मुंबईच्या समुद्रात स्पीड बोट आणि प्रवासी बोटीचा अपघात

29 Dec 2024 05:50:00
- विश्लेषण -
राष्ट्ररक्षा
'Neelkamal' boat accident : नौदलाच्या स्पीड बोटीने गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटादरम्यान प्रवासी ‘नीलकमल’ बोटीला धडक दिली. झालेल्या अपघातात प्रवासी वाहतुकीच्या बोटीला जलसमाधी मिळाली. या बोटीतील १० प्रवासी तीन नौदल कर्मचारी अशा १३ जणांना मृत्यू झाला. या अपघातात दोष होता तो नौदलाच्या स्पीड बोटीचा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. केंद्रानेही दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली. जखमींना उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
 
speed-boat-accident
 
हा अपघात कशामुळे झाला?
नौदलाच्या माहितीनुसार, या बोटवर नवे इंजिन लावण्यात आले होते. त्या इंजिनची चाचणी घेतली जात होती. स्पीड बोट ‘नीलकमल’ बोटीपासून काही अंतरावर समुद्रात चाचणी करत होती. काही वेळा स्पीड बोटीने प्रवासी बोटीच्या आजूबाजूला पण चाचणी केली. मात्र टर्न घेताना ती अनियंत्रित झाली. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने स्पीड बोटीचं नियंत्रण सुटले व स्पीड बोट नीलकमल येऊन धडकली.
इंजिन बदलासारखा मोठा बदल जेव्हा स्पीड बोटमध्ये होतो, तेव्हा त्याची सर्व निकषांनुसार काटेकोरपणे चाचणी घेतली जाते. यावेळी संबंधित इंजिन उत्पादित करणार्‍या कंपनीचे प्रतिनिधीही नौदलाच्या सोबत असतात. जर उत्पादक कंपनीने दावा केला की ते इंजिन ताशी १४० किलोमीटर वेगमर्यादा गाठू शकतं, तर ती बोट तेवढी वेगमर्यादा गाठते की याची चाचणी होते. पूर्ण चाचणी केली जात होती.
 
 
'Neelkamal' boat accident : अशा चाचणीदरम्यान बोट आठ आकड्याच्या आकारात समुद्रातून फिरवली जाते. मात्र हेच खोल समुद्रात करता आले असते. मात्र, दुर्दैवाने याचवेळी इंजिनमध्ये बिघाड झाला आणि चालकाचा बोटीवरील ताबा सुटून ही स्पीड बोट नीलकमल बोटीवर आदळली. या बोटीवर नौदलाचे २ जवान आणि या बोटीला पुरवणार्‍या कंपनीचे ४ कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांनी बोटचालकासह बोटीवर असणार्‍या सर्व सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात सखोल तपास करण्यासाठी नौदलाकडून एका समितीची स्थापना आली आहे. नौदलाच्या बोटींना सराव करताना खबरदारी घेणे आवश्यक होते. चाचणी घन वाहतूक होणार्‍या भागात का? खोल समुद्रात का केली नाही?
प्रचंड वेगात ही बोट आदळल्याने त्यावरील तिघांचा मृत्यू झाला. या स्पीड बोटीच्या प्रचंड वेगामुळे नीलकमल बोटीला मोठी भेग पडली. स्पीड बोटचाही चक्काचूर झाला. नीलकमल बोटीमध्ये पाणी शिरू लागले. त्यामुळे प्रवासी घाबरले. त्यांची तारांबळ उडून पळापळ सुरू झाली. या घटनेची माहिती कळताच शेजारील अन्य बोटी, नौदल आणि कोस्टगार्डच्या बोटींसह बचावकार्य सुरू केल्याने ९९ वाचवण्यात यश मिळाले. नीलकमल बोटीवरील ५ खलाशी सुरक्षित आहेत.
 
