ब्रिक्स शिखर परिषदेने काय साधले?

    दिनांक :05-Nov-2024
Total Views |
आंतरराष्ट्रीय
- वसंत गणेश काणे
BRICS Conference ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ ऑक्टोबर २०२४ ला कझान येथे दाखल झाले असता त्यांचे पारंपरिक रशियन पाककृतींनी स्वागत करण्यात आले. कझान हे तिसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. या क्षेत्रातून एक प्रवासी १५ व्या शतकात भारतात येऊन गेल्याची नोंद व त्या अर्थाचा स्तंभ दक्षिण भारतात आहे.
 
 
modi
 
‘इस्कॉन’ने केले मोदींचे स्वागत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘इस्कॉन’च्या कार्यकर्त्यांनीही संस्कृतमधील गीत, रशियन नृत्य आणि कृष्ण भजन गात हॉटेल कॉर्स्टन येथे जंगी स्वागत केले. यावेळी अनेकांनी मोदींसोबत ‘सेल्फी’ही घेतल्या. रशियातील निसर्गरम्य कझान येथे २३/२४ ऑक्टोबरला ब्रिक्सची बैठक झाली. ब्रिक्स ही सुरुवातीला दक्षिण आफ्रिका वगळता ब्राझील, रशिया, भारत, चीन यांची संघटना होती. पुढे दक्षिण आफ्रिकेचा समावेश झाल्यानंतर ‘ब्रिक्स’मध्ये अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिआ, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती हे सहा नवीन देश सामील झाल्यामुळे तिची समावेशकता आणि महत्त्व यात वाढ झाली आहे तसेच या निमित्ताने एकत्र आलेले नेते फावल्या वेळात ज्या एकमेकांच्या भेटी घेतात व चर्चा करतात, त्यांनाही खूप महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच पार पडलेल्या ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना झारखंडातील ‘सोहराई पेंटिंग’ ही कलाकृती भेट दिली तर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेदेश्कियान यांना ‘मदर अ‍ॅाफ पर्ल्स (एमओपी) सी-शेल फूलदाणी’ भेट दिली. उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शौकत मियोदेव यांना भेट दिलेली वारली पेंटिंग्ज तर ५००० वर्षे जुनी आहेत.
 
 
युक्रेन : युक्रेन प्रकरणी लवकर तोडगा निघणे आवश्यक झाले आहे. BRICS Conference  लोकसंख्या रशियाशी युद्ध सुरू झाल्यानंतर वेगाने कमी झाली आहे. मुळातच युक्रेनमधील जन्मदर युरोपात सर्वात कमी होता. अनेक तरुणांनी नशीब आजमावण्यासाठी युक्रेन सोडून इतरत्र स्थलांतर केले आहे. काहींनी तर चक्क पलायन करीत देश सोडला आहे. ‘एक महिला एक मूल’ अशी स्थिती सध्या युक्रेनमध्ये आढळते आहे. लोकसंख्या स्थिर राहण्यासाठी एक महिला मुले असे प्रमाण असावे लागते. म्हणून सध्या सुरू असलेला संघर्ष जेवढा लवकर थांबेल तेवढे चांगले. रशिया-युक्रेन संघर्ष शांततापूर्ण मार्गाने सोडवला पाहिजे आणि त्यासाठी भारत सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान सांगितले. हा मुद्दा शांततेच्या मार्गानेच सोडवला जावा, असे म्हणाले. मानवतेला प्राधान्य देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. सर्व मुद्यांवर चर्चा करण्याची आपल्याला संधी आहे, ही संधी साधण्यात मुत्सद्दीपणा आहे, असे मोदी यांनी बजावले. युक्रेनसोबतचा वाद शांततेच्या मार्गाने सोडवला पाहिजे, असा भारताचा आग्रह आहे आणि त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यास आम्ही तयार असल्याच्या भूमिकेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला. १६ व्या ‘ब्रिक्स’ परिषदेच्या पृष्ठभूमीवर मोदी आणि पुतिन यांची कझान येथे भेट झाली. त्यावेळी त्यांनी युक्रेन संघर्षाप्रश्नी पुन्हा एकदा भारताची भूमिका मांडली. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आणि संयुक्त राष्ट्राच्या नियमावलीच्या आधारे संघर्षाचे शांततापूर्ण निराकरण करण्याच्या उद्देशाने मध्यस्थी करण्यास भारताने नेहमीच प्राधान्य दिले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी जुलैमधील मोदी यांच्या मॉस्को दौर्‍यादरम्यान झालेल्या आठवण करून दिली आणि त्यांचे निमंत्रण स्वीकारल्याबद्दल आणि ब्रिक्स परिषदेसाठी कझानला आल्याबद्दल आभार मानले.
 
