उत्तम थंडी आणि कृषी अर्थकारण

24 Nov 2024 06:00:00
- डॉ. प्रा. मुकुंद गायकवाड
  ज्येष्ठ अभ्यासक
 
agricultural economics : यंदा पावसाळ्यात उदंड पाऊस झाला असला, तरी अधिकच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे बरेच नुकसानही झाले. दुसरीकडे निवडणुकांमुळे घोषणांचाही मोठा पाऊस पडला. मात्र आताच्या रबी हंगामाचा विचार करता या दोन्हीतून चांगला परिणाम मिळविण्यासाठी विचार तसेच कृती करणे गरजेचे आहे. खरिपामध्ये बहुतेक पिकांचे झाल्यामुळे आता रबी हंगामातून कसे पैसे मिळतील, अधिकची कमाई कशी करता येईल याचे मार्गही शेतकर्‍यांनी तपासून पाहायला हवेत. यंदा थंडी चांगली पडत आहे. म्हणूनच रबी पिकांना असणारी ही अनुकूल स्थिती आश्वासक म्हणावी लागेल. यंदा आंब्याला चांगला मोहोर येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे गहू, हरभरा, वाटाण्यासारखी थंडी आवश्यक असणारी पिकेही खूप येतील. विचार करायचा तर उत्तरेच्या तुलनेत महाराष्ट्रात मोहरीचे पीक घेतले जात नाही. मात्र यंदाची स्थिती बघता शेतकर्‍यांनी मोहरीची लागवड केल्यास त्यांना सुखद बातमी मिळण्याची शक्यता आहे. इथे लक्षात घ्यायला हवे की, आपल्याकडे आधीच तेलबियांची कमतरता आहे. ती भरून काढण्यासाठी आपण ७५ हजार कोटी रुपयांचे खाद्यतेल आयात करत आहोत. या खाद्यतेलाचे भावही वाढताना दिसत आहेत. त्यामुळेच रबीमध्ये शेतकर्‍यांनी तेलबियांची पिके घेतली तर आर्थिक लाभ होऊ शकतोच; खेरीज देशाचे परकीय चलनही वाचू शकते. आपल्याकडे रबीमध्ये घेतले जाणारे तेलपीक फक्त करडई आहे. त्यामुळे त्या बरोबरीने मोहरीच्या पिकाची लागवड केली तर जास्त फायदा मिळू शकेल.
 
 
farmer
 
वाटाण्याचा विचार केला तर आपल्याकडून उत्तरेकडून मोठ्या वाटाणा येतो. मात्र इथेही वाटाण्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्यास शेतकर्‍यांना चांगले पैसे मिळू शकतात. हे लक्षात घेऊन शेतकर्‍यांनी ‘बोन व्हिले’ नामक जातीच्या लागवडीकडे लक्ष द्यायला हवे. उत्तरेकडे लावला जाणारा या जातीचा वाटाणा महाराष्ट्रातही चांगल्या प्रकारे येऊ शकतो. आर्केल नामक जातीचा वाटाणा आपल्याकडे चांगल्या प्रकारे रुळला आहे. तेव्हा त्याचे पीक उत्तम अर्थार्जन साधणे सहजशक्य आहे. मुख्य म्हणजे वाटाणा हे अवघ्या ६० ते १०० दिवसांचे पीक आहे. याचाही शेतकर्‍यांनी लाभ घ्यायला हवा.
 
 
agricultural economics : अलिकडे हरभरा डाळीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. हे लक्षात घेता शेतकर्‍यांनी हरभर्‍याच्या लागवडीवरही लक्ष केंद्रित करायला हवे. असाही आपल्याकडे हरभरा चांगलाच येतो. दोन प्रकारचे हरभरे असतात. मोठा अर्थात काबुली हरभरा तर दुसरा मध्यम आकाराचा. महाराष्ट्रातील बहुसंख्य शेतकरी काबुली हरभरा करत नाहीत. आपल्याकडे प्राधान्याने लहान हरभराच केला जातो. त्यामुळे आता हरभर्‍याची पेरणी करताना शेतकर्‍यांनी काबुली हरभर्‍याचा अवश्य विचार करावा. कारण या हरभर्‍याला अधिक भाव मिळतो. नेहमीचा हरभरा पेरून तेवढे पैसे मिळत नाहीत. हे लक्षात घेऊन या जाती निवडण्याचे काम आता शेतकर्‍यांनी करायला हवे. त्यासाठी पंजाब कृषी विद्यापीठ वा उत्तरेकडील कृषी विद्यापीठांकडून माहिती घेण्यासही हरकत नाही. बियाणे उत्पादकांनीही या जाती महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. नवीन सरकारने यावर भर दिला तर आणखी चांगले होईल. थोडक्यात, हरभर्‍यापासून चांगला पैसा मिळवण्याची ही संधी शेतकर्‍यांनी दवडता कामा विशेष म्हणजे यंदा थंडी चांगली असल्यामुळे चांगल्या प्रतीचा हरभरा येणार आहे. त्यावर घाटी आळी आदी संकट येण्याचा संभव नाही. यावेळी रब्बी पिकांवर कीड आणि रोगांचे प्रमाणही कमी राहणार आहे. त्यामुळेच शेतकर्‍यांनी या हंगामाचा चांगला फायदा करून घ्यावा.
 
