मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आज यवतमाळात प्रथम आगमन

    दिनांक :25-Dec-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Sanjay Rathod : महाराष्ट्र राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे मंत्रीपद स्वीकारल्यानंतर बुधवार, 25 डिसेंबरला प्रथमच यवतमाळ येथे येत आहेत. त्यानिमित्त शिवसेनेच्या वतीने त्यांचा भव्य स्वागत व सत्कार सोहळा होत आहे.
 
 
 
y24Dec-Sanjay-Rathod
 
 
मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर संजय राठोड यांचे प्रथमच यवतमाळ शहरात आगमन होत आहे. त्यामुळे त्यांचे स्वागत व सत्कार करण्याकरिता जिल्हाभरातून शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते दुचाकी व चारचाकी वाहनाने येणार आहेत. संजय राठोड हे नागपूरमार्गे सकाळी 10 वाजता यवतमाळ शहरात दाखल होणार आहेत.
 
 
नागपूरहून राष्ट्रीय महामार्गाने आर्णी मार्गावर वनवासी मारुती मंदिर चौकात पोहोचल्यानंतर संजय राठोड हनुमान मंदिरात पूजन करतील. त्यानंतर तेथेच असलेल्या संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण, पुढे क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास अभिवादन, तेथून जिल्हा परिषदेच्या आवारातील वसंतराव नाईकांच्या पुतळ्याला अभिवादन, पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मानाचा मुजरा, त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करतील.
 
 
तेथून तहसील चौक मार्गे जाऊन अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करतील. त्यांनतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास माल्यार्पण व अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयात बचत भवन येथे जिल्हाभरातून आलेले शिवसैनिक मंत्री संजय राठोड यांचे स्वागत व सत्कार करतील.