भारताची संरक्षण क्षमता आणखी मजबूत होणार

    दिनांक :22-Dec-2024
Total Views |
राष्ट्ररक्षा  
 
India's defense capability : गेल्या महिनाभरात भारताची संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी अनेक घटना घडल्या. त्या होत्या व्होरोनेझ लाँग-रेंज रडारची खरेदी, आयएनएस तुशील नौदलात सामील आणि अनेक युद्धनौकांना बांधण्याकरिता सरकारकडून मिळालेली परवानगी.
 
 
 
 
हवाई संरक्षण अधिक सक्षम
करण्यासाठी रशियाची मदत
भारत आपले हवाई संरक्षण अधिक सक्षम करण्यासाठी व्होरोनेझ लाँग-रेंज रडार सिस्टिमसाठी चार अब्ज डॉलरच्या संरक्षण अंतिम रूप देण्यासाठी रशियाशी चर्चा करीत आहे. भारताला ही रडार यंत्रणा मिळाल्यास ड्रोन, शत्रूची विमाने, क्षेपणास्त्र शोधण्याची हवाई संरक्षण क्षमता वाढेल.
 
 
व्होरोनेझ रडार प्रणाली काय आहे?
India's defense capability : व्होरोनेझ लाँग-रेंज अर्ली वॉर्निंग रडार प्रणालीचा एकूण पल्ला (रेंज) आठ हजार किलोमीटरपर्यंत आहे आणि ही प्रणाली एकाच वेळी ५०० हून अधिक लक्ष्यांचा (Targets) घेऊ शकते; म्हणजेच ट्रॅक करू शकते. व्होरोनेझ रडार यंत्रणा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि स्टेल्थ विमानांचा मागोवा घेण्यास सक्षम आहे. रशिया २०१२ पासून ही रडार प्रणाली वापरत आहे. चार अब्ज डॉलरच्या संरक्षण कराराला अंतिम रूप देण्यासाठी भारत रशियाशी चर्चा करीत आहे. सध्या प्रणालीला सुधारित केले जात आहे; ज्यामुळे लष्कराला हवेतील आणि जागेच्या वातावरणात विविध आकारांच्या लक्ष्यांचा मागोवा घेणे, त्यांच्या अंतरांची गणना करणे, क्षमता निर्धारित करणे शक्य होणार आहे. ही प्रणाली त्यांना अडवूदेखील शकेल. रशियाने किमान १० व्होरोनेझ रडार प्रणाली तैनात केल्या आहेत; ज्यामुळे क्षेपणास्त्र संरक्षण क्षमता वाढल्या आहेत.
 
 
व्होरोनेझ रडार प्रणाली भारताला का हवी?
रशियाची व्होरोनेझ रडार यंत्रणा मिळाल्यास मेक इंडिया उपक्रमाच्या अनुषंगाने किमान ६० टक्के प्रणाली भारतीय भागीदारांद्वारे तयार केली जाईल. वाढत्या सुरक्षा धोक्यांमध्ये हवाई संरक्षण सुविधांचे आधुनिकीकरण करण्याच्या देशाच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. या प्रणालीमुळे भारताला चीन, दक्षिण आणि मध्य आशिया आणि बहुतेक हिंद महासागर क्षेत्रातील हवाई धोक्यापासून दूर ठेवण्यास मदत करील. क्षेपणास्त्र शोधण्याच्या प्रयत्नांमध्ये रडार भूमिका बजावेल. जेव्हा एखादा उपग्रह प्रक्षेपण शोधतो, तेव्हा तो व्होरोनेझ रडारला सतर्क करतो. या रडार यंत्रणांचे काम आहे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची प्रक्षेपण धोक्याची पडताळणी करणे. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे शोधण्यासाठी ही यंत्रणा रशियाच्या उपग्रहांबरोबर एकत्रित काम करते. भारताच्या शत्रूंकडून वाढत्या क्षेपणास्त्र धोक्याला शोधण्यासाठी प्रगत रडार प्रणाली महत्त्वाची आहे. चीनमधून फायर केलेल्या या प्रणालीमुळे निष्क्रिय करता येईल. व्होरोनेझसारखी प्रगत रडार प्रणाली भारताला येणार्‍या काळात विकसित होणार्‍या धोक्यांना तोंड देण्यास सक्षम करील. रडारच्या मल्टिरोल क्षमतेत अंतराळ निरीक्षणाचा समावेश आहे. त्यामुळे ही प्रणाली भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. अवकाशातील वस्तूंवर नजर ठेवण्याची रडारची क्षमता भारताच्या नागरी आणि लष्करी उद्दिष्टांशी सुसंगत आहे. त्याचा भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ला होणार आहे. यामुळे भारत पाच हजारांपेक्षा जास्त रेंजच्या रडार प्रणाली असलेल्या राष्ट्रांच्या यादीत सामील होईल.
 
