केवळ चिंतन करून काय उपयोग?

05 Nov 2024 06:00:00
अग्रलेख...
Pollution : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. नागपूर, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये असलेल्या रुग्णालयांमध्ये कर्करोगाने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या पाहिली तर अंगावर शहारे येतात. पूर्वी कर्करोग झाला की, प्रचंड भीती व्यक्त केली जायची. कारण, मृत्यूच डोळ्यांपुढे दिसायचा. आज परिस्थिती बदलली आहे. उपचार उपलब्ध आहेत. मृत्यूला काही काळ रोखण्याची क्षमता आपण निर्माण केली आहे. पूर्वी धूम्रपान आणि मद्यपान करणार्‍यांनाच कर्करोग होत असे. पण, आता तर कुणालाही कर्करोग होतो आहे. आपण जे अन्नधान्य खातो, भाज्या व फळे खातो, ती पिकविण्यासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा वापर केला जातो, हे कर्करोगाचे प्रमाण वाढण्यामागील एक प्रमुख असल्याची चर्चा आहे. अशी चर्चा सुरू झाल्यापासून सेंद्रिय शेती करण्याचा आग्रह केला जात आहे, त्यावर भर दिला जात आहे, ही आनंदाची बाब असली तरी आता फार विलंब झाला आहे. असे असले तरी अजूनही वेळ गेलेली नाही. कृषी, आरोग्य आणि पर्यावरण हे परस्परपूरक विषय आहेत आणि हे तीनही विषय संवेदनशील यावर अधूनमधून साधकबाधक चर्चा होत असते. पण, केवळ चर्चा करून काम भागायचे नाही.
 
 
kitnashak
 
आपल्याला सर्व प्रकारांचे Pollution प्रदूषण थांबवायचेच आहे, शिवाय जैवविविधताही टिकवून ठेवायची आहे. आज प्लॅस्टिक प्रदूषणाने जगाला विळखा घातला आहे. त्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करायचे आहेत. पूर्वी लोकसंख्या कमी होती. विज्ञान-तंत्रज्ञानात प्रगती झालेली नव्हती. उपलब्ध संसाधने भरपूर होती. उपयोग मर्यादित होता. शेतीही नैसर्गिक पद्धतीनेच केली जायची. सेंद्रिय खते वापरात होती. रासायनिक खतांचा वापर नव्हताच. पण, काळ पुढे जात गेला, लोकसंख्याही वाढली, त्यामुळे गरजाही वाढल्या. वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा वापर वाढू लागला. आता तर अशी परिस्थिती आहे की, नैसर्गिक संसाधने कधी संपतील याची राहिलेली नाही. अमर्याद वापर झाल्याने पृथ्वीवरील संकटे दिवसेंदिवस वाढत आहेत. पूर्वी शेतीसाठी शेणखताचा वापर केला जायचा. आता शेणच उपलब्ध होत नसल्याने रासायनिक खतांचा मारा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. रसायनांचा अतिरेकी वापर होत असल्याने जमिनीचा कस तर कमी होत आहेच, मानवाच्या आरोग्यावरही त्याचे गंभीर परिणाम होत आहेत. कॅन्सरसारखा आजार सामान्य झाला आहे. पूर्वी कॅन्सर अपवादानेच कुणाला होत असे. पण, आता जगभरात असंख्य लोक कॅन्सरने ग्रस्त आहेत. मानवाच्या प्रतिकार शक्तीवरही रसायनांनी आघात केला आहे. वाढत्या लोकसंख्येने वाढविलेल्या गरजा भागविण्यासाठी मानवाने निसर्गाचेही अमर्याद दोहन केले आहे. त्याचे परिणाम आज आपण सगळेच भोगत आहोत. कोरोनाच्या भयाने संपूर्ण जग त्रस्त आणि भयभीत असताना नैसर्गिक संसाधनांच्या अतिवापरावर चिंतन-मंथन होणे गरजेचे आहे. कीटकांपासून पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी रासायनिक औषधांची फवारणी करीत असतात. अनेकदा फवारणीचा अतिरेक होतो. त्याचे दुष्परिणाम आज संपूर्ण जग भोगत आहे. शेतकरी जे कीटकनाशक फवारतात, त्यापैकी केवळ एक टक्का फवारणी ही कीटकांना मारण्यासाठी उपयोगात येते. बाकी ९९ टक्के फवारणीचे हे हवेत, भूगर्भातील पाण्यात, जमिनीवरच्या मातीत मिसळतात. यामुळे पृथ्वीवरील प्रदूषण वाढते आहे. कीटकनाशकांमध्ये जे विष असते, त्या विषामुळे जगभरातील २५ लाख लोक दरवर्षी प्रभावित होतात आणि त्यातले किमान सव्वादोन ते अडीच लाख लोक मृत्युमुखी पडतात. आज भारतावर प्रदूषणाचे मोठे संकट घोंघावते आहे. प्रदूषणाने होणारे नुकसान हे प्रचंड असते. पिकांवरही विपरीत परिणाम होतो. प्रदूषणापासून पिकांवर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी हा अनेक उपायांमधला एक उपाय असू शकतो. तसेही आपल्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून कीटकनाशकांची फवारणी केली जात आहे. जगभरातले देश पिकांवरील कीड घालवण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. बहुतांश देशांमध्ये रसायनांचा उपयोग केला जातो. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेने कीटकनाशकांचा वापर कमी करत अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
 
