संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले

    दिनांक :20-Dec-2024
Total Views |
- संसदभवन परिसरात धरणे आणि निदर्शने करु नका: ओम बिर्ला

नवी दिल्ली,
Speaker Om Birla : संसदेच्या अधिवेशनाचे आज सूप वाजले. आज शेवटच्या दिवशी कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्ष सदस्यांच्या गोंधळामुळे सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित केले. आज लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच काँग्रेस आणि अन्य विरोधी सदस्य घोषणाबाजी करू लागले. या गोंधळातच बिर्ला यांनी एक देश एक निवडणुकीबाबतची दोन्ही घटनादुरुस्ती विधेयके संयुक्त समितीकडे पाठवण्याची घोषणा करायला विधि आणि न्याय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांना सांगितले. मेघवाल यांनी याबाबतची घोषणा करताच विरोधी सदस्यांची घोषणाबाजी वाढली.
 
 
Om Birla
 
Speaker Om Birla : संसदेची मर्यादा आणि प्रतिष्ठा कायम ठेवणे ही आमच्या सर्वांची जबाबदारी आहे, संसदभवन परिसरात निदर्शन करणे तसेच धरणे देणे योग्य नाही. सर्वांनी यासंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, असे करीत बिर्ला म्हणाले की, सर्व सदस्यांनी ही सूचना गांभीर्याने घ्यावी आणि संसदभवन परिसरात धरणे देऊ नये, निदर्शन करू नये, असे माझे आवाहन आहे. याचे कोणीही उल्लंघन केले तर कठोर कारवाई केली जाईल. सभागृहातील गोंधळ थांबत नसल्यामुळे बिर्ला यांनी कामकाज अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्याची घोषणा केली. वंदेमातरम्ने अधिवेशनाचे सूप वाजले. राज्यसभेतही गोंधळाची स्थिती होती. त्यानंतर अध्यक्ष जगदीप धनकड यांनी सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्याची घोषणा केली.