निरोप देताना...चुकांचे परिमार्जन व्हायला हवे

29 Dec 2024 06:00:00
- स्वाती पेशवे
Welcome New Year : कमालीचा वेग घेतलेल्या आजच्या काळात बर्‍या-वाईट आठवणींचे गाठोडे पाठीवर टाकत आणखी एक वर्ष परतीच्या प्रवासाला लागले आहे. सरलेल्या ३६४ संध्यासमयांसारखी ही तिन्हीसांजही काळोखाच्या उदरात सामावेल आणि नव्या वर्षाच्या गर्भातून जन्म घेत नवतेज सामोरे येईल. निसर्गासाठी सामान्य असणारी ही घटना काळ-काम-वेगाचे गणित मांडत जगणारे जग अप्रुपाने साजरे करेल. आपले किती दिवस गेले आणि किती राहिले याचा विचार करत भविष्यातील ध्येय गाठण्याच्या दृष्टीने प्रत्येकाची नवी धाव सुरू होईल. खरे तर आत्तापासूनच ‘गेट-सेट-गो’च्या सूचना कानी घुमू लागल्या असतील. त्यामुळेच प्रत्येकाने जगाने स्वीकारलेल्या सर्वमान्य वर्षगणनेनुसार सुरू होणार्‍या या वर्षाचे स्वागत करण्याची आपापली पद्धतही एव्हाना ठरवली असेल.
 
 
sunset-b
 
अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत काळाची गती संथ होती. वर्षांचे येणे-जाणेही हलक्याशा झुळुकीसारखे सहज आणि सुखावणारे होते. जगण्याची स्पर्धा तीव्र्र नसताना सरते वर्ष नव्या वर्षाची नवी धास्ती देऊन जात नव्हते. आज एकीकडे नववर्ष स्वागताचा कल्लोळ वाढला असला तरी ते कसे जाईल, याविषयीच्या चिंता आणि भीतीचा सूरही तेवढाच तीव्र झाल्याचे दिसते. त्यामुळेच ग्रहणकाळात झाकोळणारे सूर्य वा चंद्रबिंब परछायेतून मुक्त होताच पूर्वीसारखे प्रकाशमान होणार आहे, हे ठाऊक असले तरी त्या काळात वाटणारी धास्ती आताशा वर्ष सरताना मनात डोकावून जाते. पूर्वी आणि प्रमाणात आजही ग्रहण लवकर सुटण्यासाठी ‘दे दान, सुटे गुरान’ म्हणत फिरणारे याचक दिसायचे. देवांना साकडे घातले जायचे. जपजाप्य पार पडायचे. ग्रहणकाळात न खाण्यापिण्याचा नेम पाळला जायचा. या सगळ्यामागे तमाची एक अदृश्य भीतीच दिसायची. आताही सरत्या वर्षाला निरोप देताना अस्थिर भविष्याविषयी अशी भीती दिसते. कर्कश्श होत जाणार्‍या नववर्ष स्वागताच्या साजरीकरणावर छटा स्पष्ट जाणवते. पुढे कधी असे सुख उपभोगायला मिळेल की नाही, या विचारातून अधिकाधिक आनंद लुटण्याचा प्रयत्न दिसतो. त्यामुळेच ही केविलवाणी स्थिती दूर सरून लख्ख प्रकाश घेऊन येणारे नवे पर्व सुरू होईल, अशी आशा करत त्याच्या स्वागताला सज्ज व्हायला हवे.
 
 
Welcome New Year : २०२४ हे वर्ष जागतिक पातळीवरील युद्धजन्य स्थितीने आणि देशपातळीवर पोळलेले होते. उच्च शिक्षण, नोकरी-धंदा वा अन्य कोणत्या कारणांमुळे देश-विदेशात गेलेले आपले लोक सुखरूप असतील का, विदेशांमध्ये त्यांना तात्कालिक वा कायमच्या निवासासाठी आवश्यक असणारा परवाना मिळेल का, रोजगाराची उपलब्धता कशी असेल, त्यांना परत तर यावे लागणार नाही ना, अशा एक ना अनेक प्रश्नांनी काही उच्च मध्यमवर्गीय घरांमधील वातावरणही ढवळून दिसले, तर दुसरीकडे निवडणुकांदरम्यान दिली जाणारे आश्वासने, मिळालेली भरघोस मदत, नानाविध कल्याणकारी योजना आदींमधून समाजातील एका वर्गाने सुखाचा काळही अनुभवलेला दिसला. तेव्हा मोदीपर्वाची तिसरी टर्म सुरू झाल्यानंतर आणि उलथापालथ घडवून आणणारे राजकारण कडेला जात राज्यात स्थिर सरकार स्थापन झाल्यानंतर आता आपल्या जगण्याचे चक्रही सुरळीत सुरू होईल, हीच आशा वर्षाला देणार्‍या प्रत्येकाच्या मनात आहे.
 
