पाकिस्तानच्या मार्गावर निघालेला बांगलादेश

04 Dec 2024 17:23:16
अग्रलेख...
शेख हसीना यांच्या विरोधातील कारस्थान यशस्वी झाल्यानंतर गेल्या चारेक महिन्यांपासून Bangladesh बांगलादेश एका वेगळ्या स्थितीतून जात आहे. हसीना यांना पदच्युत केल्यानंतरच्या काळात बहुसंख्यकांचा उन्माद वाढणे, अल्पसंख्यकांवर हल्ले होणे आणि या हल्ल्यांचा विरोध केला म्हणून इस्कॉन या सेवाभावी संघटनेचे नेते चिन्मय कृष्ण दास यांना अटक होणे, इस्कॉनवर घालण्याची मागणी होणे, इस्कॉनच्या लोकांना कुठेही जाण्यास अटकाव करणे असे सारे अकल्पित वाटेल, असे बांगलादेशात घडू लागलेले आहे. इस्कॉनचा अपराध एवढाच की, त्या संघटनेने हिंदूंवरील अत्याचाराला संघटित विरोध दर्शविला आणि अल्पसंख्यकांना सरकारने संरक्षण द्यावे, अशी मागणी केली. बांगलादेशातून शेख हसीना यांना पदच्युत करण्यात आले. सध्या बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख विजेते मोहम्मद युनूस हे आहेत.
 
 
ISKCON
 
समाजाच्या शेवटच्या थरातील लोकांच्या आर्थिक सबलीकरणासाठी मायक्रो फायनान्सची संकल्पना मांडणारे हेच ते डॉ. मोहम्मद युनूस. हा माणूस अर्थशास्त्रात पीएच. डी. झालेला. त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार २००६ मध्ये मिळाला होता. पण, त्यांच्या नेतृत्वातील हंगामी सरकारला बांगलादेशात शांतता प्रस्थापित करण्यात यश येताना दिसत नाही. बांगलादेशाची स्थापना प्रादेशिक व सांस्कृतिक ओळख तसेच धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांवर झाली होती. बंगाली मुस्लिमांना इतर प्रदेशातील मुस्लिमांच्या तुलनेत उदार मानले जाते. त्यांचे बांगला संस्कृती, खाद्य, वस्त्र प्रावरणे आणि रीतिरिवाज यावर प्रेम आहे. बांगलादेशाचे राष्ट्रगीत ‘आमार शोनार बांगला’ हे असून ते गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेले आहे. स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आल्यावर काही वर्षांनी पुन्हा धर्मवेडाने शिरकाव केला. सत्तांतरे झाली, लष्करी बंड झाले. गेल्या काही दशकांपासून शेख हसीना आणि खालिदा झिया या दोन महिलांभोवती बांगलादेशचे राजकारण फिरत असते. काही महिन्यांपूर्वी बांगलादेश अवामी लीगच्या नेत्या आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना पदच्युत करण्यात आले. त्यांना देश सोडावा लागला. बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या बेगम खालिदा झिया शेख हसीना यांच्या राजकीय स्पर्धक-विरोधक. गेल्या २५-३० वर्षांपासून या दोघींनीच बांगलादेशचा कारभार चालविला आहे. एखाद्या मुस्लिमबहुल देशाचा कारभार दीर्घकाळ महिलांकडून चालविला जात असल्याचे बांगलादेश हे आशियातले एकमेव उदाहरण. आशियातला अल्पकालीन अपवाद म्हणजे पाकिस्तानच्या बेनझीर भुट्टो.
 
 
१९७१ मध्ये भाषिक एकता, सांस्कृतिक अस्मिता आणि धर्मनिरपेक्षतेशी असलेली बांधिलकी या आदर्शांतून Bangladesh बांगलादेशचा जन्म १९७१ चा मुक्ती संग्राम हा केवळ स्वातंत्र्याचा लढा नव्हता तर सांस्कृतिक अस्मिता आणि धर्मनिरपेक्षता जपण्याची धडपडही होती. १९७२ च्या संविधानाने ही तत्त्वे अंगीकारली आणि बांगलादेशला धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक घोषित केले. बांगलादेशची सुरुवातीची वर्षे अल्पसंख्यक समुदायांना एकत्रित करण्यासाठी आणि धार्मिक भेदांपेक्षा सांस्कृतिक वारशाला महत्त्व देणारी प्रादेशिक व राष्ट्रीय ओळख निर्माण करण्यासाठी गेली. मात्र, लगेच तेथे राजकीय हत्यासत्रे, लष्करी उठावांची मालिका सुरू झाली. याउपरही आशियातील धर्मनिरपेक्ष तसेच प्रगतिशील मुस्लिम राष्ट्र ही ओळख बांगलादेशने दीर्घकाळ टिकविली. तयार कपड्यांसह एकूणच वस्त्रोद्योगात बांगलादेशने मोठी भरारी घेतली. अगदी अलिकडच्या काळापर्यंत वेगाने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये बांगलादेशचा समावेश होता. एकीकडे पाकिस्तानमध्ये अंतर्गत कलह जोरात असल्यामुळे त्या देशाचा ठप्प झालेला. अशात बांगलादेश विकसित होत होता आणि त्याचे कारण होते तेथे धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वामुळे बर्‍यापैकी शांतता आणि स्थैर्य होते. ताज्या घडामोडी हे सांगतात की, बांगलादेशमधील शांतता आणि स्थैर्य भंग पावले आहे. त्यामागे गतकाळातील काही घटक कारण ठरले आहेत. एकीकडे औद्योगिक प्रगती सुरू असताना बहुसंख्यक वादाचा अनुनय करण्यासाठी बांगलादेशात मदरसा पाठबळ मिळू लागले. पुराणमतवादी विचारसरणीला प्रोत्साहन दिले जाऊ लागले.
 
