्यांविषयी सार्वजनिक जागरूकता, माहिती आणि ज्ञान वाढवण्यासाठी हा साजरा करण्याचे निश्चित केले आहे. दरवर्षी विविध कार्यक्रमांद्वारे हा दिवस जगभर साजरा केला जातो. रोज विविध प्रकारची वाहने रस्त्यावर येत आहेत. दुचाकीपासून अतिविशाल कंटेनरपर्यंत नानाविध वाहने पेट्रोल आणि डिझेलवर चालतात. या वाहनांमधून उत्सर्जित होणार्‍या वायूंमुळे अनेक धोके निर्माण झाले आहेत. केवळ मनुष्यालाच नव्हे तर पशू-पक्षी आणि अस्तित्वात असलेल्या इतर आणि अदृश्य जीवांनाही त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. सध्याच्या वाहतुकीच्या पद्धती आणि जीवाश्म इंधनावरील आपल्या अवलंबनामुळे पृथ्वीला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचत आहे. पेट्रोल किंवा डिझेलच्या ज्वलनामुळे कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, न जळलेले हायड्रोकार्बन्स आणि पार्टिक्युलेट मॅटर यासारख्या विषारी वायूंचे उत्सर्जन होते. हे प्रदूषक मातीत शिरतात किंवा पाण्याचा पुरवठा दूषित तेव्हा यकृताचे आणि इतर अवयवांचे नुकसान होते. यामुळे कधीही बर्‍या न होणार्‍या जन्मदोषांसह मुले जन्माला येतात. अनेक गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. या सर्व गोष्टी लक्षात येऊ लागल्या तसे यावर उपाय शोधणेही आवश्यक वाटू लागले.
 
 
head02-2ndcoverstory
 
Transportation day : वाहतूक प्रणालींचा पर्यावरणावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. एकूण जागतिक ऊर्जेच्या वापरामुळे निर्माण होणार्‍या उत्सर्जनात कार्बन ऑक्साईडचा २० ते २५ टक्के भाग आहे, असे लक्षात आले आहे. बहुतेक उत्सर्जन ९७ टक्के जीवाश्म इंधनाच्या थेट जळण्यामुळे होते. युरोपियन युनियनमध्ये हरितगृह वायू उत्सर्जनाचा मुख्य स्रोत वाहतूक हाच आहे. २०१९ मध्ये एकूण हरितगृह उत्सर्जन जागतिक उत्सर्जनाच्या सुमारे ३१ टक्के होते आणि युरोपियन देशांचा यातील वाटा २४ टक्के होता. डाय ऑक्साईडसारखे वायू वातावरणात सोडणे, वीजनिर्मिती आणि उष्णता उत्पादनासाठी जीवाश्म इंधन जाळणे यासारख्या क्रियांमधून हरितगृह वायूंचे उत्सर्जन होते. हे हरितगृह वायू इन्फ्रारेड सक्रिय असतात. ते पृथ्वीचा पृष्ठभाग, ढग आणि वातावरण यांच्याद्वारे उत्सर्जित केलेल्या तरंगलांबीच्या श्रेणीमध्ये इन्फ्रारेड रेडिएशन शोषून घेतात आणि उत्सर्जित करतात. त्यामुळे ते हवेत मिसळले जातात आणि हवा होते. कार्बन डाय ऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, हायड्रोफ्लोरोकार्बन्स, ओझोन आणि पाण्याची वाफ यांचा समावेश हरितगृह वायूंमध्ये होतो. कार्बन डाय ऑक्साईड हा मुख्य हरितगृह वायू आहे. वाहतुकीतून हरितगृह वायू उत्सर्जन इतर कोणत्याही ऊर्जा वापरणार्‍या क्षेत्रापेक्षा वेगाने वाढत असल्याचे लक्षात आले आहे. स्थानिक वायू प्रदूषण आणि धुक्याचा धोका निर्माण करण्यातही रस्ते मोठा मोठा वाटा आहे. गेल्या ३०० वर्षांमध्ये कार्बन डाय ऑक्साईडच्या वातावरणीय सहभागात ४५ टक्के वाढ झाली आहे.
 
 
मोटार वाहतुकीमुळे एक्झॉस्ट धुकेदेखील सोडले जाते. त्यात कणयुक्त पदार्थ असतात. ते मानवी आरोग्यासाठी घातक असतात आणि हवामान बदलासाठीही कारणीभूत असतात. वाढत्या वाहनांमुळे रस्ते अपघात, वायू प्रदूषण, शारीरिक निष्क्रियता, प्रवासात वाया जाणारा वेळ, वाढत्या किमती आणि रस्त्यांच्या देखभालीचा खर्च वाढतो. खरे तर गतिशीलता सुधारणे हा पारंपरिक वाहतुकीचा मुख्य उद्देश आहे. परंतु आजची वाहतुकीची स्थिती पाहता हा मूळ उद्देशच अयशस्वी होत आहे. वाहतुकीमुळे होणार्‍या फायद्यांपेक्षा त्यापासून होणारे तोटे अधिक आहेत हे लक्षात आले, तसे सर्व पाश्चिमात्य देश यासाठी एकत्र आले आणि त्यातूनच शाश्वत संकल्पना निर्माण झाली. पर्यावरणावर वाईट परिणाम न करणारे टिकाऊ वाहतुकीचे मार्ग उपलब्ध करणे आणि त्यांचा वापर करण्यासाठी उत्तेजन देणे ही यामागील मुख्य भूमिका आहे. यात रस्ता, पाणी किंवा हवाई वाहतुकीसाठी वापरल्या जाणार्‍या विशिष्ट वाहनांचा समावेश होतो. तसेच विविध प्रकारची आणि विविध मार्गांनी होणारी वाहतूक म्हणजे रस्ते, रेल्वे, हवाई मार्ग, कालवे आणि टर्मिनल या सर्व प्रकारांना सामावून घेण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पायाभूत सुविधा, त्याविषयक ट्रान्सपोर्ट ऑपरेशन्स आणि लॉजिस्टिक्स तसेच ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट यांचाही समावेश केला गेला आहे. प्रदूषण न करणार्‍या वाहतुकीबद्दल लोकांना माहिती देणे, त्यासाठी पूरक वाहनांचा वापर वाढविणे आणि शाश्वत वाहतुकीसाठी योग्य पायाभूत सुविधा निर्माण करणार्‍या गोष्टींचा प्रसार-प्रचार करणे प्रमुख हेतू हा दिवस साजरा करण्यामागचा आहे.
 
