मनसेने वाचवली उबाठाची अब्रू!

30 Nov 2024 17:00:44
मुंबई वार्तापत्र
- नागेश दाचेवार
Raj Thackeray : ‘एक तर तू राहशील नाहीतर मी...’, ‘राजीनामा दे आणि निवडणुकीला समोर जा’, ‘मी ठाण्यात येऊन लढतो नाहीतर तू वरळीत येऊन लढ...’, ‘गद्दारांनो, खरे मर्द असाल तर निवडणुकीला सामोरे जा, पाठीत खंजीर काय आईचं दूध पिलं असेल तर मैदानात या, समोरासमोर लढा...’ असले काही बाप-लेकांचे डॉयलॉग ३० जून २०२२ पासून २३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत महाराष्ट्राच्या कानावर सतत पडत राहिले. त्यानंतर दोन वेळा अर्थात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकले तेव्हा ठाकरेंच्या भाषेतील गद्दारांनीच बाजी मारली. पण, लोकसभेवेळी काँग्रेसने आणि विधानसभेवेळी नवनिर्माण सेनेने थोडीथोडकी अब्रू उबाठा अर्थात उद्धव ठाकरेंची वाचविली. लोकांच्या जिवावर मिळालेली तेवढीच यांची उपलब्धी.
 
 
Raj thakare
 
लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुस्लिम मतदारांनी केंद्रात भाजपा, मोदी नकोत म्हणून काँग्रेसला मतदान करण्याचा निर्णय घेतला आणि मोठ्या संख्येने मतदान केले. यात उबाठा काँग्रेससोबत असल्याने उबाठाला मत म्हणजे काँग्रेसला मत असे समजून मुस्लिमांनी उबाठाच्या उमेदवाराला मते दिली. त्यामुळे स्ट्राईक रेट अत्यंत वाईट असला, तरी उबाठाचे ९ खासदार निवडून आले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांचे ७ खासदार निवडून आले. मात्र, यांचा स्ट्राईक रेट चांगला होता. त्याहीपेक्षा गमतीची बाब म्हणजे, गद्दारांना आव्हान देणार्‍या ठाकरेंशी १३ जागांवर गद्दारांचा थेट सामना झाला; तेथे ७ जागांवर गद्दारांनी बाजी मारली. अर्थात शिंदे एक पाऊल पुढेच निघाले... पण आकड्यात ९ जागा दिसत असल्याने आणि महाविकास आघाडीचा २९ असा मोठा फुगलेला आकडा दिसल्याने, जणू काही ठाकरेंचाच विजय असल्यासारखे ठाकरे आणि त्यांची चेले कंपनी वावरू लागली होती. खरी शिवसेना आमचीच, जनतेने कौल दिल्याच्या आविर्भावात वावरताना उबाठाचे लोक दिसले. त्यांचा आत्मविश्वास एवढा वाढला की, सहा महिन्यांवर असलेली विधानसभा निवडणूक आजच जिंकल्याचा समज करून बसले होते. अधिकारी-कर्मचारी तसेच पोलिसांनादेखील उद्धव ठाकरे आणि चेले कंपनी, आमची सत्ता येत आहे.
 
 
 
Raj Thackeray : तुम्हाला बघून घेतो, अशा धमक्या देताना दिसत होते. निवडणुकीला बराच कालावधी असताना यांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वीच निवडणूक जिंकल्याच्या आत्मविश्वासात मग निवडणूक आयोगासह न्यायालयालाही हे लोक क्षुल्लक समजायला लागले होते. न्यायालयाने फक्त तारीख पे तारीख दिली, पण न्याय दिला नाही. ‘आता आम्ही यांच्याकडे अपेक्षा न ठेवता थेट जनतेच्या न्यायालयात आलो आहे. खरी शिवसेना कोणाची, हे आता जनताच ठरवेल’ची भाषा हे बोलू लागले. मग जेव्हा विधानसभा निवडणूक झाली आणि निकाल लागले तर, जनतेने ५७ जागा एकनाथ शिंदेंच्या पदरात टाकून, खरी शिवसेना शिंदेंचीच असल्याचा कौल दिला. मात्र, जनतेचा कौलसुद्धा मानायला ठाकरे अ‍ॅण्ड कंपनी तयार नाही. ते घटनात्मक संस्थांचा अवमान तर सातत्याने करतच आले; आता १५०० रुपयांसाठी विकले गेले असली भाषा करत जनमताचा अनादर करण्याइतकी मजल यांची गेली आहे. यावेळी उद्धव ठाकरेंना जनतेने त्यांची दाखवली. त्यांना केवळ २० जागा दिल्या. पण त्यादेखील दिल्या असे म्हणता येणार नाही. कारण केवळ १० जागा जनतेने दिल्या तर अन्य १० जागांवर ठाकरेंना लॉटरी लागलेली आहे. उद्धव ठाकरेंना अतिरिक्त मिळालेल्या १० जागांची ही लॉटरी राज ठाकरेंमुळे लागलेली आहे. ज्यांना संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, त्याच संपलेल्या पक्षाने यावेळी उद्धव अब्रू काहीअंशी वाचवली आहे.
 
