पूर्वसुरींच्या संघर्षाचे स्मरण

26 Dec 2024 06:00:00
अग्रलेख...
Sumatitai Sukalikar : लोकमाता स्व. सुमतीताई सुकळीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता समारोह २४ डिसेंबर २०२४ रोजी नागपुरात पार पडला. या कार्यक्रमात भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताईंना आदरांजली अर्पण करताना वेगळ्या तारा छेडल्या. त्या तारा होत्या इतिहासाच्या. त्या तारा होत्या ताईंसारख्या भारतीय जनता पार्टीच्या पूर्वसुरींच्या योगदानाच्या, बलिदानाच्या, संघर्षाच्या! भाजपाला आज जे वैभव प्राप्त झाले आहे, ते ताईंसारख्या लोकांनी केलेल्या संघर्षाचे, कष्टाचे फलित होय आणि याची आठवण नव्या पिढीतील भाजपा ठेवली पाहिजे, त्यांच्या त्यागाप्रति व योगदानाप्रति कृतज्ञ असले पाहिजे, असे या दोन्ही नेत्यांनी उपस्थितांना सांगितले. एका अर्थाने ते ‘जरा याद करो कुर्बानी’च्या आशयाचे आवाहन होते. सुमतीताईंच्या निमित्ताने जुन्या अनेक गोष्टींना, घटनांना उजाळा मिळाला. नितीन गडकरी यांनी तर त्या काळाचे शब्दचित्र सार्‍यांपुढे उभे केले. ते म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जनता चिन्हावर निवडणूक लढवली गेली तेव्हा नागपुरात अनाऊन्समेंट करायला मी फिरलो. रिक्षावर फिरायला अनेक लोक तयार नसायचे. कारण पार्टीचा रिक्षा दिसला की लोक दगड मारायचे आणि पोस्टर फाडून टाकायचे. पोस्टर्स फाडली जाऊ नयेत म्हणून विद्युत मंडळाच्या कर्मचार्‍यांशी दोस्ती करून त्यांच्या मदतीने उंच ठिकाणी ती लावली जायची. प्रचंड कष्टाचे दिवस होते. प्रचंड अपप्रचार झाला होता. पक्षाला आदर नव्हता, सन्मान नव्हता आणि लोकमान्यताही नव्हती. तरीही आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ताईंनी पक्षाचे काम पुढे नेले. सुमतीताई झोपडपट्टीत जाऊन लोकांची सेवा करायच्या. पक्ष आणि संघटना संकटात असतानाही ताईंनी राष्ट्रकार्य सोडले नाही. सुमतीताई व त्यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी आयुष्यभर संघर्ष सोसला म्हणून आपल्या पक्षाला दिवस आले आहेत.
 
 
Sumatitai Sukalikar
 
Sumatitai Sukalikar : आज आपल्या पक्षाला, विचारांना जागतिक मान्यता मिळाली आहे. त्याचे श्रेय ताईंसारख्या जुन्या कार्यकर्त्यांना आहे, याची जाणीव नवीन पिढीतील कार्यकर्त्यांनी ठेवणे आवश्यक आहे, असे गडकरी म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही बालपणापासून आत्याच्या स्वरूपात वाट्याला आलेल्या ताईंच्या कार्याचा गौरव करून आपल्या भावना व्यक्त केल्या. एकुणात हा सोहळा जरी सुमतीताईंच्या सांगतेचा असला तरी भाजपाच्या समस्त कार्यकर्त्यांसाठी नव्य प्रकारचे चिंतन आणि कृतज्ञतेचा सांगावा देणारा होता. ताई चार वेळा निवडणूक लढल्या आणि पराभूत झाल्या. त्यांना निवडणूक लढवण्याची हौस होती म्हणून त्या लढल्या नाहीत. त्यांना पक्ष आणि विचार पुढे न्यायचा होता, यासाठी त्या लढल्या. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या निष्ठेेचे मर्म समजून घेतले पाहिजे. भाजपा हा जागतिक पातळीवर मान्यता पावलेला पक्ष झालेला आहे. दशकभराहून अधिक काळ भाजपाचे सरकार केंद्रात आहे. वीसहून अधिक राज्यांत सत्ता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाचा बोलबाला आहे. २ खासदार ते ३०३ खासदार असा टप्पा या पक्षाने गाठला आणि नंतर सातत्याने सत्तेचे सोपान हा पक्ष चढत राहिला हे आपसूक घडलेले ते केवळ काँग्रेस आणि अन्य विचारांच्या पक्षांची पीछेहाट झाली म्हणूनही घडलेले नाही. हे घडून आले ते ताईंसारख्या कर्मठ कार्यकर्त्यांच्या संघर्षामुळे. थोडे मागे वळून पाहिले तर असे दिसते की, १९५१ मध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. सांस्कृतिक ऐक्य, आर्थिक स्वावलंबन आणि राष्ट्रवादी आदर्शांचे समर्थन करण्यासाठी जनसंघ राजकीय म्हणून उदयास आला. काँग्रेस पक्षाचे सार्वत्रिक वर्चस्व आणि प्राबल्य असलेल्या युगात जनसंघाचा आरंभ झाला तो काळ अत्यंत प्रतिकूलतेचा होता. डॉ. मुखर्जी यांनी पक्षाची सुरुवातीपासून उभारणी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत फक्त तीन जागा या पक्षाला जिंकता आल्या. १९५३ मध्ये जम्मू-काश्मीरमधील परमिट सिस्टम संपवण्याच्या प्रयत्नांदरम्यान, पोलिसांच्या ताब्यात डॉ. मुखर्जी यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांचा मृत्यू झाला की हत्या झाली, हे आजही गूढ आहे. राष्ट्रवादी आणि राष्ट्रप्रेमी विचारांसाठी स्वतंत्र भारताच्या इतिहासात पडलेली ही पहिली आहुती होती. जनसंघाची विचारधारा सांस्कृतिक राष्ट्रवादावर आधारलेली होती. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्यासारख्या नेत्यांनी या विचारांचा विस्तार करून ‘एकात्म मानववादा’ची संकल्पना मांडली.
 
