वेध
- नीलेश जोशी
Parbhani incident : संघटित हिंदू शक्तीचा हुंकार नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक निकालातून प्रकट झाला. जातीय तेढ निर्माण करणार्यांना या निकालाने उत्तर दिले. त्याचा आनंद वाटत असतानाच पुन्हा जातीय तेढ निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरणार्या दोन घटना महाराष्ट्रात घडल्या. त्यातील एक घटना बीड जिल्ह्यातील तर दुसरी परभणी येथील आहे. सामाजिक स्वास्थ्य निकोप राहावे यासाठी धडपडणार्या, सामाजिक समरसता हा समाजाचा स्वभाव व्हावा म्हणून प्रयत्न करणार्या प्रत्येक संस्था, व्यक्तीचे मन विषण्ण करणार्या या आहेत. पण ज्या-ज्या वेळी हिंदू समाज संघटित होतो त्या-त्या वेळी नेमक्या अशा घटना का घडतात, हा निव्वळ योगायोग की षडयंत्र असा स्वाभाविक प्रश्न आता निर्माण झाला आहे.
Parbhani incident : परभणी येथे एका माथेफिरूने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली. संविधानावर श्रद्धा असलेल्या प्रत्येकाचेच मन या घटनेने संतप्त झाले. जनांची तत्काळ प्रतिक्रियाही उमटली. पोलिस प्रशासनाने देखील संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान करणार्या माथेफिरूला लगेचच अटक केली. त्यानंतरही या घटनेमुळे प्रक्षुब्ध झालेल्या विविध संघटनांनी बंद पुकारला. अवघ्या परभणीत या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद होता, असे असतानाही दुपारच्या सुमारास परभणी येथे तोडफोड, जाळपोळ करण्यात आली. हा विध्वंस करणारे नेमके कोण असा प्रश्न आता होत आहे.
दुसरी घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडली. तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला. त्यामुळे तेथील नागरिक चिडले. त्यांनी रास्ता रोको करीत न्यायाची मागणी केली. या दोनही घटना अत्यंत निंदनीय आहेत. या घटनांमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई शक्य तितक्या लवकर यात कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. पण या घटनांआडून समाजात जातीय तणाव निर्माण करण्याचा कुणाचा प्रयत्न आहे का? याचाही सखोल आणि सूक्ष्म तपास करण्याची गरज आहे. खरं म्हणजे गत काही वर्षांत राज्यात जाती-जातीत संघर्ष, तेढ निर्माण व्हावा अशी षडयंत्रे रचली जात असल्याचे विविध घटनांवरून दिसून येते. हिंदू समाजात मराठा, दलित असा भेद गडद व्हावा, संघटित हिंदू विभाजित व्हावा असे प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांमध्ये कथित पुरोगामी, स्वयंघोषित लिबरल, सर्वधर्मसमभावाचे पुरस्कर्ते म्हणवणार्या राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे दिसून येते. हिंदुत्व विचार असणारी शक्ती सत्तेत येऊ नये यासाठीच या सार्यांची धडपड सुरू होती. त्यांच्या कृतीमुळे महाराष्ट्रातील समाज जीवनावर किती आणि दूरगामी परिणाम होऊ शकतात हे कळत असूनही केवळ द्वेषभावनेतून हे सारे प्रयत्न हेतुपुरस्सर केले गेल्याचे अनेकवेळा उघड झाले. कोरेगाव भीमा प्रकरणात न्यायालयाने नोंदविलेले निरीक्षण, या प्रकरणातून समोर आलेले अर्बन नक्षल नेटवर्क हे सर्वांच्याच स्मरणात असेल.
Parbhani incident : महाराष्ट्र नेहमीच देशाची वैचारिक आणि सांस्कृतिक भूमिका घट्ट करण्यात अग्रेसर राहिला आहे. छत्रपती महाराज, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह अनेकांनी देव, देश आणि धर्म हा विचार रुजविण्यासोबतच अठरा पगड जातींचे संघटन उभारून कृतीतून सामाजिक समसरतेचा भाव द़ृढ केला. या समरसतेच्या विचाराला नख लावल्याशिवाय आपली पोळी भाजता येणार नाही याची कल्पना असलेले अनेक जण आणि या राष्ट्राचा सर्वांगीण विकास होऊ नये, असे वाटणार्या शक्ती नेहमीच जातीय विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न करतात. पण संघटित हिंदुत्वाच्या शक्तीने उभारलेले राममंदिर आणि याच शक्तीच्या आधारावर गत १० वर्षांपासून राष्ट्राच्या विकासासाठी धडपडणारे केंद्र शासन ही या विरोधी शक्तींना मिळालेली चपराक आहे. त्यातच लोकसभेला थोड्याशा यशाने हुरळून जाऊन व्होट जिहादसह जातीय विद्वेष पसरवून यश मिळेल असे वाटणार्यांचे मनसुबे संघटित धुळीस मिळविले. कदाचित म्हणूनच पुन्हा जातीय तेढ निर्माण करणार्या शक्ती काही षडयंत्र तर रचत नाही ना अशी शंका निर्माण व्हावी अशा घटना घडत आहेत. मात्र, समाजाने या शक्तींना उत्तर देण्यासाठी समरसता हा भाव अधिक द़ृढ करून हिंदुत्वाची, राष्ट्रीयत्वाची ज्योत प्रखर करण्याची गरज आहे.
- ९४२२८६२४८४