वेध
- हेमंत सालोडकर
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. पहिले मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर काही दिवसांच्या अंतराने सुमारे ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि १६ डिसेंबरपासून विधिमंडळाचे अधिवेशन झाले. पहिल्या दिवसापासूनच महायुतीच्या सरकारने कामाचा धडाका लावला आणि सर्वच क्षेत्रांना भरपूर निधी दिला. यात युवकांपासून तर उद्योगापर्यंत, शेतीपासून तर सिंचनापर्यंत सर्वांचा समावेश होता. पण ज्या योजनेमुळे महायुतीला भरघोस मताधिक्य मिळाले आणि दणदणीत विजय झाला, त्या योजनेच्या शिल्पकार असलेल्या लाडक्या बहिणींना काही आनंदवार्ता मिळत नव्हती. त्यामुळे विरोधकांनीही आता या काय होणार, असा कांगावा सुरू केला. निवडणुकीपूर्वी पाच महिन्यांचे ७५०० रुपये जमा झाले आणि लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पारड्यात मतांचे भरभरून दान दिले.
अर्ज करणार्या सर्वच महिलांना याचा भरपूर लाभ झाला. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली होती, त्यांनीही याचा लाभ घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे काही पुरुषांनी खाती उघडून लाडकी योजनेचा लाभ घेतला. समाजात प्रामाणिक लोकांसोबत अप्रामाणिक लोकही असतात. त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा करता येणार नाही. काही दिवसांपूर्वी या योजनेसाठी सर्वेक्षण करून गैरफायदा लाटणार्या लोकांना योजनेतून हद्दपार करणार असे ऐकण्यात आले. बेईमानी करून बहिणींच्या नावावर पैसे लाटणार्यांची चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीत १५०० च्या ऐवजी २१०० रुपये येईल, अशीही घोषणा झाली. त्यामुळे महिलांच्या आनंदाला तर उधाण आले आणि त्यांनी महायुतीला भरघोस मतांनी विजयी केले. ज्या विरोधकांनी या योजनेला विरोध केला, त्यांनीही आम्ही निवडून आल्यास ३००० रुपये देऊ अशी घोषणा करून टाकली. महायुतीचे सरकार निदान १५०० रुपये देत होते, पण विरोधक कुठून पैसे देणार याची आकडेवारी त्यांनी नाही आणि लाडक्या बहिणींनी त्यांना विरोधात बसवले. नुसते बसवलेच नाही तर विरोध करायला नेताही शिल्लक ठेवला नाही. तुमचा नेताही नको आणि पैसेही नको अशी स्थिती महिलांनी विरोधकांची केली.
Ladki Bahin Yojana : निवडणुका झाल्यानंतर मात्र लाडक्या बहिणींना आपले पैसे कधी मिळणार याची हुरहूर लागली. पण निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार, महायुती सरकार हिवाळी अधिवेशन संपताच खात्यात पैसे जमा करणार असे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच घोषित केले. त्यामुळे लाभार्थी महिला आनंदल्या. पात्र महिलांना पैसे मिळतील यात गैर काही नाही, पण काही श्रीमंत लोकही या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांची चौकशी करून त्यांना बाद केले पाहिजे आणि सरकारवरील आर्थिक बोझा कमी केला पाहिजे.
Ladki Bahin Yojana : काही या योजनेचा लाभ घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अशा ‘लाडक्या भाऊ’ आणि ‘लाडक्या जावईबापूंचीही’ चांगली ‘सोय’ लावली पाहिजे. विधानसभेत सांगितल्याप्रमाणे त्यांची चौकशी होईलच. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता काही दिवसांतच मिळणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस राज्यातील महिलांना आणि सभागृहाला आश्वस्त करताना म्हणाले, कोणतीही शंका मनात ठेवू नका, जी जी आश्वासने दिलेली आहेत, ज्या योजना आम्ही लागू केल्या आहेत, त्यातील एकही योजना बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर विश्वास दर्शवला आणि मतांचं भरभरून दान दिलं, त्यांच्या खात्यात हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता टाकणार आहोत. सोबतच लाडकी बहीण योजनेचे कोणतेच निकषही बदलले नाहीत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. पण सांगताना त्यांनी काही जणांची पोलखोलही केली. ते म्हणाले की, काही जणांनी चार चार खाती उघडल्याचे लक्षात आले आहे. अशा लोकांवर त्यांनी संतापही व्यक्त केला. समाजात चांगल्या प्रवृत्ती असतात, तशा काही वाईट प्रवृत्तीही असतात. एखादी योजना चुकीच्या पद्धतीने वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे, तुमची आमची जबाबदारी आहे, तो योग्य गेला पाहिजे. माणसांनीच ९ खाती काढलीत त्याला लाडकी बहीण कसे म्हणायचे, असा सवालही त्यांनी सभागृहात केला. बहिणींच्या पैशांवर ज्याचा डोळा आहे, तो लाडका भाऊ कसा? अशी विचारणा मुख्यमंत्र्यांनी केली. सोबतच शेतकरी, युवक, ज्येष्ठ नागरिक, वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासने महायुती सरकार पूर्ण करेल, असे वचनही त्यांनी दिले. या घोषणेमुळे त्यांची माया लक्षात येते. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ती देवाभाऊंनी खात्यात ओवाळणी टाकण्याची.
- ९८५०७५३२८१