 
व्यापार : जगाच्या विविध भागांमध्ये युद्ध किंवा युद्धजन्य स्थितीमुळे उभे राहिलेले तणाव आणि जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने व्यापारातील अडचणींच्या पृष्ठभूमीवर रशियात होत असलेल्या ‘ब्रिक्स’ देशांच्या शिखर परिषदेकडे यंदा जगाचे विशेष लक्ष होते. कझानमध्ये आपण कार्यात आणखी सुधारणा करण्याच्या व सहकार्य बळकट करण्याच्या उद्देशाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले पाहिजेत, असे मत रशियाने नोंदविले. रशिया-भारत संबंध ही एक विशेष भागीदारी असून ती दिवसेंदिवस अधिकाधिक दृढ होते आहे. आमचे परराष्ट्रमंत्री सतत भारताच्या संपर्कात आहेत. व्यापाराची उलाढाल सुस्थितीत आहे, असे पुतिन म्हणाले. मोठे प्रकल्प सातत्याने विकसित केले आहेत. कझानमध्ये भारताचा वाणिज्य दूतावास सुरू करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. रशियात भारताची राजनैतिक उपस्थिती वाढल्यास द्विपक्षीय संबंध अधिक व्यापक होतील, असेही त्यांनी नमूद केले.
 
 
ब्रिक्स : BRICS Conference ब्राझील (खनिज संपन्न देश), रशिया (औद्योगिकदृष्ट्या प्रगत देश), भारत (विकसनशील विशाल देश) आणि चीन (प्रगत व विशाल देश) या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या सन २००६ मध्ये झालेल्या बैठकीत या गटाची स्थापना झाली. २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकाही (हिरे व सोन्याच्या खाणी असलेला आणि पुरोगामी विचारांची कास धरलेला देश) या गटात सहभागी झाला. या देशांच्या आद्याक्षरांच्या आधारे या संघटनेला ‘ब्रिक्स’ असे नाव देण्यात आले. जगातील ४२ टक्के लोकसंख्या आणि एकूण जागतिक उत्पन्नात २७ टक्के असलेल्या जागतिक स्तरावरच्या उगवत्या अर्थव्यवस्थांच्या देशांनी एकत्र येण्यामागे विविध उद्देश होते. राजनैतिक, आर्थिक आणि सांस्कृतिक सहकार्य, जागतिक व्यापाराला चालना तसेच विकसनशील देशांची फळी मजबूत करणे आणि परस्पर व्यापार, गुंतवणूक व अन्य क्षेत्रांतील सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘ब्रिक्स’चा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. ‘जी-७’ या गटास भविष्यकालीन पर्याय म्हणूनही या पाहतात. ‘ब्रिक्स’ समूहाने सन २०१४ मध्ये पायाभूत सुविधा आणि विकास योजनांना अर्थसाह्य देण्याच्या उद्देशाने ‘न्यू डेव्हलपमेन्ट बँके’ची स्थापना केली. कारण जागतिक बँकेच्या कर्ज देण्याच्या अटी खूपच कडक होत्या. आता परस्परांत विज्ञान, उद्योग, शेती आणि नवे तंत्रज्ञान या क्षेत्रांत सहकार्य वाढीस लागले आहे. जागतिक व्यासपीठांवर विकसनशील देशांचा आवाज मजबूत करण्यात मोठा वाटा आहे. शिखर परिषदेत जागतिक आर्थिक परिस्थिती, विकास, स्थैर्य आणि सुधारणांबाबत आढावा घेण्यात आला. परस्पर व्यापार आणि गुंतवणूक वाढविण्यासाठी नव्या योजना मांडण्यात आल्या. यावेळी सध्या भेडसावत असलेल्या सुरक्षा प्रश्नांवरही चर्चा अपेक्षित होती, ती तशी झाली. दहशतवाद, सायबर सुरक्षा हेही महत्त्वाचे मुद्दे होते तसेच आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण संरक्षण विचारविनिमय झाला. ब्रिक्स शिखर परिषदेसाठी कझानसारख्या सुंदर शहराला भेट देण्याची संधी मिळणे ही माझ्यासह इतर सर्वांसाठीही अतिशय आनंदाची बाब आहे. या शहराशी भारताचे खोल आणि ऐतिहासिक संबंध आहेत. कझानमध्ये भारताचे वाणिज्य दूतावास सुरू झाल्याने हे संबंध आणखी दृढ होतील, असे मोदी म्हणाले. एकीकडे रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे तर दुसरीकडे व गाझा यांच्यातील युद्धाची धग कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्या पृष्ठभूमीवर रशियाच्या विरोधात उभी असलेली अमेरिका आणि युरोपीय देशांचे या परिषदेतील रशिया व अन्य देशांच्या विशेषतः रशियाशी मैत्री असलेल्या भारताच्या भूमिकेकडे विशेष लक्ष आहे. दुसरीकडे मध्यपूर्वेतील देशांची भारताशी अधिक जवळीक होण्याची शक्यताही दिवसेंदिवस वाढते आहे. 
 
- ९४२२८०४४३०