संतांचे संगती मनोमार्ग गती !

29 Dec 2024 05:45:00
संत प्रबोधन
समाजातील सर्वांचे कल्याण व्हावे. सर्वांचा संसार सुखाचा व्हावा. सर्वांना शाश्वत सुख मिळावे व ईश्वरप्राप्ती व्हावी. यासाठी Saint Tukaram संत तुकारामांनी जो कर्तव्यकर्माचा उपदेश केला तो म्हणजे सर्वांसाठी अनुकरणीय आचारधर्म सांगितला आहे. तो पूर्णपणे समाजबद्ध आहे. ‘भक्तिरस म्हणजे ब्रह्मरस’, हा देवाचा प्रसाद त्यांनी सर्वांना वाटला. संसार दुःखरूप आहे. परंतु, मनात सदैव श्रीहरीचे चिंतन असेल तर, सांसारिक आपत्तीचे भय वाटत नाही. संसार सुखाचा होतो. हा भक्तिरस सेवन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. तेथे उच्च-नीच कोणी नाही.
ब्राह्मण, क्षेत्री, वैश्य, शूद्र, आहे अधिकार |
बाळे नारी नर आदि करोनि वेश्या ही ॥
(तु.गा.११३७)
 

Saint Tukaram 
 
अशा प्रकारे मनुष्यमात्रांनी जीवन जगताना वेदनीतीचा अंगीकार करावा. वेदमार्गाने जावे, असा आदर्श आचाराचा मोलाचा संदेश संत तुकाराम आपल्या अभंगवाड्:मयातून देतात. विहित कर्माचे आचरण करणे योग्य आहे. कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे केव्हाही श्रेष्ठ आहे. कर्म केल्याविना कोणत्याही निर्वाह होणे अशक्य आहे. संत तुकारामांनी भक्तांसाठी त्यांचा भक्तिभाव व संपन्न आचाराचा जीवनक्रमच त्यांच्या अभंगवाड्:मयातून मांडला आहे. त्यांनी प्रपंच टाळला नाही. जनसामान्यांनाही तो टाळणे शक्य नाही. हे जाणून त्यांनी जो उपदेश केला, जे शाश्वत नीतिशास्त्र सांगितले, त्यावरून मानवी जीवनावरची त्यांची निष्ठा व आस्था दिसून येते. त्यांच्या उपदेशामध्ये प्रामुख्याने खालील अंतर्भाव आढळून येतो -
१) प्रपंच त्यागबुद्धीने करावा.
२) प्रपंचामध्ये अडकून पडू नका.
३) प्रपंचातून हळूहळू बाहेर पडा.
४) विश्वात्मक जाणिवांशी जवळीक साधा.
संतांनी सांगितलेले हे आचाराचे नीतिशास्त्र आजही एकविसाव्या शतकामध्ये मानवी जीवनाला उन्नत करून सामर्थ्यशाली बनविण्यास समर्थ आहे. त्यामुळेच संत तुकारामांचे अभंगवाड्:मय परमेश्वराच्या अमरवाणीच्या रूपाने एक प्रकारे अक्षरवाङ्मय आहे. संत तुकारामांनी सांगितलेली आचाराची साधना हा एक क्रियायोग आहे. त्यासाठी वैराग्याची कास धरल्यास साक्षात परमेश्वराचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. ‘पांतजलयोगदर्शन’ मध्येसुद्धा तोच संदेश दिलेला आढळतो-
तपः स्वाध्यायेश्वरप्रणिधानानि क्रीयायोग ॥
 (पातंजलयोगदर्शन, २ साधपाद, सूत्र१ पृ. १३४ )
 