 
गव्हाकडे शेतकर्‍यांचा फारसा कल नसतो. या पिकाला जास्त अवधी लागतो. खेरीज पाणीही लागते. पण थंडी चांगली असेल तर गव्हाचे पीक भरघोस येते आणि भावही चांगला मिळतो. खेरीज चांगल्या थंडीमुळे पिकाचा दर्जाही चांगला राहतो. जास्त उत्पादन आल्यामुळे शेतकर्‍यांना चांगला फायदा मिळतो. हे सगळे लाभ लक्षात घेता यंदा शेतकर्‍यांनी गव्हाकडे दुर्लक्ष करता कामा नये. मुबलक पाऊस पडल्यामुळे या वर्षी शेतकर्‍यांच्या विहिरी पूर्ण भरल्या बोअरवेलला भरपूर पाणी आहे. नद्यांना पाणी आहे. या अधिकच्या पाण्याचा उपयोग करून घेत चार पैसे जास्त मिळवून देणारी पिके घेण्याचा विचारच ठेवायला हवा. अर्थात बरेच शेतकरी चांगला नफा मिळवून देणार्‍या जातींबद्दल अज्ञानी आहेत. पिकांच्या जातींबाबत कृषी खाते वा विद्यापीठांकडून आवश्यक तेवढा प्रचार आणि प्रसार केला गेला नाही. त्यामुळेच शेतकर्‍यांनी घेऊन ही माहिती मिळविणे गरजेचे आहे. हे सगळे करत असताना शेतकर्‍यांनी बाजाराचा अंदाजही घ्यायला हवा. उदाहरणार्थ, बाजारात वाटाण्याच्या हिरव्या शेंगांना जास्त पैसे मिळतात. त्यामुळे त्यांची तोड करून हॉटेल व्यावसायिकांना पुरवल्या तर शेतकरी अधिक नफा मिळवू शकतील.
 
 
agricultural economics : शेतकरी सगळी शेतीकामे उत्तम प्रकारे करतो. तो उत्तम मशागत करतो, उत्तम खते घालतो. त्याला बाजार व्यवस्था काही जमत नाही आणि तेथेच तो खरा मार खातो. जसे की, यावेळी कांद्याचे भाव ७० रुपयांवर गेले आहेत. ते आणखी वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. हे लक्षात घेता आता शेतकर्‍यांनी कांद्याबाबत विचार करून निर्णय घ्यायला हवा. कांद्याची निर्यात खुली झाल्याची बाब त्यांनी विचारात घ्यायलाच हवी. कधी नव्हे ते सरकारने शेतकर्‍यांवर उदार होऊन कांद्याची निर्यात खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. हे लक्षात घेता कांद्यापासून फायदा करून घेणे गरजेचे ठरेल. महत्त्वाचे म्हणजे या काळातील कांदा टिकायला चांगला असतो. पावसाळ्यातला कांदा टिकत नसल्यामुळे साठवता येत नाही. मात्र या हंगामातील कांदा साठवता येतो, टिकवता येतो. दुसरे म्हणजे भारत, आणि बांगलादेश कांदा उत्पादनामध्ये अग्रणी असून जवळपासच्या सगळ्या आखाती प्रदेशातील कांद्याची मोठी मागणी भागवून चांगला नफा मिळवणे त्यांना सहजशक्य आहे. म्हणूनच यंदा निर्यातीच्या दृष्टीने शेतकर्‍यांनी फायदेशीर ठरणार्‍या कांदा लागवडीचा विचार केला पाहिजे. पूर्वीप्रमाणे त्यांनी पेरणी करून कांदा करू नये; कारण यामुळे कांद्याचा आकार आणि प्रत हवी तशी राहत नाही. लक्षात घेत निर्यातयोग्य कांदा करण्यासाठी त्यांनी रोपे तयार करूनच कांद्याचे उत्पादन घ्यावे. यामुळे त्यांना उत्तम दर्जाचा चांगला कांदा बाजारात पाठवता येईल. रबी हंगामासाठी कांद्याच्या वेगळ्या जाती आहेत. शेतकर्‍यांनी त्याचाही विचार करायला हवा. या जातीच्या कांद्याचा रंग चांगला असतोच; खेरीज प्रतही उत्तम असते. निफाडच्या कांदा संशोधन केंद्राने अशा जाती शोधल्या तेव्हा माहिती घेत शेतकर्‍यांनी या कांद्याची लागवड केल्यास आर्थिक गणित बसवणे शक्य होईल.
 
 
agricultural economics : आंब्यासाठीही चांगली थंडी पडणे अनुकूल ठरते. आधी उल्लेख केल्याप्रमाणे यंदा थंडी चांगली पडली आहे. हिवाळ्याच्या चार महिन्यांच्या काळात ती चांगलीच राहण्याचा अंदाज आहे. हे लक्षात घेता शेतकर्‍यांनी आंबा पिकाकडेही जातीने लक्ष देणे गरजेचे ठरेल. या काळात आंब्याच्या मोहोराची काळजी घ्यायला हवी, कारण त्यावर रोग पडण्याची शक्यता असते. तुडतुडे, भुरी रोगामुळे मोहोर गळून पडतो. त्यामुळे हा धोका लक्षात घेऊन तसे दिसल्यास योग्य फवारण्या करून मोहोराची काळजी घेतली तर आंब्याचे प्रचंड आणि दर्जेदार उत्पादन घेणे कठीण नाही. निसर्गाची अनुकूल साथ राहिली तर महाराष्ट्रातील शेतकरी देशाचीच नव्हे, तर आंबाशौकिनांची रसनातृप्ती करेल एवढा आंबा पुरवू शकेल. खेरीज आंब्याची निर्यात करून त्यांना चांगले अर्थार्जनही साधता येईल. त्यामुळेच आंबा निर्यातीसंदर्भात वेगवेगळ्या देशांच्या नियमांची, मानांकनांची, प्रतवारीची माहिती घेऊन त्यांच्या निकषांमध्ये बसणारे पीक घेतल्यास शेतकरी मालामाल होणे फारसे अवघड नाही.
Powered By Sangraha 9.0