बाणेदारपणे मृत्यू स्वीकारणारे साहिबजादे

    दिनांक :26-Dec-2024
Total Views |
वेध
- नीलेश जोशी
Kareena Thapa : अमरावती येथील कठोरा परिसरात असलेल्या अंबा अपार्टमेंटमधील रहिवासी अद्याप १५ मेची सायंकाळ आठवल्यानंतर शहारतात. या दिवशी अंबा अपार्टमेंटच्या बी विंगमधील दुसर्‍या माळ्यावर असलेल्या धूर निघत असल्याचे दिसले. हे पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. तर भयभयीत होऊन आता काय होईल, असा प्रश्न काहींच्या मनात उभा राहून ते थबकले. पण त्याच वेळी अवघ्या १७ वर्षांची करिना थापा धूर निघत असलेल्या फ्लॅटकडे धावली. फ्लॅटचे कुलूप तोडून तिने आत प्रवेश केला. आग आणि धुराचे लोट येत मात्र, तिने पाण्याचा मारा करीत सिलेंडरलगत लागलेली आग आटोक्यात आणली. एवढेच नव्हे तर सिलेंडर बाहेर काढले. जर आगीतून सिलेंडर बाहेर काढले नसते तर सिलेंडरचा स्फोट होण्याची शक्यता होती. करिना थापाचे साहस, समयसूचकतेमुळे मोठी घटना टळली. अंबा अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या ७० कुटुंबांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अनपेक्षित संकट ओढवल्यावर त्या संकटावर मात चालून जाण्याची वृत्ती उपजतच असावी लागते. शौर्य, धाडस, समयसूचकता या गुणांचे एकत्रीकरण झाले की, करिना थापासारखे शौर्य समोर येते. करिना थापाला आज अर्थात २६ डिसेंबर रोजी ‘वीर बाल दिवस’ कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. शौैर्य आणि पराक्रमाचा वारसा, इतिहास आमच्या समाजाला असून याच शृंखलेतील साहिबजादा जोरावरसिंग आणि फतेहसिंग स्मरणार्थ हा पुरस्कार केंद्र शासनाने २०२२ सालापासून सुरू केला.
 
 
Kareena Thapa
 
Kareena Thapa आपल्या देशाचा इतिहास हा त्याग, बलिदान आणि शौर्याचा आहे. इतिहासातील अनेक प्रसंग चिरकाल प्रेरणादायी आहेत. शिखांचे दहावे गुरू श्रीगुरुगोविंदसिंगांचे साहिबजादा जोरावरसिंग, फतेहसिंग ही दोन मुले. त्यातील मोठ्याचे वय ९ वर्षे तर लहाना अवघ्या ७ वर्षांचा. या दोेघांचेही धर्म रक्षणासाठीचे शौर्य, चिरस्मरणीय असेच म्हणावे लागेल. तो काळ मोगलांच्या अन्याय, अत्याचाराचा होता. मोगल सैन्याचे आक्रमणही नित्याचेच. मोगल सैन्याने आनंदपूर किल्ल्याला वेढा घातला. या वेढ्यामुळे अन्न, धान्य आणि पाण्याचा तुटवडा किल्ल्यात जाणवू लागला. किल्ला सोडाल तर नागरिकांना सुरक्षित बाहेर जाऊ देऊ, असा निरोप मोगलाच्या सेनापतीने कुराणाची शपथ घेऊन पाठविला. त्यानंतर ८ महिन्यांनी आई-पत्नी, चार मुले आणि साथीदारांसह किल्ला सोडून निघाले. पण कुराणाची शपथ न पाळता मोगल सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. या गदारोळात जोरावरसिंग, फतेहसिंग आणि त्यांची आजी यांची ताटातूट झाली. त्यातच ज्या ठिकाणी हे तिघेही थांबले होते त्यांनी दागिन्यांच्या मोहाने मोगलांना माहिती दिली. मोगलांनी या तिघांनाही अटक केली. मोगलांनी अटक केल्यानंतर छळ केला असेल याची कल्पना इतिहासातील अनेक दाखल्यांवरून करता येऊ शकते. या अवघ्या ९ आणि ७ वर्षांच्या दोन्ही मुलांना मोगलांचा सरदार वझीरखान याच्या समोर नेण्यात आले. त्यावेळी वझीरखानने ‘इस्लाम स्वीकारा, तुम्ही मागाल ते मिळेल’, असा प्रस्ताव ठेवला. त्यावेळी साहसाने ओतप्रोत असलेल्या या दोघांनीही ‘आमचा धर्म आम्हाला प्राणाहूनही प्रिय आहे, तो सोडणार नाही. आम्ही गुरुगोविंदसिंगांची मुले आहोत.
 
 
Kareena Thapa आमच्यासमोर आमचे आजोबा श्रीगुरू तेगबहादूरसिंह यांचा आदर्श आहे. त्यांनी धर्मरक्षणासाठी प्राण दिले. आम्ही आमचा धर्म सोडणार नाही’, असे बाणेदार उत्तर दिले. त्यानंतर या कोवळ्या मुलांना भिंतीत चिरडून मारण्याचा आदेश देण्यात आला. दोघांच्याहीभोवती भिंती उभारल्या जाऊ लागल्या. पण दोघांच्याही चेहर्‍यावर मृत्यूचे भय नव्हते. काही वेळानंतर वयाने मोठा असलेल्या जोरावरसिंगाच्या डोळ्यात अश्रू आले. ते पाहून लहाना फतेहसिंग म्हणाला ‘तुझ्या डोळ्यात अश्रू, मृत्यूची भीती वाटत आहे का?’ यावर जोरावरसिंगाने उत्तर दिले की, ‘अरे मी मोठा असूनही बलिदानाचा पहिला मान तुला मिळणार आहे याचे वाईट वाटते’. लहान्याची उंची कमी असल्याने पहिले बलिदान फतेहसिंगाचे होणार होते. हा संवाद झाला. त्यानंतर २६ डिसेंबर १७०५ रोजी वझीरखान याने या दोेघांनाही निर्घृणपणे ठार केले. त्यांनी हसत-हसत हौतात्म्य स्वीकारले. देश, धर्मासाठी सर्वोच्च बलिदान देणार्‍या हुतात्म्यांचा इतिहास स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे सांगितलाच गेला नाही. हे दुर्दैवच. पण या पराक्रम, शौर्य, साहसाचा वारसा असणार्‍यांचे शासन केंद्रात येताच या सर्वांचे यथोेचित स्मरण करण्याचा सुरू केला आहे. 
 
- ९४२२८६२४८४