- भारत-ब्रिटनमध्ये करारावर स्वाक्षरी
नवी दिल्ली,
Electric propulsion systems in warships : भारत आणि ब्रिटनने सामरिक क्षेत्रात सर्वसमावेशक सहकार्याच्या उद्देशाने भविष्यातील युद्धनौकांमध्ये वापरल्या जाणार्या इलेक्ट्रिकप्रणोदन (प्रोपल्शन) प्रणालीच्या सह-डिझाईन आणि सह-उत्पादनासाठी रूपरेषा करारावर स्वाक्षरी केली आहे. प्रस्तावित योजनेच्या आशयपत्रावर दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्रालयांनी गुरुवारी ब्रिटिश पोर्ट्समाऊथमध्ये स्वाक्षरी केली, असे या संदर्भात भारताने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
हे आशयपत्र भविष्यातील नौदल जहाजांसाठी सह-डिझाईन, सह-बांधकाम आणि इलेक्ट्रिक प्रणोदन क्षमतेचे सह-उत्पादन यामधील सहकार्यासाठी एक व्यापक रूपरेखा म्हणून काम करेल. संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लॅण्डिंग प्लॅटफॉर्म डॉक्स भारतीय शिपयार्ड्समध्ये बांधण्याची योजना आहे. संपूर्ण इलेक्ट्रिक प्रणोदन यंत्रणा बसविण्याची कल्पना आहे.
Electric propulsion systems in warships : स्वाक्षरी इलेक्ट्रिक प्रोपल्शन कॅपॅबिलिटी पार्टनरशिपच्या तिसर्या संयुक्त कार्यगटाच्या बैठकीचा एक भाग होता, जे विशिष्ट तंत्रज्ञानाच्या स्वदेशी विकासाला प्रोत्साहन देण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या सामंजस्य करारावर भारताकडून राजीव प्रकाश, संयुक्त सचिव (नौदल यंत्रणा) आणि ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाचे शिप ऑपरेशन्स कॅपॅबिलिटी इंटिग्रेशनचे संचालक रिअर अॅडमिरल स्टीव्ह मॅककार्थी यांनी स्वाक्षर्या केल्या. ब्रिटनच्या भारत-प्रशांत मंत्री कॅथरिन वेस्ट यांच्या भारत भेटीनंतर काही दिवसांनी रूपरेखा करारावर स्वाक्षरी करण्यात आली.