इम्फाळ,
'Save Manipur' : लष्कराला विशेषाधिकार देणारा आफ्स्पाला मुदतवाढ तसेच जिरिबाममध्ये संशयित कुकी बंडखोरांनी तीन मुलांसह सहा जणांच्या केलेल्या हत्येच्या निषेधार्थ मणिपूरची राजधानी इम्फाळ येथे मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो लोक सहभागी झाले.
पश्चिम इम्फाळ थाऊ मैदावरून सुरू झालेला हा मोर्चा पाच किमीचे अंतर कापून खुमान लम्पक स्टेडियममध्ये संपला. ‘मणिपूरला नष्ट करू नका’, ‘मणिपूर वाचवा’ अशा घोषणा असलेली फलके त्यांच्या हाती होती. आफ्स्पा मागे घेण्यात यावा, अशी मागणीही मोर्चेकर्यांनी केली.
'Save Manipur' : ऑल मणिपूर युनायटेड क्लब्ज ऑर्गनायझेशन, पोइरेई लीमारोल पेइबी अपुन्बा मणिपूर, ऑॅल मणिपूर वुमन व्हॉलंटरी कमिटी ऑन ह्युमन राईट्स अॅण्ड मणिपूर स्टुडन्ट्स फेडरेशनने संयुक्तपणे हा मोर्चा मानवी हक्क दिन साजरा करण्यासाठी काढला. मानवी हक्क दिनानिमित्त आम्ही प्रतिज्ञा करू इच्छितो की, मणिपूरचे लोक राज्यात आफ्स्पा लादण्याच्या विरोधात तसेच कुकी आणि झो यांच्याकडून निष्पाप महिला आणि मुलांच्या हत्येच्या विरोधात ठामपणे उभे राहण्यासाठी काढण्यात आला, असे महिला एस. निरुपमा म्हणाल्या.