अग्रलेख...
Rahul Gandhi : संसद हे लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर मानले जाते, पण लोकशाहीच्या या मंदिरात गुरुवारी जे झाले, त्यामुळे लोकशाहीवर प्रेम करणार्या या देशातील कोट्यवधी मान लज्जेने खाली झुकली. हेचि फळ काय मम तपाला असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली. जगातील काही देशातील संसदेत हाणामार्या झाल्याचे याआधी वाचण्यात आणि पाहण्यातही आले होते. पण सुदैवाने आपल्या देशातील संसदेच्या सभागृहात असा प्रकार घडला नाही, म्हणून समाधान मानायचे की, सभागृहाबाहेर म्हणजे संसद भवन परिसरात असा प्रकार घडला म्हणून कपाळ बडवायचे ते समजत नाही. काही असले तरी या घटनेने संसदीय लोकशाहीला काळिमा फासला गेला, हे कुणीही नाकारू शकत नाही. एखाद्या चौकात मवाल्यांनी दारू पिऊन जशी गुंडागर्दी करावी, वा महाविद्यालयीन निवडणुकीत टारगट मुलांनी जसा गोंधळ घालावा, तसा सर्व प्रकार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या खासदारांनी केला.
घटनेचे काँग्रेस खासदारांचा नंगानाच वा आधीच मर्कट त्यात मद्य प्याला, या शब्दातच वर्णन करावे लागेल. यासाठी त्यांचा करावा तेवढा निषेध कमी आहे. एखाद्या व्यक्तीवरचा राग प्रदर्शित करण्यासाठी वा त्याच्याबद्दलची तीव्र नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘दहा माराव्या आणि एक मोजावी’, असे म्हटले जाते. पण या घटनेच्या बाबतीत तर शंभर माराव्या आणि मोजू नये, असे म्हणायला हरकत नाही. राहुल गांधी आणि जबाबदारी या दोन परस्परविरोधी गोष्टी म्हणायला हरकत नाही. राहुल गांधींनी आपल्या संपूर्ण राजकीय आयुष्यात एकही गोष्ट जबाबदारीची केली नाही. त्यांची संपूर्ण वागणूक नेहमीच बेजबाबदारपणाची असते. संसदेत पहिल्यांदाच निवडून आलेल्या खासदारांनी एखादवेळ असे वर्तन केले असते तर ते खपण्यासारखे नसले तरी होते. पण संसदेत सलग पाचव्यांदा निवडून आलेल्या राहुल गांधींनी इतके बेजबाबदार आणि मवाल्यासारखे वर्तन करावे, ते समजण्यापलीकडे आहे. राहुल गांधींनी केलेल्या धक्काबुक्कीत भाजपाचे दोन खासदार खाली पडून गंभीर जखमी झाले. यापैकी एकाचे डोके फुटले, संसद भवनाच्या पायर्यांवर रक्त सांडले. प्रतापचंद्र सारंगी आणि मुकेश राजपूत यांना डॉ. राममनोहर लोहिया रुग्णालयात करावे लागले. याहीपेक्षा गंभीर आणि आक्षेपार्ह प्रकार म्हणजे राहुल गांधींनी भाजपाच्या नागालॅण्डमधील खासदार फांगनोन कोन्याक यांच्याशी केलेले गैरवर्तन. याबाबतची लेखी तक्रार त्यांनी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकड यांच्याकडे केली तसेच राज्यसभेत आपबितीही सांगितली. कोन्याक यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले नसले तरी राहुल गांधी यांनी आपला विनयभंग केला, असाच त्यांच्या तक्रारीचा एकूण होता. किमान एका महिलेशी कसे वागावे, संसदेचे सदस्य असलेल्या महिलेशी कसे वागावे, याचे भान राहुल गांधी यांना राहू नये, याचे आश्चर्य वाटते. महिला मग सर्वसाधारण गृहिणी असो, शाळेत जाणारी मुलगी असो की महाविद्यालयात जाणारी विद्यार्थिनी असो तिचा आदर आणि मानसन्मान सर्वांनी केलाच पाहिजे. आदर करता येत नसेल तरी एकवेळ पण आपल्याकडून तिचा अपमान आणि विटंबना होऊ नये, याची काळजी तर सर्वांनी घेतलीच पाहिजे.
Rahul Gandhi : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानाचा काँग्रेस सदस्यांनी विपर्यास केला, त्यावरून शाह आणि भाजपाला अडचणीत आणण्याचा, आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसची ही कृती पूर्णपणे अश्लाघ्य अशीच आहे. घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांचा जेवढा अपमान काँग्रेसने आपल्या शासनकाळात, अगदी पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असतानापासून केला, तो लपला नाही. त्याचे ढीगभर पुरावे आहेत. काँग्रेसजनांनी डॉ. आंबेडकर यांच्याबाबतीत जी काही कारस्थाने रचली, लोकसभा निवडणुकीत ते जिंकू नये म्हणून जी षडयंत्रे केलीत, ती वाचली आणि पाहिली की काँग्रेसच्या नेत्यांच्या कुटिलतेची आणि पाताळयंत्रीपणाची आपण करू शकतो. नेहरूंमुळे आंबेडकरांना केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला. मात्र त्याची कोणतीच खंत आणि वेदना नेहरूंना झाली नाही. उलट आपली एक कटकट दूर झाली, अशी तेव्हाची त्यांची भूमिका होती.
