मुंबई,
Gold investment : ज्या गुंतवणूकदारांनी अभ्यासपूर्व आणि दूरदृष्टी दाखवत सोन्यामध्ये गुंतवणूक केली असणार त्यांच्यासाठी 2024 छप्परफाड कमाईचे वर्ष ठरलेले आहे. 2024 या वर्षाच्या सुरुवातीपासून वर्ष संपेपर्यंत सोन्यातील गुंतवणुकीवर किमान 19 टक्के परतावा मिळाला आहे. याच काळात सेन्सेक्सने 8.35 टक्के परतावा दिला. या परताव्यापेक्षा सोन्याने दिलेला परतावा दुपटीहून जास्त आहे.
1 जानेवारी 2024 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 63,970 रुपये प्रतितोळा होती. ती 23 डिसेंबर रोजी 76,160 रुपये प्रतितोळा झाली होती. या कालावधीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 12,190 प्रतितोळ्याने वाढला होता. म्हणजेच, या वर्षात सोन्यातील गुंतवणुकीने 19 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
सोने महागल्याने चांगला परतावा मिळाला
जगात महागाईमुळे होणाऱ्या नुकसानीची झळ कमी करण्यासाठी सोन्यातील गुंतवणूक हा उत्तम पर्याय मानला जातो. महागाई वाढली की सोन्याचे दरही वाढतात. सोबतच महागाईमुळे चलनाचे अवमूल्यन होते, त्यामुळे गुंतवणूकदारांचा फायदा होतो. व्याजदर आणि सोन्याचे दर यांचे नाते सातत्याने विळ्या भोपळ्याचे असते. व्याजदर वाढले की सोन्याचे दर घसरतात आणि व्याजदर कमी झाले की सोन्याचे दर वाढतात. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे सलग तीन महिने अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने अर्थात फेडने व्याजदरात कपात केली होती. यामुळे या चार महिन्यात सोन्याचे दर झपाट्याने वाढत गेल्याचे पाहायला मिळाले.
भारतामध्ये सोन्याचे दर वाढलेले असोत अथवा घटलेले, त्यात गुंतवणूक करण्याचे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळत नाही. याचे कारण म्हणजे, भारतीय मंडळी सोने खरेदीकडे फक्त गुंतवणूक म्हणून न पाहाता, अडचणीच्या वेळी धावून येणारा झटकन पैसे देणारा सुरक्षित मार्ग म्हणूनही पाहतात. अतिशय अडचण असली तरच भारतीय मंडळी सोने विकताना दिसतात, अन्यथा ते सातत्याने थोडे-थोडे सोने खरेदी करीत राहतात. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार, 2024 मध्ये भारतातील सोन्याची मागणी अंदाजे 700 ते 750 टन असावी असा अंदाज आहे.
रिझर्व्ह बँकेने 77 टन सोने खरेदी केले
जगभरातील मध्यवर्ती बँकांनी मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. सोन्याचे दर वाढण्याचे हे देखील एक कारण आहे. जानेवारीपासून ऑक्टोबरपर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेने 77 टन सोने खरेदी केले. 2023 मध्ये पहिल्या 10 महिन्यांत जेवढे सोने रिझर्व्ह बँकेने खरेदी केले होते, त्याच्या पाचपट अधिक सोने यावर्षी खरेदी केले आहे. तुर्कस्तान आणि पोलंडने याच काळात अनुक्रमे 72 आणि 69 टन सोने खरेदी केले आहे.