 
Saint Tukaram भगवंतप्राप्तीच्या आंतरिक इच्छेने चित्तशुद्धीसाठी काया, वाचा आणि मन यांच्यावर नियंत्रण हे तप. अविरत चिंतन व शास्त्रादिकांचे अध्ययन हा स्वाध्याय आणि कायिक, वाचिक व मानसिक कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने करणे हे ईश्वरप्रणिधान आहे. या तिहींचे अनुष्ठान हा क्रियायोग होय. सामान्यजनांसाठी योगाचरण हे कार्य फार अवघड आहे. संत तुकारामांनी त्यांना भक्तीच्या मार्गाने जाण्यास सांगितले आहे.-
भक्तीचिया मापे मोजितो अनंता |
इतराने तत्त्वता न मोजवे
योग याग तपे देहाचिया योगे |
ज्ञानाचिया लागे न सापडेसी ॥
(तु.गा.८०४)
भक्तिमार्गाचे अनुसरण केल्यास योगमार्गाने गेल्याचे फळ तर मिळतेच, सोबतच प्रेमसुखाचा लाभ होतो. -
योगाचे ते भाग्य क्षमा | आधी दमा इंद्रिये ॥
अवघी भाग्ये येती घरा | देव सोयरा जालिया ॥
 (तु.गा.८१)
 
 
Saint Tukaram देव सोयरा झाल्यावर योगमार्गाची साधना भक्तीनेच साध्य होते. म्हणून ते इतर कोणत्याही मार्गापेक्षा भक्तिमार्गाचे आचरण करण्यास सांगतात. समाधी अवस्थेतील योगिजन देवाचे जे रूप निरखून पाहतात, ते रूप आम्हास भक्तीच्या सहज समाधीमध्ये डोळ्यांपुढे लीलया दिसते. परंतु, त्यासाठी वैराग्य अंगी धारण केले पाहिजे. त्यासाठी संसार सोडण्याची आवश्यकता नाही.
त्यासाठी संतांनी सांगितलेल्या आचाराचे पालन करणे मात्र आवश्यक संसार करावा परंतु, तो आसक्तीने नाही तर, विरक्तीने करावा. सर्वच बर्‍या वाईटाचे मूळ मनामध्ये आहे. त्यासाठी मर्कटाप्रमाणे चंचल असणार्‍या व ओढाळ जनावराप्रमाणे भटकणार्‍या मनाला वैराग्याचा मनोनिग्रह आवश्यक आहे. संत एकनाथांनी आचारमूल्यांच्या वैराग्याचा वस्तुपाठच सांगितला आहे. तो असा, -
जरी कृपा उपजे भगवंता | तरी होय मागुता विरक्त ॥
तो कैसा म्हणाल | तरी मानिले टाकी स्थळ ॥
सत्संगी राहे निश्चल | न करी तळमळ मनाची ॥
न मांडी स्वतंत्र फड | का जे आंगा येईल अहंतावाड ॥
जीविकेची न धरी चाड | न बोले गोड मनधरणी ॥
नावडे प्रपंच जनी बैसणे | नावडे योग्यता मिरवणे ॥
नावडे कोणासी | बरवे खाणे नावडे ॥
नावडे लेणी लुगडी | नावडे लैकिक परवडी ॥
नावडे परान्नाची गोडी | द्रव्य जोडी नावडे ॥
नावडे स्त्रियांत बैसणे | नावडे स्त्रियांत पहाणे ॥
नावडे स्त्रियांचे रडगणे | त्यांचे बोलणे नावडे ॥
स्वस्त्रियेसही कार्यापुरते | बोलावे स्पर्शावे निरुते ॥
परी आसक्त होऊनी तेथे | संते न वर्तावे ॥
अखंड एकांती असणे | प्रमदासंगे न राहणे ॥
जे निःसंगे निराभिमाने | त्या जवळी बैसणे सर्वदा ॥
कुटुंब आहारार्थ अन्न |
अकल्पित न मिळे तरी कोरान्न करणे ॥
ऐसे जयाचे वर्तने | ते जाणणे शुद्ध वैराग्य |
ऐसे वैराग्य नाही ज्यासी | कृष्ण प्राप्ती कैसी ॥
म्हणोनि कृष्ण भक्तीसी | स्थिती ऐसी असावी ॥
(ए. भा. चिरंजीव पदावली २५-३४)
 