 
Transportation day : भारतातील रस्त्यांचे जाळे सुमारे ६६.७१ लाख किलोमीटरपर्यंत पसरले आहे. रस्त्यांच्या बाबतीत संपूर्ण जगात भारताचा दुसरा क्रमांक आहे. सुमारे ६४.५ टक्के मालवाहतुकीसाठी रस्त्यांचा वापर केला जातो तर सुमारे ९० टक्के प्रवासी वाहतूक याच मार्गाने केली जाते. भारतात पेट्रोलचा आणि डिझेलचा वापर दिवसेंदिवस वाढत वाढती लोकसंख्या आणि पायाभूत सोयींची आवश्यकता यामुळे वैयक्तिक आणि सार्वजनिक वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते आहे. २०१३ ते २०२३ या १० वर्षांच्या काळात आपल्या देशातील पेट्रोलचा वापर ११७ टक्के वाढला आहे. आपण सुमारे ८२ टक्के पेट्रोल आणि डिझेल आयात करतो. परंतु भविष्यातल्या संकटांचा विचार करून वेळीच उपाययोजना करण्यासाठी आपल्या पावले उचलली आहेत. पुढील काही वर्षांमध्ये इथेनॉल इंधनाचा वापर वाढवणे आणि ही आयात ६७ टक्क्यांपर्यंत कमी करणे हे आपले ध्येय आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरातही वाढ होते आहे. २०३० पर्यंत इ बाईक्स, ई-कार्सचा वापर वाढविणे आणि सार्वजनिक वाहतुकीतही ई-बसेसचा वापर वाढविणे हे आपले महत्त्वाचे उद्दिष्ट त्यामुळे ई-वाहनांसाठी योग्य रस्ते बनवणे, ई-दुचाकींसाठी विशेष मार्ग राखून ठेवणे, पर्यायी इंधनाचा वापर वाढविणे, रेल्वेसाठी सोलर पॅनलचा वापर करणे अशा प्रकारच्या योजना नजीकच्या भविष्यात राबविण्याचे ध्येय आपल्या देशाने समोर ठेवले आहे. त्यामुळे शाश्वत वाहतूक प्रणालीचा वापर करण्यात भारताचा लक्षणीय वाटा आहे आणि तो गुणांकाने वाढत जाणार आहे, हे निश्चित.
 
 
Transportation day : चा शाश्वत वाहतूक पुरस्कार फ्रान्समधील पॅरिस या शहराला देण्यात आला. यावेळी भारतातील भुवनेश्वरचा उल्लेख अत्यंत सन्मानाने करण्यात आला होता. मोबाईल बसेसचा आणि ई-रिक्षांचा वापर या विषयावर लोकजागृती आणि लोकांचा वाढता सहभाग यामुळे भुवनेश्वरला नुकताच ‘सिटी विथ द बेस्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट’ हा विशेष पुरस्कारही मिळाला आहे. प्रगती आणि प्रदूषणमुक्त जीवन करण्याचे शिवधनुष्य आता सगळ्याच देशांनी उचलले आहे. त्यामुळे अवकाशात साठणारे प्रदूषणाचे काळे ढग नक्कीच नाहीसे होतील. जागतिक शाश्वत वाहतूक दिनानिमित्त शाश्वत वाहतुकीचा अविभाज्य भाग म्हणून सायकलिंगला मान्यता देण्यात आली आहे. युरोपियन सायकलिंग इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच ही संस्था राष्ट्रीय आणि उपराष्ट्रीय सरकारांना आपल्या देशांमधील सायकलिंगसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि सुविधांच्या प्राधान्य देण्याचे आवाहन करते. सायकलिंग इन्फ्रास्ट्रक्चरमधील ही गुंतवणूक अधिक लोकांना सायकलिंग स्वीकारण्यास प्रोत्साहित करेल, अशी कल्पना आहे. सायकलिंगमुळे कार्बन उत्सर्जन कमी होते. सार्वजनिक आरोग्य सुधारते आणि शहरे अधिक स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त होतील. सायकल हे जगभरात उपलब्ध असलेल्या शाश्वत वाहतुकीचे सर्वात जुने आणि लोकप्रिय वाहन आहे. हा वाहतुकीचा एक सहजसोपा तर आहेच; त्याचबरोबर सायकल निरोगी जीवनशैलीकडेही घेऊन जाते. गर्दी आणि वायू प्रदूषणाच्या आव्हानांना हे एक उत्तम उत्तर आहे तसेच कोणतेही वय असो वा सामाजिक किंवा आर्थिक पृष्ठभूमी, सायकल सर्वांसाठी योग्य आणि परवडणारे वाहन आहे. याचबरोबर शाश्वत वाहतुकीच्या दृष्टीने इलेक्ट्रिक वाहने एक चांगला पर्याय आहे. ही वाहने कमीत कमी प्रदूषण आणि उच्च क्षमतेने चालवता येतात.