 
‘राजीनामा दे आणि निवडणुकीला सामोरे जा, मी ठाण्यात येऊन लढतो नाहीतर तू वरळीत येऊन लढ...’ असे आव्हान देणारा आदित्य ठाकरे हा मनसेनेमुळे काठावर पास झालाय्. लोकसभेत एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उभे करायला उबाठाला उमेदवार मिळत नसताना धरून बांधून कुठून तरी आणून उभा केला. पण उमेदवार नाही म्हणून आव्हान देणारे पिता-पुत्र यापेैकी कोणीही शिंदेंच्या अर्थात गद्दाराला धडा शिकवायला मैदानात उतरले नाही किंवा उतरण्याची हिंमत केली नाही. त्यावेळी नाहीतर नाही, विधानसभेत तरी गद्दारांना धडा शिकवायला पाहिजे होतं. गद्दार तर वरळीत आले नाही अर्थात त्यांनी मी येतो असे आव्हानदेखील दिले नव्हते. पण ज्यांनी होते, त्यांनी ठाण्यातून एकनाथ शिंदेविरुद्ध निवडणूक लढण्याची हिंमत दाखविली नाही. मुळात शिंदे बाप-लेक निवडणुकीच्या मैदानात मर्दासारखे उतरतात, तर ठाकरे बाप-लेक फुकटच्या बेंडकुळ्या दाखवत तोंडानेच फुशारक्या मारत फिरत असल्याचे, या दोन्ही निवडणुकीच्या निमित्ताने सिद्ध झाले. ‘हात पैर में दम नहीं, पर मुजोरी में कम नहीं...’ अशी एक गावाकडची प्रचलित म्हण जी या दोघा बाप-लेकांना तंतोतंत लागू होते.
 
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांमुळे उद्धव ठाकरेंचे मुंबईमधील १० उमेदवार विजयी झाले. मुंबईतील माहिम, वरळी, विक्रोळी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, वर्सोवा, कालिना आणि वांद्रे पूर्व या महत्त्वाच्या जागा मनसेमुळे ठाकरेंच्या पारड्यात पडल्या. माहिममध्ये ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी शिवसेनेच्या सदा सरवणकरांचा केवळ १३१६ पराभव केला. सरवणकरांना ४८,८९७ मते मिळाली. तेथे मनसे उमेदवार तथा Raj Thackeray राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंना ३३,०६२ मते मिळाली तर महेश सावंत यांना ५०,२१३ मते मिळाली. येथे मनसे नसती तरी शिवसेना उमेदवाराचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला असता. वरळीत मनसेच्या संदीप देशपांडेंनी १९,३६७ मते घेतली. तेथे आदित्य ठाकरे केवळ ८ हजारांच्या विजयी झाले. सकाळी उठून मोठमोठ्या गप्पा करणारे संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांच्या विजयाच्या फरकाची मते नेमकी मनसेच्या उमेदवाराने घेतली आहे. वांद्रे पूर्व विधानसभा आणि दिंडोशीमध्येदेखील नेमकी फरकाची मतेच मनसेने घेतल्याने उबाठा उमेदवार विजयी झाला आहे. जोगेश्वरी पूर्वमध्ये उबाठाचे उमेदवार १५४१ मतांनी विजयी झाले आहेत. तेथे मनसे उमेदवार अंबुरे यांनी १२,८०५ मते घेतली. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवार मनीषा वायकर यांचा ७५,५०३ मते घेऊनही पराभव झाला. वर्सोवामध्ये ठाकरेंचा उमेदवार केवळ १६०० मतांनी विजयी झाला असून येथे मनसे उमेदवाराला ६७५२ मते मिळाली आहे. कालिना विधानसभेत विजयातील अंतर ५००८ असून मनसेची मते ७७५२ एवढी आहे. वणी विधानसभेत विजयातील अंतर १५,५६० मते मनसेची मते २१,९७७ आहेत. सातत्याने अतिशयोक्ती हावभाव, अंगविक्षेप करून बोलणारे भास्कर जाधव हे गुहागर विधानसभेत काठावर पास झाले आहेत. त्यांच्या विजयातील अंतर केवळ २८३० असून मनसे उमेदवाराने ६७१२ मते घेतली आहेत. याचा अर्थ नाकाने कांदे सोलणारे आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, संजय राऊत असो किंवा मग स्वतः उद्धव ठाकरे यांची खर्‍या अर्थाने राज ठाकरेंनी वाचविली आहे, असे म्हणायला हरकत नाही. अन्यथा महाराष्ट्रातील जनतेने यांचे कपडेसुद्धा उतरवायची तयारी केली होती, असेच एकंदरीत चित्र या निकालाच्या निमित्ताने दिसते. 
 
- ९२७०३३३८८६
Powered By Sangraha 9.0