 
रशियाने भारताला गाईडेड क्षेपणास्त्राने सुसज्ज आयएनएस तुशीलला सुपूर्द केले
India's defense capability : आयएनएस तुशील (ऋ ७०), अत्याधुनिक बहुउद्देशीय मार्गदर्शित क्षेपणास्त्र युद्धनौका, ९ डिसेंबर २०२४ रोजी कॅलिनिनग्राड येथील यंतर शिपयार्डमध्ये भारतीय नौदलात करण्यात आली. या युद्धनौकेचे नौदलात सामील होणे हे भारताच्या वाढत्या सागरी सामर्थ्याचा दाखला आहे. ही युद्धनौका, भारत आणि रशिया यांच्यातील सामायिक मूल्ये, परस्पर विश्वास तसेच विशेष आणि धोरणात्मक विशेषाधिकार असलेल्या भागीदारीच्या दीर्घकालीन मैत्री संबंधातील महत्त्वाचा टप्पा आहे. अत्याधुनिक ‘मल्टिरोल स्टेल्थ गाईडेड मिसाईल फ्रिगेट आयएनएस तुशील’ ही युद्धनौका कॅलिनिनग्राडमध्ये संरक्षण राजनाथ सिंह आणि अ‍ॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्या उपस्थितीत भारताला देण्यात आली.
 
 
भारतीय नौदलासाठी गेम चेंजर
आयएनएस तुशील ही १२५ मीटर लांब आणि ३९०० टन वजनाची युद्धनौका आहे. ही युद्धनौका रशियन, भारतीय अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि युद्धनौका बांधणीतील सर्वोत्तम पद्धतींचे प्रभावी मिश्रण आहे. आयएनएस तुशील अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज आहे. यामध्ये ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्र, उच्च श्रेणीच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आणि विमानविरोधी तोफा यांचा समावेश आहे. याशिवाय या युद्धनौकेत नियंत्रित क्लोज-रेंज रॅपिड फायर गन सिस्टिम, पाणबुडी मारणारे टॉर्पेडो यासह अनेक प्रगत रॉकेट्स आहेत. युद्धनौकेच्या डिझाईनमुळे रडारपासून वाचण्याची क्षमता आणि चांगली स्थिरता (stability) मिळते. २०१६ भारत आणि रशिया यांच्यात ४ स्टेल्थ २.५ बिलियन (सुमारे २१ हजार कोटी रुपये) किमतीचा करार झाला होता. यापैकी दोन युद्धनौका रशियात (यंतर शिपयार्ड) आणि दोन गोवा शिपयार्डमध्ये बांधण्यात येणार आहेत. तुशीलच्या डिलिव्हरीनंतर रशिया जून-जुलै २०२५ मध्ये तमलला भारताकडे सुपूर्द करेल. संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, आयएनएस तुशीलमुळे भारताची सागरी शक्ती वाढेल. रशियन आणि भारतीय उद्योगांची यशस्वी भागीदारी दोन्ही देशांमधील दीर्घकालीन मैत्रीमधील मैलाचा दगड असल्याचे त्यांनी सांगितले. संरक्षणमंत्र्यांनी जहाजांमध्ये ‘मेड इन इंडिया’ सामग्री वाढल्याबद्दल आनंदही व्यक्त केला.
 