 
 
आध्यात्मिक आणि मूल्यांसह आर्थिक प्रगतीची सांगड घालणारे हे तत्त्वज्ञान. आणि मार्क्सवादाला विरोध करणारा हा विचार. त्यानंतर आणिबाणीचे पर्व आले. जनसंघासह विरोधकांनी लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी लढा दिला. १९७७ मध्ये जनसंघाने इतर विरोधकांना सोबत घेऊन जनता पक्षाची स्थापना केली. १९७७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत जनता पक्षाच्या विजयात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि इतर नेत्यांनी महत्त्वपूर्ण बजावली. त्यांच्या सोबत सुमतीताईंसारखे कार्यकर्ते होते. त्या सार्‍यांच्या प्रयत्नांतून स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच काँग्रेसेतर पंतप्रधान म्हणून मोरारजी देसाई यांचे सरकार आले. तोही काळ मागे पडला आणि १९८० मध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. वाजपेयी आणि अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने आपल्या राष्ट्रवादाप्रति असलेल्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला. याही टप्प्यावर सुमतीताईंसारखे लोक होते. ‘एकात्म मानववाद’ तत्त्वज्ञानाने भाजपाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनाला वैचारिक पाया प्रदान केला आणि परंपरेला प्रगतीशी जोडले. सुमतीताई सुकळीकर आणि इतर तळागाळातील असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. सार्वजनिक सभा आयोजित केल्या, साहित्य वाटप केले, गरिबांची सेवा केली आणि वैयक्तिक पातळीवर मतदारांशी संवाद साधला. आजच्या भाजपाचे हे एका बीजारोपण होते.
 
 
Sumatitai Sukalikar : भाजपाची सुरुवातीच्या निवडणुकीतील कामगिरी देखील तशी माफकच होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि जनता पार्टीच्या मुशीत तयार झालेले बिनीचे कार्यकर्ते व नेते असल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळू लागले. वारंवार पराभव होऊन लढाई सुरू ठेवावी लागते, याचे धडे त्या काळच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांकडून घेतले. जनसंघ आणि जनता पार्टी भाजपालाही आरंभी थट्टा आणि उपहासाचा सामना करावा लागला. संघर्ष संपत नव्हता आणि तो केवळ राजकीय नव्हता. घरावर तुळशीपत्र ठेवून पायाला भिंगरी लागल्यागत फिरायचे, मिळेल तेथे व मिळेल ते खायचे, कार्यकर्त्यांच्या घरीच मुक्काम करायचा, स्वस्तात स्वस्त प्रवास करायचा, मोजके कपडे, मोजक्या वस्तू. १९८० आणि १९९० चे दशक हा भाजपासाठी परिवर्तनाचा होता. रामजन्मभूमी आंदोलनाने पक्षाला राष्ट्रीय राजकारणात मोठा हात दिला. वाजपेयी आणि अडवाणी यांच्या करिष्माई नेतृत्वाचा उदय झाला आणि पक्षाच्या वाटचालीचा पुढचा मार्ग सुकर झाला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली १३ दिवसांचे सरकार ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे मातब्बर सरकार असा टप्पा भाजपाने याच काळात पाहिला. आता भाजपात मोदी पर्व सुरू आहे. तिसर्‍यांदा केंद्रात भाजपाचे सरकार आले आहे. भारताच्या प्रगतीची घोडदौड सुरू आहे. अशा स्थितीत कार्यकर्ते थोडेसे निवांत होणे, काहीसा उर्मटपणा येणे, स्वार्थ बोकाळणे हे सारे स्वाभाविक आहे. त्यावर मात केली पाहिजे. पूर्वसुरींच्या कष्टांमुळेच हे दिवस आपल्या वाट्याला आलेले आहेत, हे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. सत्ता माणसाला भ्रष्ट करते आणि सत्ता पूर्णपणे भ्रष्ट करते, असे एक सुभाषित आहे. त्या सुभाषिताचा मथितार्थ असा की, सत्तेच्या पदांवर बसलेल्यांनी पूर्वसुरींच्या संयमी आणि सहनशील अशा व्यक्तिमत्त्वांचे नेहमी स्मरण करीत राहिले पाहिजे आणि सत्तेला चिकटून येणार्‍या दुर्गुणांपासून दूर राहिले पाहिजे. सुमतीताईंना आदरांजली अर्पण करीत असताना गडकरी आणि फडणवीस या दोन्ही नेत्यांनी केलेल्या आवाहनाचा अर्थ आहे.
Powered By Sangraha 9.0