संत प्रबोधन
Saint Prabodhan : संतांनी परमेश्वराची जी मनोभावे भक्ती साधना केली, ती नवविधा भक्ती सर्वमान्य आहे. ज्या जशी ती साध्य होती, त्यांनी ती साध्य करून भगवंताला प्राप्त करून घेतले. या ९ साधनांद्वारे जो कोणी मनोभावे भगवंताची सेवा करेल, त्याला भगवंत प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही, असा त्यांचा दृढ विश्वास आहे. संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचे पायाभूत आधारस्तंभ. ज्ञानियांचे राजे. परंतु, भगवत् प्रेमासाठी पंढरपूरला आवडीने पताका, गुढी घेऊन म्हणतात. हे पुरुषांच्या अनन्यभक्तीचे द्योतकच मानावे लागेल.
श्रवणं कीर्तनं विष्णोःस्मरणं पादसेवनं |
अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदम् ॥
(श्रीमद् भागवत ७/५/२३)
१) श्रवण २) कीर्तन ३) विष्णुस्मरण ४) पादसेवन ५) अर्चन ६) वंदन ७) दास्य ८) सख्य ९) आत्मनिवेदन. अशा ९ प्रकारच्या भक्तिमार्गाने भक्तिसाधना केली जाते. प्रत्येकाने या नवविध भक्तिसाधन वाटचाल केल्यास साक्षात्कार प्राप्ती होते.
श्रवण
Saint Prabodhan : साक्षात्कार घडण्यासाठी अधिकारी पुरुषाद्वारे श्रवण घडावे लागते. साक्षात्कारी मनुष्याच्या ज्ञानी, तपस्वी वाणीतून कीर्तन व प्रवचन ऐकणे म्हणजे श्रवण होय. संत एकनाथ सांगतात -
श्रवणे परीक्षिती तरला | श्रवणे क्रौंच उद्धरिला |
मकरोदरी श्रवण पावला | सिद्ध जाहला मत्सेंद्र ॥
(ए. भा. ६/१००)
तपस्वी श्रवणामुळे परीक्षिती राजास, क्रौंच व मत्सेंद्रनाथाला साक्षात्काराचा अनुभव आला. संत ज्ञानेश्वर श्रवणाचे महत्त्व सांगतात -
तैसा मनाचा मारू न करिता | इंद्रिया दुःख न देता ॥
एथ मोश्रु नसे आयता | श्रवणाचिमाजी ॥
(ज्ञाने.- ४/२२४)
कीर्तनभक्ती
कीर्तन चांग कीर्तन चांग | होय अंग हरिरूप ॥
(तु. गा. २४२१)
भगवंताचे घेणे किंवा भगवंताचे गुणगाण गाणे व भगवत् स्वरूपाचा चिंतनात्मक विचार करणे म्हणजे कीर्तनभक्ती होय. नवविधा भक्तीचा हा दुसरा महत्त्वपूर्ण प्रकार आहे.
आवडी करिता हरिकीर्तन | हृदयी प्रकटे श्री जनार्दन ॥
त्याहोनि श्रेष्ठ साधन | सर्वथा आन असेना ॥
(ए. भा. ५/३५९)
प्रेमस्वरूपाने हरिकीर्तन केले म्हणजे हृदयामध्ये श्रीहरी प्रकट होतो. हे श्रेष्ठ भक्तिसाधनामध्ये मोडते.
तरी कीर्तनाचेनि नटनाचे | नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे ॥
जे नामचि नाही पापाचे | ऐसे केले ॥ (ज्ञाने.- ९/१९७)
कीर्तनामध्ये जेथे माझा नामघोष चालतो, तेथेच मी असतो, असे भगवंत सांगतात. साधकाने कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद या नामाचा जयघोष करावा. कीर्तनामुळे पाप नाहीसे होत असते. संत तुकाराम महत्त्व सांगतात. श्री देवर्षी नारद हे कीर्तनभक्तीचे आद्य प्रवर्तक आहेत. महाराष्ट्रातील सर्व संतांच्या मांदियाळीने या भक्तीचा प्रसार व प्रचार केला आहे. अव्याहत हे कार्य चालू आहे. टाळमृदंगाच्या तालावर ही मंडळी स्वतःला विसरून भक्तिरूप ब्रह्मरसाचे सेवन करतात. संत नामदेवांनी तर प्रतिज्ञाच केली होती-
नाचु कीर्तनाचे रंगी | ज्ञानदीप लावू ॥
(संत नामदेव गाथा - अ. १३९२)
विष्णुस्मरण
विष्णुस्मरणाने विघ्नांचा नाश होतो व संकटे पळून जातात. इच्छित फळ प्राप्त होते. संत रामदासांनी दासबोधामध्ये सांगितले आहे.
नामे संकटे नासती | नामे विघ्ने निवारती ॥
नामस्मरणे पाविजेती | उत्तम पदे ॥ (दासबोध)
पादसेवन
ही चौथ्या प्रकारची भक्ती आहे.