 
बोटीत पुरेशी लाईफ जॅकेट उपलब्ध नव्हती
'Neelkamal' boat accident : नीलकमल बोटीत वेळेत लाईफ जॅकेट दिले नसल्याचा आरोप बोटीतून बचावलेल्या एका प्रवाशाने केला. अपघात झाल्यानंतर पाणी बोटीत शिरल्यानंतर लाईफ जॅकेट दिल्याचे त्यांनी सांगितले. बोटीत पुरेशी लाईफ जॅकेट उपलब्ध नव्हती. लाईफ जॅकेट प्रवासी बोटीवर असती मृतांना वाचविणे शक्य झाले असते. प्रवासी सुविधा देणार्‍या बोटीच्या मालकाने पुरेशी लाईफ जॅकेट ठेवणे आवश्यक होते. लाईफ जॅकेटचा तुटवडाप्रकरणी नीलकमलचा मालक जबाबदार आहे, नौका चालकासह इतरांवर हा गुन्हा दाखल केला आहे. अपघातावेळचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्याअनुषंगाने तपास सुरू करण्यात आला आहे.
 
 
नीलकमल बोटीवरील सुविधांचा अभाव, नियमांची पायमल्ली यामुळे अधिक हानी झाली आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून समुद्रमार्गे जहाजाने पर्यटक हे एलिफंटा लेणी तसेच अलिबाग येथे मोठ्या संख्येने जात असतात, मात्र अनेकदा क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन बोटी मार्गस्थ होतात. दुर्घटनाग्रस्त नीलकमल बोटही त्याला अपवाद नव्हती. नियमानुसार बोटीतील प्रत्येक प्रवाशाला लाईफ जॅकेट मिळणे बंधनकारक प्रवाशांनी ते प्रवासा दरम्यान घालणेही अपेक्षित आहे. मात्र, नीलकमल बुडताना अनेक प्रवाशांना लाईफ जॅकेट्स मिळू शकली नाहीत.
बोटीची क्षमता ८० प्रवाशांची असताना त्यावर शंभरपेक्षा अधिक प्रवासी होते. मात्र कर्मचारी पाच होते. अपघात झाल्यावर बोटीवर गोंधळ झाला. ती परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी, लाईफ जॅकेटचा वापर, आपत्कालीन परिस्थितीत काय करावे हे सांगण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ बोटीवर नव्हते.
 
 
अपघातांपासून आपण शिकलो का?
'Neelkamal' boat accident : गेल्याच महिन्यात गोव्यानजीक मासेमारी बोटीवर एक पाणबुडी आपटली. यात दोन मासेमारांचे प्राण गेले. जुलै महिन्यात नौदलाच्या ‘ब्रह्मपुत्रा’ या क्षेपणास्त्र युद्धनौकेवर आग लागली आणि एक खलाशी गेला. काही वर्षांपूर्वी ‘सिंधुदुर्ग’ नामक युद्धनौकेवरील आगीत दोन नौदल अधिकार्‍यांचे प्राण गेले होते. ‘सिंधुरक्षक’ नावाच्या पाणबुडीवर होऊन १८ नौसैनिक प्राणास मुकले. याखेरीज व्यापारी बोटी, तटरक्षक दलाच्या नौका इत्यादींमध्ये मुंबईच्या समुद्रात झालेले अपघात वेगळेच. भारताचे नागरी जीवन अत्यंत बेशिस्त आहे, त्यात अपघात नवे नसतात. पण नौदलाकडून जास्त काळजी घेणे अपेक्षित आहे.
जाणार्‍या जिवांच्या बरोबरीने आर्थिक नुकसानही होते. एका आकडेवारीनुसार देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नातील एक ते दीड आपण केवळ या अपघातांत गमावतो. यात जाणारे वा जायबंदी होणारे जे प्राधान्याने १५ ते ६० या वयोगटांतील असतात. कमावत्या वयात प्राण जाणे वा कायमचे अपंगत्व येणे हे कुटुंबांच्या आर्थिक स्थैर्यास भगदाड पाडणारे असते. प्रत्येक अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांस पंतप्रधानांपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळे जण लाखा-लाखांच्या आर्थिक मदतीच्या घोषणा करतात. प्रत्यक्षात होते ते कर भरणार्‍या नागरिकांचे. अपघातांतील मृतांस अलिकडे किमान पाच लाख रुपयांची तरी मदत दिली जाते. गेल्या पाच वर्षांत यावर किती रक्कम खर्च झाली असेल?
 