 
आता प्रौढावस्थेत असणारा आपला देश चौफेर घोडदौड करत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार करता विकासदरात सातत्यपूर्ण प्रगती करणार्‍या भारताने जगात तिसरे स्थान पटकावले आहे. आगामी काळात अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनची करण्याचे ध्येय समोर ठेवून त्या अनुषंगाने आर्थिक निर्णय घेत, आंतरराष्ट्रीय पातळीवरील परस्परसंबंध वृद्धिंगत करत, गर्तेतील देशांना मदतीचा देत आपण दमदार पावलांनिशी वाटचाल करत आहोत. जगाच्या कानाकोपर्‍यात भारतीयांना मिळणारा मान सुखावणारा आहे. वाढता दर्जा आपली बुद्धिमत्ता सर्वमान्य असल्याचे सिद्ध करणारा आहे. मात्र जगाच्या क्षितिजावर असे कौतुक मिळवणार्‍या देशातील अंतर्गत स्थिती कशी आहे याचाही गांभीर्याने विचार करण्याची हीच वेळ आहे. एकीकडे आपण विस्तारत्या रस्त्यांचे, मेट्रोसेवा, मोनोरेल आणि अन्य यंत्रणेचे गोडवे गातो, तर दुसरीकडे वाढत्या रस्ते अपघातामुळे परदेशांमध्ये बोलताना शरमेने आपली मान खाली जाते, असे दस्तुरखुद्द महनीय मंत्र्यांचे विधान ऐकतो. वेगावरील नियंत्रण सुटल्यामुळे कधी भररस्त्यात शिरलेले वाहन अनेक निरपराध सामान्यांना चिरडून जाते तर कधी भर समुद्रामध्ये खेळातील वाहने थडकावीत इतक्या थरारक पद्धतीने स्पीड बोट आणि प्रवासी नौकेची धडक लहानग्यांसह काहींना जलसमाधी मिळते. कधी वळणांवर तर कधी महामार्गांवर होणार्‍या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या तर गणतीतही नाही. ही स्थिती उगवणार्‍या प्रत्येक दिवशी ग्रहणाची दाहकता देणारी ठरते आहे.
 
 
Welcome New Year : एकीकडे जगातील अनेक देशांमध्ये स्त्रीला मातेसमान मानणारी आपली संस्कृती अभ्यासली जात आहे. अमृताशीही पैज जिंकणार्‍या विविध भाषांचा अभ्यास होत आहे. मात्र दुसरीकडे महिला-मुलींवरील अत्याचारांमध्ये वाढ होत आहे. वाढणारे क्रौर्य अंगावर भीतीचा शहारा उमटवून जात आहे. अगदी दोन-चार वर्षांच्या मुलींपासून सत्तर-ऐंशी वर्षांच्या वृद्धेपर्यंत कोणीही पुरुषी अहंपणाला आणि त्यांच्यातील पाशवी, लिंगपिसाट प्रवृत्तीला बळी ठरेल अशी स्थिती आहे, कारण तशी एक ना अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. मुख्य म्हणजे ‘पुरुष’ या संज्ञेमध्ये अगदी पंधरा-सोळा किशोरांचाही समावेश होताना दिसतो तेव्हा ग्रहणकाळ किती प्रदीर्घ आहे, हे जाणवते. आज महिला सुरक्षित, संरक्षित, सुशिक्षित, स्वाभिमानी झाल्या असल्याच्या काळातही त्यांच्यावरील अत्याचारांचे पाढे वाचत, त्यांच्या समर्थनासाठी हाती मेणबत्त्या घेऊन लाखोंना मोर्चे काढावे लागतात तेव्हा अंधार किती गडद आहे, हे स्पष्टपणे समजते.
 