पादसेवने अक्रुर झाला | प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे ॥
(ज्ञाने. गाथा अ. ७१२)
पादसेवन म्हणजे काया, वाचा, मनाने सद्गुरूची सेवा करणे होय. या भक्तीने अक्रुरास आत्मसाक्षात्कार झाला आहे.
अर्चन
Saint Prabodhan : शास्त्रोक्त पद्धतीने काया, वाचा, मनाने इष्ट देवतेची पूजा करणे म्हणजे अर्चन भक्ती होय.
पत्रं पुष्पं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छती |
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनाः (गीता ९/२६)
भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या नवव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे जो भक्त मला अतिशय पवित्र भावाने पान, फूल, फळ किंवा पाणी भक्तिभावाने अर्पण करतो, त्या शुद्ध चित्ताच्या भक्ताने माझ्यासाठी आणलेले पान, फूल, फळ, पाणी मी सेवन करीत असतो.
वंदन
वंदन करणे म्हणजे भावपूर्ण नमस्कार करणे. नवविधा भक्तीचा हा सहावा महत्त्वपूर्ण प्रकार संत एकनाथांनी वंदन भक्तीचे महत्त्व असे स्पष्ट केले आहे.
सकळ तीर्थी तोचि न्हाला | जपतपादिफळे तोचि लाहिला ॥
सर्व पुजांचे सार तो पावला | जेणे साधु वंदिला सन्माने ॥
(ए. भा. ११/१२००)
नमस्कार केल्याने महादोष जातात, नमस्काराने अन्याय होत नाहीत. नमस्कारामुळे समाधान प्राप्त होते. त्यासाठी साधू, संत, सज्जन, आई-वडील वंदन करावे. भावपूर्ण नमस्कार करावा.
दास्यभक्ती
दास्यत्व हनुमंते केले | म्हणोनी देखिले रामचरण
(ज्ञाने. गाथा अ. ७१२)
हनुमंतरायांनी केलेली दास्यभक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे. म्हणूनच ते श्रीरामप्रभूंच्या एवढे निकट व प्रिय होते. तन-मनाने सेवा करणे, अगर्वता धारण करून दास्य स्वीकारून सेवक म्हणून राहणे म्हणजेच दास्यभक्ती होय. त्यामुळेच ज्ञानप्राप्ती होत असते. ज्ञानेश्वरांनीही सेवेचे महत्त्व सांगितले आहे.
तरी तनुमनुजीवे | चरणासी लागावे ॥
आणि अगर्वता करावे | दास्य सकळम ॥
(ज्ञाने. ४/१६७)
सख्यभक्ती
सखाभाव, मित्रत्व भावाने सख्यभक्ती केल्यास, परमेश्वराशी जवळीक साधल्यास देव सोयरा होत असतो. परमेश्वराशी प्रेमाचे नाते जोडण्याचे भाग्य या भक्तीमुळे प्राप्त होते.
सख्यपणे अर्जुन नरनारायण | सृष्टी जनार्दन एकरूप
(ज्ञाने. गाथा अ. ७१२)
आत्मनिवेदन
परमेश्वराशी आत्मसमर्पण करावे व हितगुज करावे. त्यामुळे परमपद प्राप्ती होते. संत तुकाराम आत्मनिवेदन भक्तीबाबत सांगतात-
लवण मेळविता जळे | काय उरले निराळे ॥
तैसा समरस झालो | तुजमाजी हरपलो ॥
अग्नीकर्पूराच्या मेळी | काय उरली काजळी ॥
तुका म्हणे होती | तुझी माझी ज्योती ॥
(तु. गा. ३७७२)
तुज मज नाही भेद | केला सहज विनोद ॥
तु माझा आकार | मी तो तुची निर्धार ॥
मी तुजमाजी देवा | घेसी माझ्या अंगे सेवा ॥
मी तुजमाजी अचळ | मजमाजी तुझे बळ ॥
तु बोलसी माझ्या मुखे | मी तो तुजमजी सुखे
तुका म्हणे देवा | विपरीत ठायी नावा ॥
(तु. गा. ३७७३)
नवविधा भक्तीमध्ये ज्या नऊ साधन प्रकारांचा समावेश होतो, त्यामध्ये श्रवण, कीर्तन आणि स्मरण यांचा संबंध ईश्वरनामोल्लेखाशी असल्यामुळे ईश्वराप्रती श्रद्धा आणि विश्वास घनिष्ठ होण्यासाठी होतो. पादसेवन, अर्चन, वंदन या साधनांचा ईश्वराच्या साकार स्वरूपाशी संबंध असल्याने त्याचा उपयोग चित्तशुद्धीसाठी होतो. सगुण साक्षात्कार होतो. हे क्रियात्मक भक्तीचे प्रकार आहेत. दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या तीन साधनांचा संबंध भक्तांच्या भावनेशी आहे. त्यांना प्रेमभक्तीचे विशेष अंग मानले जाते.
- प्रा. डॉ. हरिदास आखरे
७५८८५६६४००