- श्रीशा वागळे
World Chess : भारत हा बुद्धिबळाचा जन्मदाता आणि याच भारतभूमीच्या सुपुत्राने बुद्धिबळाचा सर्वांत युवा जगज्जेता होण्याचा मान पटकावणे ही तमाम भारतवासीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे. बुद्धिबळातले आशास्थान असणार्या डोमाराजू गुकेशने ही अलौकिक अशी कामगिरी करून दाखवली आहे. सिंगापूर येथे पार पडलेल्या जागतिक बुद्धिबळ लढतीत गुकेशने गतविजेत्या डिंग लिरेनवर १४ व्या डावात ५८ चालींमध्ये विजय मिळवला. ही लढत ७.५-६.५ अशी जिंकत त्याने जगज्जेतेपद पटकावले. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्याने ही कामगिरी करून दाखवली. सिंगापूरच्या भूमीवर जगज्जेतेपदाची लढत सुरू झाल्यानंतर सार्या बुद्धिबळजगताचे लक्ष त्याकडे लागून राहिले होते. डिंग लिरेन आपले जगज्जेतेपद राखणार की युवा डी. गुकेश त्याची मक्तदारी मोडून काढणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर गुकेशने संयमी खेळाचे दर्शन घडवत बाजी मारली. गुकेश हा विश्वनाथन् आनंदनंतरचा दुसराच भारतीय जगज्जेता. त्यामुळे त्याच्या या विजयाला एक कोंदण आहे. २५ नोव्हेंबरला जगज्जेतेपदाची ही लढत सुरू झाली. लिरेन आणि गुकेशमध्ये तब्बल सतरा दिवस जगज्जेतेपदासाठीचा लढा सुरू होता. गुकेशने या काळात संयम, विजिगीषुवृत्ती, एकाग्रता यांचे प्रभावी दर्शन घडवले. आपले चित्त कधीही विचलित होऊ दिले नाही. पहिल्या डावात पराभूत झाल्यानंतरही त्याने आत्मविश्वास ढळू दिला नाही.
तेराव्या डावात गुकेश आणि यांनी ६.५-६.५ गुण मिळवत बरोबरी गाठली होती. त्यानंतर चौदाव्या डावात लिरेनने केलेल्या चुकीचा लाभ उठवत गुकेशने जगज्जेतेपदाचे स्वप्न साकार केले. या संपूर्ण डावात गुकेशने आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण खेळ केला. त्याने कोणतेही दडपण घेतले नाही. दुसरीकडे लिरेन टायब्रेकरवर अतिविसंबून राहिल्याचे दिसून आले. त्याची मानसिक तंदुरुस्तीही काहीशी ढासळलेली होती. त्याने या बचावात्मक पवित्र्यावर अधिक भर दिला होता. मात्र गुकेशकडे लिरेनच्या प्रत्येक चालीची उत्तरे होती. ती त्याने दिली आणि लिरेनला चेकमेट केले. विजय समोर दिसू लागताच गुकेशच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. विजेतेपदानंतर त्याने वडिलांना मिठी मारून अश्रूंंना वाट मोकळी करून दिली. गुकेशने जगज्जेतेपदाचे स्वप्न पाहिले होते. मात्र त्याच्यासह संपूर्ण भारत हे स्वप्न असे म्हणणे वावगे ठरणार नाही. बुद्धिबळ म्हटले की आपल्यासमोर विश्वनाथन् आनंदचे नाव येते. आनंदने भारतीय बुद्धिबळाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. २०१२ मध्ये आनंदने शेवटचे जगज्जेतेपद पटकावले. त्यानंतर तब्बल बारा वर्षांनी एका भारतीयाने हे जगज्जेतेपद पटकावले आहे. विश्वनाथन् आनंदनंतर कोण याचे उत्तर गुकेशने आपल्या प्रभावी खेळाने देऊन टाकले आहे. काळात गुकेश हा विश्वनाथन् आनंदचा वारसा चालवणार आहे. भारताच्या शिरपेचात अनेक तुरे खोवले जाणार आहेत.