 
Saint Tukaram संत तुकारामांनी आपल्या अभंगातून सातत्याने समाजातील सर्वांच्या कल्याणाची आर्त तळमळ मांडली आहे. त्या तळमळीतून सर्वांना शाश्वत सुख मिळावे, सर्वांचा संसार सुखाचा व्हावा, असा भाव प्रकट होतो. त्यासाठी त्यांनी समाजातील लोकांना कर्तव्यकर्म व सदाचाराचा जो उपदेश आहे, तो सर्वच काळातील समाजाला संबद्ध आहे. संसार जरी दुःखमय असला तरी, मनामध्ये सतत परमेश्वराचे नामस्मरण व हातामध्ये सदाचारयुक्त कर्तव्यकर्म असेल तर संसाराची भीती बाळगण्याचे कोणतेही कारण नाही. या प्रपंचामध्ये कोणीही उच्च-नीच नाही. संसारामध्ये परमेश्वराचे नामस्मरण करण्याचा अधिकार सर्वांना आहे. भक्तिरस हा ईश्वरी प्रसाद आहे. तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, चांडाळ, वेश्यांनाही ग्रहण करण्याचा अधिकार आहे. संत तुकारामांनी आचारधर्माचा संपूर्ण सारांशच प्रस्तुत अभंगातून मांडला. -
पुण्य परउपकार पाप ते परपीडा|
आणिक नाही जोडा दुजा यांसी |
सत्य तो चि धर्म असत्य ते कर्म |
आणिक हे वर्म नाही दुजे ॥
गति ते चि मुखी नामाचे स्मरण |
अधोगति जाण |
संताचा संग तो चि स्वर्गवास |
नरक तो उदास अनर्गळा ॥
तुका म्हणे उघडे आहे हित घात |
जयाचे उचित करा तैसे ॥
(तु. गा.१०२१)
 
 
Saint Tukaram संत तुकारामांनी पाप आणि पुण्याची अगदी साधी-सोपी व्याख्या सांगितली आहे. काया, वाचा आणि मनाद्वारे एखाद्या असहायाला साहाय्य करणे म्हणजे परोपकार होय व परोकारासारखे जगात दुसरे कोणतेही नाही. साध्या-भोळ्या, निरपराध लोकांना विनाकारण त्रास देणे, छळणे म्हणजेच परपीडा. ते पाप होय. नीतिशास्त्रातसुद्धा पाप-पुण्याच्या संकल्पनेला अवर्णनीय असे महत्त्व आहे. वेदविहित सत्य आचरण हा स्वधर्म मानावा. जीवनामध्ये नीतिशास्त्राविरुद्ध असत्य आचरण करणे हा अधर्म आहे. पूर्व मीमांसाशास्त्रातसुद्धा याचे दाखले आढळतात. संतांचा सहवास म्हणजेच स्वर्गसुख तर, दुर्जनांशी सख्य नरकवास होय. आपले हित व अहित कशामध्ये आहे. हे आपण स्वतः ओळखणे आवश्यक आहे. पाप आणि पुण्य दुसरीकडे नसून ते आपल्या वर्तणुकीमध्ये आहे. त्यांच्या शिकवणुकीमध्ये-
१) ज्ञानातील डोळसपणा आहे.
२) कर्मातील शुचिता पाळणे आवश्यक मानतात.
३) भक्तीतील समर्पणता जीवनामध्ये महत्त्वपूर्ण आहे.
मनुष्याने याचकाला यथाशक्ती दान करावे. परमेश्वराशी नाते जोडण्यासाठी आणि दान हे दोन महत्त्वपूर्ण टप्पे आहेत. आतिथ्य आणि परोपकार यासोबतच दया व दान ही सर्वोत्तम जीवनमूल्ये आहेत. जीवनातील सर्वात्मभाव वाढविणारे ते संस्कारमोती आहेत. समाजाच्या उत्थान, उन्नतीकरिता प्रत्येकाने या सामाजिक सद्गुणरूपी जीवनमूल्यांचे पालन करून भक्तिमार्गाने जीवन जगावे, असा महत्त्वपूर्ण संदेश संत तुकारामांनी आपल्या आचारधर्मामध्ये सांगितला आहे-
तुका म्हणे तुम्ही याचि वाटे |
भरवशाने भेटे पांडुरंग ॥
(तु.गा.३७२८)
 
 
- प्रा. डॉ. हरिदास आखरे
७५८८५६६४००
Powered By Sangraha 9.0