निवडणूक निकालापासून बोध घेत संघटनात्मक त्रुटी दूर करणार

    दिनांक :29-Nov-2024
Total Views |
- काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत मल्लिकार्जुन खडगे

नवी दिल्ली, 
विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून बोध घेत संघटनात्मक त्रुटीत सुधारणा करण्याची आवश्यकता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष Mallikarjun Kharge मल्लिकार्जुन खडगे यांनी आज प्रतिपादित केली. महाराष्ट्र आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्यासाठी आयोजित काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत खडगे बोलत होते. काँग्रेस मुख्यालयात झालेल्या या बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस महासचिव प्रियांका वढेरा आणि अन्य नेते उपस्थित होते.
 
 
Mallikarjun Kharge
 
संघटनेतील नेत्यांत असलेला एकजुटीचा अभाव, परस्परविरोधी विधाने तसेच एक-दुसर्‍यावरील आरोपामुळे काँग्रेसचे नुकसान झाले, लक्ष वेधत खडगे यांनी, काँग्रेस संघटनेत एकजूट राखण्याची आणि पक्षांतर्गत शिस्तीचे पालन करण्याची आवश्यक अधोरेखित केली.
महाराष्ट्र आणि हरयाणातील पराभवामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला, याकडे लक्ष वेधत, दोन्ही राज्यांतील पराभवाची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्याचे संकेत खडगे यांनी दिले. जुन्या पद्धतीने राजकारण करून नेहमीच यश मिळू शकत नाही, जाणिव काँग्रेसच्या नेत्यांनी ठेवावी आणि आपल्या वागणुकीत सुधारणा करावी, निवडणुकीच्या तयारीत झोकून द्यावे, असे आवाहन खडगे यांनी केले.
 
 
ईव्हीएममुळे निवडणूक प्रणाली संशयास्पद झाली, असा आरोप करीत, स्वतंत्र आणि नि:ष्पक्ष वातावरणात निवडणुका घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे आणि आयोगाने ही जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे ते म्हणाले. जोपर्यंत आम्ही एक निवडणूक लढवणार नाही, आपसातील हेवेदावे दूर ठेवणार नाही, तोपर्यंत सत्ताधारी पक्षाच्या आव्हानाचा मुकाबला करू शकणार नाही. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी गटबाजी दूर करीत एकत्र आले पाहिजे, असे Mallikarjun Kharge खडगे म्हणाले. लोकसभा निवडणुकीनंतर वातावरण आमच्या बाजूने होते, पण ही बाब निवडणुकीतील विजयाची हमी होऊ शकत नाही. अनुकूल वातावरण मतांत रुपांतरित करता आले असे ते म्हणाले.
आपसोबत आघाडी नाही
दरम्यान, बैठक अर्ध्यावरच सोडून विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका वढेरा बैठकीतून निघून गेल्यामुळे चर्चा सुरू झाली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाशी आघाडी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, काँग्रेस दिल्लीतील सर्व ७० जागा स्वबळावर लढणार असल्याचे दिल्ली प्रदेश काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी बाहेर आल्यानंतर सांगितले.