World Chess : गुकेशने आज जगज्जेतेपद पटकावले असले तरी त्याचा इथपर्यंतचा प्रवास संघर्षपूर्ण राहिला आहे. ७ मे २००६ रोजी चेन्नईमध्ये जन्मलेल्या गुकेशने वयाच्या सातव्या वर्षापासूनच बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्याने भास्कर नेगैय्या यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. त्याला खुद्द विश्वनाथन् आनंदचे मार्गदर्शन लाभले. गुकेशचे वडील डॉक्टर तर आई मायक्रोबायोलॉजिस्ट, पण गुकेशचे मन बुद्धिबळातच रमले. आई-वडिलांनीच गुकेशच्या गुणवत्तेला प्रोत्साहन दिले. मुलाने बुद्धिबळात नाव कमवावे यासाठी त्यांनीही अथक प्रयत्न केले. घरात शैक्षणिक वातावरण असूनही आई-वडिलांनी गुकेशला शिक्षणातून सूट दिली. चौथीनंतर तो नियमितपणे शाळेत जात नसे. त्याने आपले सगळे फक्त आणि फक्त बुद्धिबळावर केंद्रित केले. बुद्धिबळ हाच त्याचा ध्यास आणि श्वास बनला. गुकेश बुद्धिबळाच्या पटलावरील एक एक चाली शिकत गेला. व्यावसायिक बुद्धिबळ खेळू लागल्यानंतर गुकेशने शाळेची वार्षिक परीक्षाच दिली नाही. मात्र बुद्धिबळाची परीक्षा तो उत्तम गुणांनी उत्तीर्ण होत राहिला. मुलाला बुद्धिबळ स्पर्धांसाठी देश-विदेशात नेण्याची जबाबदारी वडिलांनी घेतली. त्यामुळे काही काळ दवाखाना बंद करावा लागला. तेव्हा घरखर्च चालवण्याची जबाबदारी आईने स्वीकारली. मात्र त्यांनीही हार मानली नाही. सुरुवातीच्या काळात प्रायोजकांअभावी गुकेशला परदेश दौर्यांदरम्यान आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. परदेशातल्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी त्याच्या आई-वडिलांना अनेकदा कर्जही घ्यावे लागले. मात्रा आता जगज्जेतेपद पटकावत त्याने परिश्रमाचे आणि आई-वडिलांच्या त्यागाचे चीज केले.
युवा गुकेशने बुद्धिबळजगतात अनेक कारनामे केले आहेत. लहान वयापासूनच तो आपल्या गुणवत्तेची, प्रतिभेची चुणूक दाखवत आला आहे. २०१५ मध्ये वयाच्या नवव्या वर्षी त्याने नऊ वर्षांखालील मुलांची आशियाई शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. २०१७ मध्ये वयाच्या अकराव्या वर्षी तो आंतरराष्ट्रीय मास्टर बनला. २०१८ मध्ये बारा वर्षांखालील विभागात त्याने जागतिक युवा स्पर्धा जिंकली. २०१९ मध्ये त्याने ग्रँडमास्टर किताब पटकावला. यावेळी त्याचे वय होते फक्त १२ वर्षे, ७ महिने आणि १७ दिवस. तो बुद्धिबळ जगतातला दुसरा युवा ग्रँडमास्टर बनला. एप्रिल २०२४ मध्ये वयाच्या सतराव्या वर्षी त्याने फिडे कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. अशी कामगिरी करणारा तो सर्वांत युवा बुद्धिबळपटू ठरला. गुकेश सातत्याने एक एक पायरी चढत होता. अनेक विक्रम रचत होता. वरिष्ठ पातळीवरही गुकेशने स्वत:ला सिद्ध केले. २०२१ मध्ये त्याने ज्युलियन बेयर चॅलेंजर्स बुद्धिबळ गेलफँड चॅलेंज जिंकले. यात त्याने १९ पैकी १४ गुण मिळवले. २०२२ मध्ये एमचेस रॅपिड स्पर्धेत त्याने मॅग्नस कार्लसनला पराभूत केले होते. कार्लसन जगज्जेता झाल्यानंतर त्याला पराभूत करणारा हा सर्वांत कमी वयाचा खेळाडू होता.
