अवैध वाळू वाहतूक

13 Dec 2024 19:32:36
- तीन ट्रक महसूल पथकाच्या ताब्यात
- राळेगाव तहसीलदारांची दमदार कारवाई

राळेगाव, 
Illegal sand transportation : देशातील खनिज संपत्तीची लूट करण्याचा कोणालाही अधिकार नाही. पण रेती तस्करांनी विविध झारीतील शुक‘ाचार्यांना पाणी देत राळेगावात मक्तेदारी निर्माण केली आहे. या मक्तेदारीला मोडीत काढण्यासाठी उपविभागीय महसूल अधिकारी विशाल खत्री यांच्या आदेशांनुसार, तहसीलदार अमित भोईटे यांनी गुरुवार, १२ डिसेंबरला दोन कारवायांत वर्धा नदीपात्रातून अवैध उत्खनन केलेल्या ३ रेती तस्कर वाहनांवर कारवाई केली. या अचानक कारवाईमुळे तालुक्यातील वाळू तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले.
 
 
reti chor
 
राळेगाव शहरात गुरुवारी रात्री ८.३० वाजता पहिल्या कारवाईत तहसीलदार अमित भोईटे, नायब तहसीलदार महादेव सानप, तलाठी गिरीश खडसे व बंडू तिरणकर यांनी अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले. तर दुसर्‍या कारवाईत बरडगाव येथे रात्री १०.३० वाजता तहसीलदारांसह मंडळ अधिकारी अनिल कणसे, मोहन सरतापे यांनी अवैध रेती वाहतूक करणारा ट्रक पकडला. या तिन्ही वाहनांना रेती तस्करी करीत असताना रंगेहात पकडले. या वाहनांमध्ये एकूण ११ ब‘ास रेती होती. या प्रकरणी महसूल विभागाने २ लाख ५७ हजार ५७० रुपयांचा दंड ठोकला असून तस्करीतील वाहने जप्त केली आहेत.
पोलिस करतात काय ?
राळेगाव तालुक्यात वर्धा नदीपात्रातून रेतीची अवैध होत असताना महसूल पथकाद्वारे अनेक कारवाया करण्यात आल्या. अशा कारवाया होत असताना राळेगावातील पोलिस करतात काय, असा प्रश्न विचारला जात आहे. पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरून ट्रॅक्टर व टिप्परद्वारा Illegal sand transportation रेती अवैध वाहतूक होत असताना पोलिसांकडून आतापर्यंत एकही कारवाई झालेली नाही, हे उल्लेखनीय.
रोज कारवाई हवी
Illegal sand transportation : या परिसरात चोरटी रेती वाहतूक होते. महिन्यातून एक-दोनदा दिखाऊ कारवाई करायची व त्यानंतर शेकडो रेती तस्कर वाहने कशी राजरोस जातात, असा लोकांचा प्रश्न आहे. महामार्गावर उभे पोलिस कामाचे नसल्यानेच हे रेतीट्रक मोठा महसूल बुडवतात. अमर्याद रेती उपशाने पर्यावरणाचे प्रचंड नुकसान झाले असून कोट्यवधींचा महसूलही बुडाला आहे. रेतीच्या गोरखधंद्यातून अनेक ‘मालामाल’ झाले पोलिस व महसूल पथकाने रोज कारवाई केल्यास रेती चोरांची हिंमतच होणार नाही, हे निश्चित.
Powered By Sangraha 9.0