कानोसा
- अमोल पुसदकर
Maharashtra Assembly Election : अनपेक्षितपणे महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये भरघोस यश मिळाले. इतके मिळाले की, राष्ट्रवादी आणि शिंदे सेना यांचे डोळे फाटून गेले. भाजपाला २०१४ मध्येसुद्धा १२२ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे जागा त्यांना जास्त मिळाल्या. त्यांचे डोळे फाटून जाण्याचे काही कारणच नाही. पहिल्यांदाच स्वतःच्या बळावर लढणारी शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना मात्र या भरघोस यशामुळे आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटले. ज्या ज्या वेळेला अशा लोकांना भरपूर जागा मिळतात त्यावेळेला त्यांना या आम्हाला स्वबळावर मिळालेल्या आहेत, असा भास होतो, होतो. परंतु भारतीय जनता पार्टीचे हिंदुत्ववादी, सनातन धर्माला मानणारे, देशाची चिंता करणारे लाखो मतदार निमूटपणे त्यांना आवडत असो अथवा नसो तरी शिंदे सेना आणि अजित पवार यांना मतदान करतात. हा भाजपाच्या वैचारिक अधिष्ठानाचा परिणाम आहे. परंतु, इतके मोठे यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री ठरवायला भाजपाला बरेच दिवस लागले.
शिंदे मी नाराज म्हणत होते तरी त्यांच्या दाढीमागची नाराजी लक्षात येत होती; किंबहुना महाराष्ट्रातील जनता गेले काही दिवस झाले हे सर्व नाराजीनाट्य बघत होती. जरी शिंदे म्हणाले की, आमच्यात सर्व काही आलबेल आहे, कुठलीही नाराजी नाही तरी मंत्रिपदाची रस्सीखेच, मुख्यमंत्रिपदाची अभिलाषा ही जनतेपासून लपून राहू शकली नाही. वास्तविक पाहता २०१९ मध्ये शिवसेना ठाकरे यांना सोडून ज्यावेळेस एकनाथ शिंदे महायुतीमध्ये आले, त्यावेळेस त्यांना खरे तर उपमुख्यमंत्री करायला पाहिजे होते आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते. पण भाजपाने व विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी मोठे मन दाखवून असेल किंवा दिल्लीच्या आदेशाने असेल, शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिले. आता त्याची पुनरावृत्ती होईल, अशी आशा करणे राजकीय वेडेपणाच आहे. अशा वेळेस भाजपाचा मुख्यमंत्री न बनणे म्हणजे जनमताचा अनादर करणे आहे. २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी गद्दारी करून जनमताचा अनादर केला होता. आता भाजपाने शिंदेंच्या नाराजीच्या समोर झुकून त्यांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर हा तर जनादेशाचा फार मोठा अपमानच म्हणावा लागला असता. सर्वच विरोधी पक्षांना भाजपापेक्षा देवेंद्र यांची भीती जास्त वाटते का? हा प्रश्न अनेक वेळा समोर येतो. उबाठाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे म्हणतात की, आम्हाला भाजपा चालते, पण देवेंद्र फडणवीस नको. महाराष्ट्राच्या राजकारणात एकमात्र जाणता राजा शरद पवारच राहिले पाहिजे. त्यांच्यापेक्षा बुद्धिवान आणि राजकारणी कोणी जन्माला येऊ नये, असे विरोधी पक्षांना वाटत असेल तर ही त्यांची आहे.
Maharashtra Assembly Election : बरेचदा भाजपाची परिस्थिती चिंतनीय होते. भारतातल्या सर्वच राज्यांमध्ये प्रभावशाली कामगिरी करणारी भाजपा ही महाराष्ट्राची नाडी अजून ओळखू शकली नाही का हा प्रश्न वारंवार मनामध्ये निर्माण होतो. इतके मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असताना भाजपाला नेहमीच सत्तेसाठी युती करावी लागते, ही परिस्थिती कितपत योग्य आहे. हिंदुत्वाचे नाव घेतल्यावर जर लोकांना शिवसेना आठवत असेल तर भाजपाने आपली प्रचार यंत्रणा तपासून पाहायला पाहिजे. सर्वसामान्य मतदारापर्यंत विकास आणि हिंदुत्व या नाण्याच्या दोन्ही बाजू आपण घेऊन जाऊ शकलो नाही का? यावरही विचार करणे आवश्यक आहे. भाजपा आणि अजितदादा यांच्याजवळ जवळपास १७५ आमदार असताना शिंदेंची मनधरणी करणे जरा जास्त झाले असे वाटते. मनधरणी करता दुसरा उद्धव ठाकरे भाजपाने जन्माला घालू नये म्हणजे मिळविले. सर्वच परिस्थितीमध्ये राज्याचा नेता कोण असेल, याचा निर्णय आधीपासूनच व्हायला हवा.
Maharashtra Assembly Election : जरांगे पाटील सुरुवातीपासूनच भाजपाच्या विरोधात बोलत राहिलेले आहेत. भाजपाचे उमेदवार पाडले जावे, हीच त्यांची इच्छा होती. मराठा आरक्षणाकरिता फडणवीस सरकारने केलेले कार्य अत्यंत प्रशंसनीय असताना एखादा जरांगे पाटील त्या निर्माण कसा होऊ शकतो? आमचे मराठा नेते काय करीत आहेत, हाही प्रश्न विचारला गेला पाहिजे. मुख्यमंत्री मराठा असावा, ओबीसी असावा की अजून कोणत्या जातीचा असावा हे महत्त्वाचे नाही तर त्याला महाराष्ट्राचा गाडा हाकता आला पाहिजे. त्याच्यामध्ये उत्तम प्रशासकाचे गुण असले पाहिजे आणि त्याचबरोबर तो लोकनेता असला पाहिजे. २०२९ च्या या भाजपाला जर स्वबळावर लढवायच्या असतील तर आतापासून तशा पद्धतीची रणनीती ठरविणे आवश्यक आहे आणि केंद्राने आतापासून महाराष्ट्राचा नेता कोण राहील, हे ठरविणे आवश्यक आहे. अन्यथा भरघोस यश मिळूनही अनेक दिवस आपण मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवू शकत नाही, ही गोष्ट महाराष्ट्र भाजपा व केंद्र या दोघांकरिताही फारशी भूषणावह नाही. लोकांनी डोळ्यांमध्ये अंजन घालण्यापेक्षा आम्ही स्वतःच आमच्या चुका, त्रुटी शोधून त्यावर कार्य करणे गरजेचे आहे असे वाटते.
- ९५५२५३५८१३
(लेखक प्रसिद्ध वक्ते, सामाजिक व राजकीय विचारक आहेत.)