-विद्यार्थ्यांना २ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार
-१० वर्षांत एकूण ५० हजार शिष्यवृत्ती दिल्या जाणार
मुंबई,
Reliance Foundation : रिलायन्स फाउंडेशनने अंडरग्रॅज्युएट शिष्यवृत्ती योजने अंतर्गत देशभरातून ५ हजार विद्यार्थ्यांची निवड केली आहे. निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी धीरूभाई अंबानी यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त जाहीर करण्यात आली. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला २ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. या शिष्यवृत्ती योजनेसाठी १ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. निवडलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ७०% विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे. या शिष्यवृत्तीचा व्याप खूपच विस्तृत आहे. देशातील २९ राज्यांतील ५४० जिल्ह्यांमधून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. हे ५ हजार विद्यार्थी सुमारे १३०० शिक्षण संस्थांशी संबंधित आहेत. ज्या राज्यातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक शिष्यवृत्ती दिल्या जातील, त्यामध्ये आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्र हे अग्रस्थानी आहेत. महाराष्ट्राच्या २९० विद्यार्थ्यांना देखील यश मिळाले आहे.
रिलायन्स फाउंडेशनच्या प्रवक्त्यांनी १ लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना म्हटले, “निवडलेले विद्यार्थी देशातील सर्वांत हुशार विद्यार्थ्यांपैकी आहेत.Reliance Foundation शिक्षण ही भविष्याची किल्ली आहे, आणि या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा भाग होण्यात आम्हाला अभिमान वाटतो. प्रतिष्ठित रिलायन्स फाउंडेशन अंडरग्रॅज्युएट शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आमचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेपर्यंत पोहोचण्यास मदत करणे, ज्यामुळे ते भारताच्या विकासात योगदान देऊ शकतील.”
शिष्यवृत्तीची संपूर्ण यादी
www.reliancefoundation.org या संकेतस्थळावर पाहता येईल. १७ अंकी अर्ज क्रमांक किंवा नोंदणीकृत ईमेल आयडीद्वारे निकाल तपासता येईल.
Reliance Foundation डिसेंबर २०२२ मध्ये रिलायन्सचे संस्थापक-अध्यक्ष धीरूभाई अंबानी यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी पुढील १० वर्षांत ५०००० शिष्यवृत्त्या देण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी ५१०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या जात आहेत. भारतातील सर्वांत मोठ्या खासगी शिष्यवृत्ती योजनेचा विक्रमही रिलायन्स फाउंडेशनच्या नावावर आहे.