आज तेच काँग्रेसवाले अमित शाह यांनी डॉ. आंबेडकरांचा अपमान केला म्हणून जेव्हा ऊर बडवत विधवा विलाप करतात, तेव्हा आपल्याच कपाळावर हात मारून घ्यावा लागतो. काँग्रेसवाल्यांची ही कृती ‘सौ चूंहे खांके बिल्ली हज को चली’सारखी म्हणायला पाहिजे. अमित शाह यांचे डॉ. आंबेडकरांबाबतचे विधान काँग्रेस नेत्यांनी संदर्भ सोडून वापरले, यातून लोकांच्या मनात अमित शाह आणि भाजपाबद्दल कटुता निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो. अमित शाह यांचे विधान मागच्या पुढच्या संदर्भासह डोके जागेवर ठेवत कोणत्याही पूर्वग्रहदूषित भावनेशिवाय ऐकले तर त्यात काहीही आक्षेपार्ह नाही, शाह यांनी जे म्हटले ते शंभर टक्के बरोबर आहे, असे समजून येईल. राहुल गांधींकडून तर संयमाच्या आणि जबाबदारीच्या वागणुकीची अपेक्षाच करता येत नाही, पण काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांनीही तीच भाषा वापरावी आश्चर्य वाटते. ‘छोटे मियां तो छोटे मियां, बडे मियां सुभानअल्ला’, असे खडगेंकडे पाहून म्हणावेसे वाटते. खडगेंबद्दल तसेच त्यांच्या वयाच्या आणि प्रदीर्घ संसदीय कारकीर्दीचा पूर्ण आदर बाळगूनही खडगे यांना म्हातारचळ तर झाला नाही, असे वाटून जाते. अन्यथा त्यांनी राहुल गांधी यांच्या सुरात आपला सूर मिसळला नसता. मी भाजपा सदस्यांना धक्काबुक्की नाही, उलट त्यांनीच संसद भवनात जाण्याचा माझा रस्ता अडवला आणि मला तसेच खडगे यांना धक्काबुक्की केली, असा उलटा आरोप राहुल गांधींनी करत ‘चोर तर चोर वर शिरजोर’पणाचा परिचयही करून दिला.
संसद भवन परिसरात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील घटक पक्ष हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच निदर्शने करत आहेत. विरोधी पक्ष म्हणून धोरणाचा निषेध करण्याचा, त्यांच्याविरुद्ध निदर्शने करण्याचा काँग्रेसला पूर्ण अधिकार आहे, तो कोणी नाकारणार नाही. पण सत्ताधारी पक्षाच्या विरोधात निदर्शने करण्याचा जसा अधिकार विरोधी पक्षांना आहे, तसाच अधिकार विरोधी पक्ष चुकीचा वागत असेल, समाजाच्या आणि देशाच्या विरोधात भूमिका घेत असेल तर त्यांच्याविरुद्ध निदर्शने करण्याचा, जनतेला त्याची जाणीव करून देण्याचा अधिकारही पक्षाला आहे, याचे भान राहुल गांधींनी आणि अन्य काँग्रेस नेत्यांनी ठेवले पाहिजे. सत्ताधारी पक्षाचे सदस्य निदर्शने करत असताना त्यांच्यासमोर जाण्याचा आणि त्यांना धक्काबुक्की करत आत शिरण्याचा प्रयत्न हा राहुल गांधींच्या उद्दामपणाचे तसेच काँग्रेस खासदारांच्या गुंडागर्दीचे द्योतक म्हणावे लागेल.
Rahul Gandhi : राहुल गांधी खासदार असल्यामुळे त्यांना संसद भवनात प्रवेश करण्याचा तसेच सभागृहाच्या सहभागी होण्याचा पूर्ण अधिकार आहे, तो कोणी नाकारू शकत नाही. पण संसद भवनात जाण्याचा राहुल गांधींचा हेतू प्रामाणिकपणाचा असता तर संसद भवनात प्रवेश करण्यासाठी एकूण सहा प्रवेशद्वारे आहेत. मकरद्वारावर भाजपा सदस्य निदर्शने करत होते, पंतप्रधानांसाठी राखीव एक द्वार वगळले तरी उर्वरित चार द्वारातून ते आत सहजपणे जाऊ शकत होते. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सदस्यांचा आग्रह मकरद्वारातूनच आत जाण्याचा होता. त्यासाठी भाजपा सदस्यांना धक्काबुक्की करण्यापर्यंत तसेच महिला सदस्यांचा अप्रत्यक्षपणे विनयभंग करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. लोकसभा असो की विविध राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुका असो देशातील जनता वारंवार नाकारत असतानाही राहुल गांधींना शहाणपण येत नाही, यात नवल नाही, कारण त्यांचा आणि दूरदूरपर्यंत कोणताही संबंंध नाही. पण त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या मल्लिकार्जुन खडगेंसारख्या अनुभवी, संयमी आणि वयोवृद्ध नेत्यालाही शहाणपण येत नाही, याचे आश्चर्य वाटते. राहुल गांधींमागे फरफटत जात काँग्रेस पक्ष आपले कधीही भरून न निघणारे नुकसान करून घेत आहे, यात संशय नाही.