वेध
- नंदकिशोर काथवटे
Affidavit : वचने ही पाळण्यासाठी दिली जातात. एखाद्याने वचन दिले की, ते पूर्ण करण्यासाठी मग जीवाची बाजी लावली जाते, हे इतिहासाने अनेकदा सिद्ध केले आहे. म्हणूनच वचनाला तितकेच महत्त्व आहे. मात्र काय गंमत आहे ना! सत्तेत येण्यासाठी राजकीय पक्ष सर्रासपणे वचननाम्यातून बोलू लागले आहेत. सत्तेत येण्यासाठी कोण काय करतील, किती खोटे बोलतील याचा आपण अंदाजही बांधू शकत नाही. पूर्वी राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्याकडे विश्वासाने बघितले जात होते. तो केवळ जाहीरनामा नसून जनतेला दिलेला वचननामा आहे, हे तितक्याच विश्वासाने सांगितले जात होते. सत्तेत आल्यानंतर त्या त्या राजकीय पक्षांकडून लोकांना दिलेली वचने पाळली होती. एखादी गोष्ट निवडणुकीदरम्यान आपल्या पक्षाने वचननाम्यात लिहिली असेल तर ती सत्तेत आल्यानंतर आपल्याला पूर्ण करायची आहे, याची भीती राजकीय पक्षांना होती. मात्र, आता राजकीय पक्षांचे चित्र फार विचित्र झाले आहे. त्यांची परिस्थिती पार बदलून गेली आहे. सत्तेत आल्यानंतर आपण जनतेला काय वचने दिली होती, ती कधी पूर्ण करणार ती पूर्ण करण्यासारखी आहेत का, याचे भान सत्तेत आल्यानंतर राजकीय पक्षांना नसते. कुठल्या पक्षाच्या वचननाम्यावर विश्वास ठेवायचा? कारण वचननाम्यातील वचने हल्ली पाळलीच जात नाही.
Affidavit : निवडणुकांपूर्वी ‘घोषणांचा पाऊस’ पाडणार्यांना सत्तेत आल्यानंतर विसर पडतो आणि मग सर्वत्र दिसतो तो दुष्काळ. नंतर राजकीय पक्षांना केवळ धुंदी चढते ती सत्तेची! सत्तेच येण्यासाठी जवळपास राजकीय पक्ष जी वचने पाळता येत नाही, ज्या गोष्टी करणे शक्य नाही, ज्या गोष्टींमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडणार आहे अशा गोष्टी वचननानाम्यात सर्रासपणे नमूद करीत असतात. काही राजकीय पक्ष जनतेशी बांधिलकी जोपासत आपल्या वचननाम्यातील काही गोष्टी तरी पाळण्याचा प्रयत्न करतात. त्यातल्या त्यात भारतीय जनता पक्षाने वचननाम्यातील काही गोष्टी पाळण्याचा केला आहे. मात्र, साधारणत: वचननाम्यातील वचने पाळली जात नाहीत, हे खेदाने नमूद करावेसे वाटते. विधानसभेच्या निवडणूक निमित्ताने सध्या राजकीय पक्ष आपापल्या पक्षाचा जाहीरनामा जनतेपुढे मांडू लागले आहेत. जाहीरनामा कसला घोषणांचा पुरता पाऊस आहे. सत्तेत आल्यास मुलांना मोफत शिक्षण देऊ, असे सांगून उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या वचननाम्यात पाच महत्त्वाच्या घोषणा आहेत. यामध्ये महागाईमुळे जनता त्रस्त असून डाळी, खाद्यतेल यासह पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार, महिला पोलिसांची भरती, स्वतंत्र पोलिस ठाणे उभारणार, शेतमालाला हमी भाव देऊ, प्रत्येक जिल्ह्यात तसेच सुरतमध्येही छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारू यासह अनेक घोषणांचा पाऊस त्यांनी आपल्या वचननाम्यातून पाडला आहे.
Affidavit : अडीच वर्षांपूर्वी उबाठाचे नेते उद्धव मुख्यमंत्री होते. त्यावेळी तर ते घरात बसून होते. त्यांना मंत्रिमंडळात काय चालले आहे, हे देखील माहिती होत नव्हते. आता परत सत्तेत आल्यास अमुक करू, तमुक करू म्हणून सत्तेसाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. महाविकास आघाडीने अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या विकासाचा खोडा घातला. मोठमोठे आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीचा रचलेला अडीच वर्षांतच कोसळला. त्यानंतर सत्तेत आलेल्या महायुतीनेही लोकांना निराश केले. यावेळी महायुतीनेही घोषणांचा पाऊस पाडला आहे. लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला १५०० वरून २१०० रुपये देणार, महिला सुरक्षेसाठी २५ हजार महिलांना पोलिस दलास समावेश करणार, शेतकर्यांना कर्ज माफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला १२ हजारांवरून १५ हजार रुपये देणार, प्रत्येक अन्न आणि निवारा देणार, अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला १५ हजार रुपये देणार, सरकार स्थापनेनंतर व्हिजन महाराष्ट्र-२०२९ चा आराखडा १०० दिवसांच्या आत जाहीर करणार यासह कितीतरी आश्वासने महायुतीने जनतेला दिली आहेत. महाविकास आघाडीला खाली खेचून महायुती सत्तेत आल्यानंतर या वचननाम्यातील काही गोष्टी महायुतीने केल्या आहेतही; मात्र इतर वचनांचे काय? आल्यानंतर १०० दिवसांच्या आत महाराष्ट्राचे व्हिजन सांगणारा आराखडा तयार करणार्या सरकारला हे आधीदेखील करता येऊ शकले असते. मात्र, सत्तेत आल्यानंतर या वचनांकडे पाठ फिरविली जाते. वचनांचा हा कागद राजकीय पक्ष पायदळी तुडवून केवळ स्वार्थाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू ठेवतात. जनतेला दिलेली वचने, घोषणांचा पाऊस सत्तेत आल्यानंतर त्यांना दिसत नाही. डोळ्यावर पट्टी असते ती मग्रुरीची, बेपर्वा, बेलगाम वृत्तीची. त्यामुळे वचननाम्यातील वचने तशीच राहतात कोरडी, शुष्क आणि पाषाण बनून. वचननाम्यातील वचने यावेळी तरी सत्तेत आल्यानंतर सत्ताधार्यांना पाळण्याची ईश्वर सुबुद्धी देवो, इतकेच आपण म्हणू शकतो.
- ९९२२९९९५८८