 
आजच्या शिक्षणाचा उद्घोष होणार्‍या काळातही बालविवाहांचे नोंद घेण्याजोगे वाढती शाळागळती, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, शाळांची उपलब्धता नसणे यासारखे मुद्दे मुख्य मथळ्यात दिसतात तेव्हा खरेच जगाला आणि आपल्यालाही अपेक्षित असणारे स्थान ग्रहण करण्यास खरेच सज्ज आहोत का, हा प्रश्न पडल्याखेरीज राहात नाही. अर्थात, प्रचंड लोकसंख्येमधील प्रत्येक जीव सामाजिक नियमांचे काटेकोर पालन करत शहाणपणाने वागेल, ही अपेक्षा कोणी अभावानेच ठेवू उडदामाजी काळेगोरे राहणारच आहे. मात्र समाजावर निर्घृणतेने चरे उमटवणार्‍यांवर अंकुश बसेल, धाक निर्माण होईल आणि त्यांच्यामुळे होणारे नुकसान कमी होईल, ही अपेक्षा नक्कीच अवाजवी नाही. येत्या वर्षात तरी या दृष्टीने काही निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा आहे.
 
 
Welcome New Year : सध्या आपण निसर्गाचा लहरीपणाही जवळून अनुभवत आहोत. एका दिवसात सर्व ऋतूंचे दर्शन काळ सोसत आहोत. गेली काही वर्षे होत असलेल्या चुका दुरुस्त केल्या नाहीत तर येत्या काळात हा लहरीपणा वाढणारच आहे. त्यामुळेच येणारे वर्ष निसर्गाला न पेलणारा विकास कमी करण्याच्या विचाराच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. थेंबाथेंबाने तळे साठते हे खरेच आहे. मात्र अतिउष्णतेने त्याची वाफ होण्यासही वेळ लागत नाही, हे वास्तव पर्यावरणाला, वन्य जीवनाला हानिकारक ठरणार्‍या अनेक चुका आपल्या हातून झाल्या आहेत. अत्यंत संवेदनशील भागांमध्ये अट्टहासाने होणारा विकास आणि झालेले निकृष्ट काम खचणार्‍या बोगद्यांच्या, पडणार्‍या पुलांच्या, भेगाळणार्‍या रस्त्यांच्या, थोडा पाऊस झाला तरी पाण्याखाली जाणार्‍या मार्गांच्या रुपाने समोर आला आहे. त्यामुळे कुटुंबापासून समाजापर्यंत आणि ग्रामपातळीपासून देशपातळीपर्यंतच्या प्रत्येक पायरीवर याचा विचार होण्याची आहे. पुढच्या पिढीसाठी उत्तम वातावरण निर्माण करणे, आहे ते जपणे हे वर्तमानातील पिढीचे कर्तव्य असते. मात्र सध्याची पिढी असेल, नसेल त्या साधनांचा चट्टामट्टा करत, सगळे काही संपवण्याच्या मागे आहे. मिळाले नाही तर ओरबाडून घेण्याचा अधाशी प्रयत्न करणार्‍यांची भीड चेपल्याचे जाणवत आहे. याच प्रवृत्तीनिशी सामोरे गेलो तर नवीन वर्षात प्रवेश हे केवळ दिनदर्शिकेचे नवे पान उलटण्यासारखे होईल. ते कोरे असेल पण करकरीतपणा पुढच्या पिढीचे भविष्य धोक्यात आणणारा ठरेल. म्हणूनच यंदा इंग्रजी नववर्षाबरोबरच नवविचारांचेही स्वागत होणे गरजेचे आहे. देश आचार-विचाराने समृद्ध होईल तेव्हाच ग्रहणावस्थेतून बाहेर येत नव्या तेजाने झळाळून निघेल. तेव्हा नववर्षामध्ये त्याचे पहिले दर्शन घडेल अशी अपेक्षा व्यक्त करत सिद्ध होऊ या.
Powered By Sangraha 9.0