 
नौदल जहाजांमध्ये ‘मेड इन इंडिया’ सामग्रीमध्ये वाढ
भारतीय नौदल आणि रशियन जहाज डिझाईन कंपनी सेव्हनॉय डिझाईन ब्यूरोच्या तज्ज्ञ अभियंत्यांच्या मदतीने आयएनएस तुशीलमधील स्वदेशी सामग्री २६ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. यासह जहाजांमध्ये भारतीय बनावटीच्या यंत्रणांची संख्या ३३ झाली आहे; जी पूर्वीपेक्षा दुप्पट आहे. ब्रह्मोस एअरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, केल्ट्रॉन, नोव्हा इंटिग्रेटेड सिस्टिम्स, एल्कॉम मरीन, जॉन्सन कन्ट्रोल्स इंडिया आणि इतर अनेक मूळ उपकरणे निर्माते या जहाजाच्या निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या प्रमुख भारतीय कंपन्या होत्या.
 
 
रशिया-युक्रेनच्या मदतीने मिळाले जहाज
India's defense capability : भारतीय नौदलात जाणार्‍या बहुतेक जहाजांमध्ये वापरल्या जाणार्‍या गॅस टर्बाईनची निर्मिती युक्रेनियन कंपनी Zorya Mashproekt करतात. हे जागतिक स्तरावर हायड्रोगॅस टर्बाईनच्या उत्पादनासाठी ओळखले जाते. या संपूर्ण ऑर्डरची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे युद्ध असूनही भारताला हे जहाज रशिया आणि युक्रेनच्या मदतीने मिळाले आहे. आयएनएस तुशीलवर अधिकार्‍यांसह १८० कर्मचार्‍यांचा ताफा तैनात केला जाऊ शकतो. आठ ब्रह्मोस अनुलंब प्रक्षेपित केलेली जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्रे, २४ मध्यम पल्ल्याच्या आणि आठ कमी पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, एक १०० मिमी तोफ आणि दोन क्लोज-इन क्षेपणास्त्रे असतील. तुशील ही क्रोव्हॅक-३ श्रेणीतील युद्धनौका आहे. भारतात सध्या अशा सहा युद्धनौका आहेत. ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ आणि हाय रेंज क्षेपणास्त्रांनी सुसज्ज तीन युद्धनौकांची डिलिव्हरी बाकी आहे. ‘आयएनएस तुशील’ ही प्रगत पाणबुडीविरोधी युद्धनौका आहे. यात प्रगत युद्ध आणि हवाई संरक्षण प्रणाली आहे; ज्यामुळे याचा अनेक मोहिमांसाठी वापर केला जाऊ शकतो. आयएनएस तुशील ‘मेक इन इंडिया’ धोरणाच्या अनुषंगाने भारताच्या सामरिक हितासाठी महत्त्वाची ठरेल. आयएनएस तुशील हिंद महासागरात चीनच्या वाढत्या सामर्थ्याचा मुकाबला करण्यासाठी मदत करील.
 
 
नौदलासाठी पाणबुड्यांचा करार लवकरच
‘‘केंद्र सरकारने देशी बनावटीच्या अणुऊर्जेवर चालणार्‍या दोन पाणबुड्यांच्या निर्मितीला मंजुरी दिली असून नौदलासाठी तीन स्कॉर्पिन वर्गातील पाणबुड्यांच्या बांधणीचा करार पुढील महिन्यात होणे अपेक्षित आहे,’’ अशी माहिती नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी ३ डिसेंबरला दिली. ४ डिसेंबर रोजी होणार्‍या नौदल दिनाच्या पृष्ठभूमीवर घेतलेल्या परिषदेत अ‍ॅडमिरल त्रिपाठी यांनी सांगितले की, ‘‘एसएसएनमुळे नौदलाच्या क्षमतेत मोठी वाढ होईल. अणुऊर्जेवर चालणारी पहिली पाणबुडी २०३६-३७ पर्यंत तर दुसरी पाणबुडी त्यापुढील दोन वर्षांत तयार होईल.’’ भारताच्या विविध जहाज बांधणी कारखान्यांत ६२ युद्धनौका आणि एका पाणबुडीची बांधणी सुरू आहे. याशिवाय देशी बनावटीच्या ३१ नौका आणि पाणबुडी बांधणी प्रकल्पाचे प्रस्ताव करण्यात आले आहेत. नौदलासाठी ६० युटिलिटी हेलिकॉप्टरच्या खरेदीस सरकारची मान्यता दिली आहे. यामुळे भारताची संरक्षण क्षमता येणार्‍या काळात अजून मजबूत होणार आहे.
- ब्रिगेडियर हेमंत महाजन
- ९०९६७०१२५३
(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)