World Chess : २०२३ मध्ये बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय गुणतालिकेत २७५० गुण मिळवणारा गुकेश हा सर्वांत युवा खेळाडू ठरला होता. याच वर्षी भारतीय बुद्धिबळपटूंच्या पहिल्या दहा खेळाडूंच्या यादीत विश्वनाथन् आनंदला मागे टाकले होते. ३७ वर्षांमध्ये पहिल्यांदाच विश्वनाथन् आनंद पहिल्या दहा खेळाडूंच्या यादीतूून बाहेर गेला होता. गुकेशने यंदा चमकदार केली. त्याने फिडे कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा तर जिंकलीच शिवाय सप्टेंबर महिन्यात त्याच्या सहभागात हंगेरीत झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकले होते. गुकेशने वैयक्तिक सुवर्णपदक जिंकत जगज्जेतेपदाची आपली दावेदारी अधिक बळकट केली होती. ऑलिम्पियाडमधल्या दहापैकी आठ सामन्यांमध्ये गुकेशने विजय मिळवला होता तर त्याचे दोन सामने बरोबरीत सुटले होते. त्याच्या चालींना प्रतिस्पर्ध्याकडे उत्तर नव्हते. या युवा बुद्धिबळपटूने स्पर्धेच्या दहाव्या फेरीमध्ये अमेरिकेच्या तिसर्या मानांकित फॅबिआनो कारुआनाचा पराभव केला होता. या कामगिरीमुळे गुकेशच्या जगज्जेतेपद मिळवण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. गुकेश जगज्जेेता होणार याची खात्री त्याच्या चाहत्यांना वाटू लागली होती. गुकेशनेही चाहत्यांचा विश्वास ढळू दिला नाही आणि जगज्जेतेपद पटकावून आपण ‘लंबी रेस घोडा’ असल्याचे दाखवून दिले.
World Chess : विश्वनाथन् आनंदने पाच वेळा बुद्धिबळाचे जगज्जेतेपद पटकावले आहे. डी. गुकेशचे जगज्जेतेपद ही फक्त एक सुरुवात आहे. गुकेश अठराव्या वर्षी बुद्धिबळाचा अठरावा जगज्जेता ठरला आहे. हा खरे तर एक योगायोगच म्हणावा लागेल. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी जगज्जेतेपद पटकावून गुकेशने गॅरी कास्पोरोव्हचा विक्रम मोडला आहे. कास्पारोव्हने १९८५ वयाच्या बाविसाव्या वर्षी हे यश मिळवले होते. गुकेश त्याच्यापेक्षा चार वर्षांनी लहान आहे. गॅरी कास्पारोव्हचा विक्रम कोणी मोडू शकेल, असे वाटले नसेल. मात्र भारताच्या गुकेशने तो मोडला. वयाच्या बाविसाव्या वर्षापर्यंत तो अजून बरेच काही साध्य करू शकतो. गुकेशला या वयापर्यंत अजून दोन जगज्जेतेपदाच्या लढती खेळायला मिळण्याची शक्यता आहे. गेली ते बारा वर्षे नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने बुद्धिबळ जगतावर अधिराज्य गाजवले. आता गुकेशची पाळी आहे. त्याने कमी वयात मोठे यश मिळवले आहे. त्याच्याकडे अजून बरीच वर्षे आहेत. गुकेश दृढनिश्चयी आहे. त्यामुळे येत्या काळात तो बुद्धिबळाचा अनभिषिक्त सम्राट ठरणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. गुकेशने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे करावे कौतुक कमीच आहे.