 
योग्य उपाययोजना तातडीने करावी
'Neelkamal' boat accident अपघात नैसर्गिक परिस्थितीमुळे किंवा मानवी चुकांमुळे होतो; तर कित्येकदा अनवधानाने, नजरचुकीने, यंत्र किंवा यंत्रणेतील बिघाडामुळेही अपघात होतात. नियम न पाळणे, खबरदारी न घेणे, अशा अनेक मानवनिर्मित कारणांमुळेही अपघात होऊ शकतो. चूक कोणाचीही असली तरी अनेक जण अपघातांमध्ये बळी पडतात. बेशिस्त नागरी वर्तनामुळे होणारे अपघात भारतीयांस नवे नाहीत; मात्र असे नौदलाकडून अपेक्षित नाही.
तसेच समुद्रात अपघात घडल्यावर तत्काळ मदत मिळणे आवश्यक आहे. मदतीस झालेला विलंब याचीही चौकशी होणे आवश्यक आहे. बोध घेत प्रशासनाने सागरात योग्य ती उपाययोजना तातडीने करावी. अन्यथा गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा तसेच उरण या भागात ये-जा करणार्‍या प्रवासी बोटीतून प्रवास करणे म्हणजे, मृत्यूसोबत घेऊन सागरी प्रवास करण्यासारखे होईल.
 
 
अजून काय करावे?
'Neelkamal' boat accident : मुंबईच्या समुद्रात रोज ७५० ते १००० छोट्या आणि मोठ्या बोटी प्रवास करतात. यामध्ये बोटी या पर्यटनाकरिता असतात, १०५ बोटी रोज प्रवाशांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातात. ३५० ते ३७५ मासेमारांच्या बोटी असतात. याशिवाय रोज पाच ते सहा कस्टम्सच्या, पाच ते सहा तटरक्षक दलाच्या/ नौदलाच्या, पाच ते सहा पोलिसांच्या बोटी प्रवास करतात.
याशिवाय २५ ते ३० व्यापारी जहाजे, क्रूझवर जाणारी जहाजे, एक ते दोन सहा ते सात इतर मोठ्या बोटी मिळून ३० ते ३५ बोटी बंदरात येतात किंवा जातात. परंतु या सगळ्यांच्या समन्वयासाठी एक कुठलीही मध्यवर्ती संस्था नाही.
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड फक्त पर्यटनाच्या बोटींना कंट्रोल करते. फिशरीज डिपार्टमेंट फिशिंग बोटवर लक्ष ठेवते. पोट ट्रस्ट मर्चंट शिपिंगची जहाजांवर लक्ष ठेवते. नौदल स्वतःच्या बोटी चालवते. गरज आहे ती ट्रॅफिक कंट्रोल करता एका मध्यवर्ती संघटनेची, जी सगळ्या प्रकारची मोठी आणि छोटी जहाजे समुद्रामध्ये कंट्रोल करू शकतील. ज्यामुळे समुद्रामध्ये होणारा गोंधळ कमी करण्यात मदत होईल. ही गरज खास तर सगळ्या मोठ्या बंदरात आहे, जिथे बोटींच्या येण्या आणि जाण्याची घनता जास्त आहे. मोठ्या बोटींचे जायचे व यायचे निश्चित केले जावे, ज्यामुळे अपघात होणार नाही.
- ब्रिगेडियर हेमंत महाजन
९०९६७०१२५३
(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)
Powered By Sangraha 9.0