 
Pollution : युरोपातील अनेक देशांमध्येही गेल्या चार-पाच दशकांमध्ये रसायनयुक्त कीटकनाशकांचा वापर फार कमी प्रमाणात केला जातो. त्यांनी प्रयत्नपूर्वक हे साध्य केले आहे. परंतु, दुर्दैवाने कीटकनाशके तयार करणार्‍या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतासारख्या विकसनशील देशांना लक्ष्य करून आपली उत्पादने प्रचंड प्रमाणात खपवली आहेत. त्यामुळे भारतात आजही मोठ्या कीटकनाशकांचा वापर केला जातो आणि त्याचा विपरीत परिणाम शेतकरी आणि शेतमजुरांच्या आरोग्यावर तर होतोच, पण जे लोक रसायनयुक्त अन्नधान्य सेवन करतात, त्यांच्या प्रकृतीवरही होत आहे. आपल्याला कायम त्रास देणार्‍या शेजारच्या चीनमध्येही १९८३ सालापासून डीडीटी, एचसीएच यासारख्या कीटकनाशकांवर बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही एकट्या चीनमध्ये कीटकनाशकांमुळे किमान पाच लाख दरवर्षी प्रभावित होत असतात आणि त्यापैकी एक लाख लोकांचा मृत्यू होतो, हे लक्षात घेतले पाहिजे. ही बाब लक्षात घेता भारतातील शेतकर्‍यांनी स्वत:हून पुढाकार घेत रसायनयुक्त कीटकनाशकांचा वापर शक्य होईल तेवढा कमी करणे आवश्यक झाले आहे. आपल्या देशात कीटकनाशकांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते आणि उपयोगही तेवढाच केला जातो. अमेरिका, जपान चीननंतर भारत हा कीटकनाशकांची निर्यात करणारा चौथा मोठा देश मानला जातो. यावरून आपल्याला परिस्थितीची कल्पना सहज यावी. भारतीय कीटकनाशक उद्योग जगात बाराव्या क्रमांकावर आहे. दरवर्षी १ लाख ४० हजार टन एवढे कीटकनाशकांचे उत्पादन भारतात केले जाते. ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, नेदरलॅण्ड्स, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, मलेशिया यासारख्या देशांना भारताकडून कीटकनाशकांची निर्यात जाते. अमेरिका स्वत: कीटकनाशकांचे उत्पादन करीत असला तरी भारताकडून आयातही करतो, हे आश्चर्यकारक आहे आणि यावरून एक अंदाज आपल्याला येईल की, या देशात कीटकनाशकांचा वापर किती मोठ्या प्रमाणात केला जातो.
 
 
 
Pollution : अमेरिकेने अनेक कीटकनाशके प्रतिबंधित केली असली आणि वापर ३५ टक्क्यांपर्यंत कमी केला असला तरी अजूनही हा देश एवढ्या मोठ्या कीटकनाशके वापरतो आहे, हे अनाकलनीय आहे. एकूणच सगळी परिस्थिती आणि वाढते प्रदूषण लक्षात घेता संपूर्ण जगाने कीटकनाशकांचा वापर आणि उत्पादन अत्यल्प केले पाहिजे, ही काळाची गरज आहे. गाई-म्हशींचे जे शेण आहे, त्यापासून जर सेंद्रिय खत बनविले तर शेतीसाठी ते अधिक फायदेशीर ठरू शकते. आपण पिकांना जी खतं देतो, तीसुद्धा असल्याने आणि मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने जे नुकसान होते, ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ही बाब लक्षात घेता सेंद्रिय खते वापरण्याकडे आपला कल असला पाहिजे. जनावरांना आपण जो चारा खाऊ घालतो, त्यापैकी त्यांनी न खाल्लेला जो भाग असतो तो, जनावरांचे मलमूत्र एकत्र करून त्यापासून मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खत केले जाऊ शकते. भारतात तर गाई-म्हशींची संख्या भरपूर आहे. गाय ही आमच्यासाठी माता आहे, असे जे पंतप्रधानांनी म्हटले आहे, त्याचेही कारण आहे. शेतातही मोठ्या प्रमाणात पालापाचोळा गोळा होतो. त्यामुळे सेंद्रिय खत तयार करण्यासाठी लागणार्‍या साहित्याची कधीच कमी पडणार नाही. शेणाचा वापर हा फक्त आणि फक्त खत तयार करण्यासाठीच करायचा, निर्धार सगळ्यांनी केला आणि ग्रामीण भारतात गोवर्‍यांना पर्याय ठरू शकेल, असा इंधनाचा स्रोत उपलब्ध करून दिला गेला तर शेणाचा वापर पूर्णपणे खतासाठीच केला जाऊ शकेल, यात शंका नाही. 
 
Powered By Sangraha 9.0