-प्रत्येक व्यक्ती सुसंस्कृत व्हावी
- नितीन गडकरी
- पद्मश्री काजोल यांची उपस्थिती
नागपूर,
KHASDAR MAHOTSAV : नागपूर, नव्हे तर देशभरात नावलौकिक झालेल्या तसेच कलागुणांचा संगम असलेल्या प्रसिद्ध खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मश्री काजोल यांच्या हस्ते आज थाटात उद्घाटन झाले. प्रख्यात अभिनेत्री पद्मश्री काजोल यांना पाहण्यासाठी हनुमाननगर क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे पटांगण उपस्थितांनी फुलून गेले होते.
व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संस्कार भारतीच्या कांचन गडकरी, सारंग गडकरी, ह्युंदाई सीडीचे जिओलिक ली, पूनित आनंद, महिंद्रचे अभिजित कळंब, जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर, माजी खा. दत्ता मेघे, कृपाल तुमाने, आमदार प्रवीण दटके, चरणसिंह ठाकूर, कृष्णा खोपडे, माजी आ. गिरीश गांधी, नागो गाणार, सुलेखा कुंभारे, मल्लिकार्जुन रेड्डी, अशोक मानकर, बंटी कुकडे व इतर प्रामुख्याने उपस्थित होते. गडकरी यांनी काजोल यांची आजी प्रसिद्ध अभिनेत्री शोभना समर्थ, पती अजय देवगण, आई तनुजा, मावशी नूतन यांचा उल्लेख करताना त्यांच्या कार्याचा गौरव केला व महोत्सवाला हजेरी लावल्याबद्दल आभार मानले.
KHASDAR MAHOTSAV : जनतेची सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती व परंपरागत मूल्ये कला व लोकप्रबोधनाच्या माध्यमातून सर्वदूर पोहचावी, हा या महोत्सवाचा हेतू आहे. महोत्सवाचा उद्देश मनोरंजन करणे हा नसून तळागाळातील प्रत्येक व्यक्ती यशस्वी, आत्मविश्वासपूर्ण व सुसंस्कृत व्हावी हा आहे. रस्ते, वीज, दळणवळण यासोबतच साहित्यिक व सांस्कृतिक दर्जा वाढल्यानंतरच शहराचा विकास होतो. अनेक कलाकारांच्या उपस्थितीने हा महोत्सव फुलतो व प्रतिष्ठेचा होतो. यंग टॅलेंटला वाव देणारा हा उत्सव जनतेच्या आवड व आनंदाचा ठेवा आहे, भावोद्गार गडकरी काढले.
प्रेम व सन्मानाबद्दल कृतज्ञ - काजोल
KHASDAR MAHOTSAV : पीत-चंदेरी वस्त्रात आलेल्या कुशल अभिनयसंपन्न व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या अभिनेत्री काजोलने मराठीत भाषणाची सुरुवात करताच रसिक सुखावले. काजोल यांची उपस्थिती व लाघवी बोलण्याने श्रोते मंत्रमुग्ध झाले. कलाविष्कार बघण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगत, अतूट प्रेम व सन्मानासाठी त्यांनी नागपूरकरांबद्दल कृतज्ञता व्यक्तकेली. नितीन गडकरी यांच्या कार्याचे करताना या महोत्सवामुळे हजारो कलावंताना मंच उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. हर्षन कावरे या कलाकाराने काढलेल्या त्यांच्या रांगोळीचे कौतुक करीत काजोल यांनी फोटो काढून घेतला.
नितीन गडकरी व कांचन गडकरी यांच्या हस्ते काजोल यांचा पैठणी देऊन सत्कार करण्यात आला. संचालन रेणुका देशकर व बाळ कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक प्रा. अनिल यांनी केले.