 
आर्थिक असमानता होतीच. ती हळूहळू दूर झाली असती. पण, कट्टरपंथीयांनी असमानतेचा वापर धार्मिक द्वेषाची पेरणी करण्यासाठी सुपीक जमीन म्हणून केला. त्यातून संघर्ष वाढले. हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन यांसारख्या अल्पसंख्यक समुदायांना भेदभाव आणि हल्ल्यांना सामोरे जावे लागले. जातीय हिंसाचार वाढला. दुर्गापूजेदरम्यान मंदिरांवरील हल्ले किंवा सेक्युलर ब्लॉगर्सच्या हत्या यासारख्या घटनांनी तेथील परिस्थिती चिघळत असल्याकडे आधीच अंगुलिनिर्देश केला होता. शेख हसीना यांना पदावरून घालवण्याची घटना हा दीर्घकाळ सुरू असलेल्या कटाचा शेवट नव्हता; तो मध्यंतर होता, हे आता स्पष्ट झाले आहे. कारण आता बांगलादेशात कुणीही प्रगती, अर्थकारणावर बोलत नाही. अल्पसंख्यकांच्या विरोधात बोलणे आणि हल्ले करणे हा राष्ट्रप्रेमाचा पुरावा बनला आहे. महिलांच्या हक्कांवरही गदा आली आहे. खरे तर बांगलादेशने भारत आणि पाकिस्तान यांच्या उदाहरणांतून शिकावे, असे बरेच काही आहे. भारताची फाळणी धार्मिक मुद्यावर झाली होती. तरीही भारताने धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाचा अंगीकार करून जागतिक स्तरावर नेता बनण्याएवढी प्रगती साध्य केली. धार्मिक आधारावर निर्माण झालेला पाकिस्तान फेल्ड स्टेट ठरला. बांगलादेशच्या निर्मितीत भारताची भूमिका होती. त्यामुळे त्या देशाचे भारताशी चांगले संबंध होते. अचानक त्या संबंधांत मिठाचा खडा पडल्यागत झाले. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली. भारतातही धार्मिक वैविध्य भरपूर आहे. लोकसंख्याही मोठी आहे. तरीही भारतीय संविधानानुसार राज्यशकट हाकले जात असल्यामुळे देशात शांतता, स्थैर्य आहे. ते असल्यामुळेच आहे. भारताचे अनुकरण करणे बांगलादेशला शक्य होते. ते त्याने केले तोपर्यंत त्याचा विकास झाला. आता तो पाकिस्तानचे अनुकरण करायला निघाला असेल तर त्याचा विनाश ठरलेला आहे. याचे कारण असे की, कोणत्याही धर्माचा अतिरेक हा आधुनिक काळात प्रगतीचे मार्ग अवरुद्ध करतो. त्यातही इस्लामी कट्टरपंथी हे तर अडथळ्यांसाठीच ओळखले जातात. भारतात पाकिस्तानात असोत की बांगलादेशात; इस्लामी कट्टरपंथीयांना देशाविषयी आपुलकी वाटत नाही. त्यामुळे शांततामय सहजीवनाच्या तत्त्वावर त्यांचा विश्वास नसतो.
 
 
Bangladesh : बांगलादेशात जे काही घडते आहे, त्यावरून असे वाटते की, तो देश पाकिस्तानच्या मार्गावर निघालेला आहे. तसे झाले तर तिथली परिस्थिती आणखी बिकट होईल. म्हणायला घटनात्मक सुधारणा आणि सर्वसमावेशक धोरणांच्या निर्मितीची जबाबदारी अंतरिम देण्यात आलेली आहे. मात्र, कट्टरपंथीयांचा दबाव कायम राहणार असेल तर अंतरिम सरकार फारसे काही करू शकेल, असे वाटत नाही. भारताने बांगलादेशच्या सरकारने अल्पसंख्यकांना संरक्षण देण्याचे आवाहन केलेले आहे. तरीही इस्कॉनसारख्या सेवाभावी संघटनेला दाबून टाकण्याचे प्रयत्न बांगलादेशात सुरूच आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांना, प्रचारकांना, समर्थकांना अटक करणे सुरू आहे. यातून शांतता कधीच होऊ शकत नाही. शांततेचा मार्ग सामंजस्यातून जातो आणि सामंजस्य केवळ मोकळ्या चर्चेतून प्राप्त केले जाऊ शकते. अजूनही वेळ गेलेली नाही. बांगलादेशातील अंतरिम सरकारने पुढाकार घेऊन सर्वांत आधी अल्पसंख्यकांवरील हल्ले, हिंदूंवरील अत्याचार, इस्कॉनची मुस्कटदाबी हे सारे प्रकार थांबविले पाहिजेत. सर्वसमावेशकतेचे धोरण बांगलादेशसाठी नवे नाही. ते स्थापनेपासून तेथे अस्तित्वात होतेच. मध्यंतरी देश कट्टरपंथीयांमुळे भरकटला आणि आता विनाशाच्या काठावर पोहोचला आहे. धार्मिक वेडाचाराच्या अंधारडोहात उडी मारून स्वतःला कायमचे संपवून घ्यायचे की धर्मांधतेला गाडून नव्या प्रगतीच्या क्षितिजांकडे झेप घ्यायची, हे बांगलादेशच्या अंतरिम सरकारला आणि तिथल्या बहुसंख्यक मुस्लिमांना ठरवायचे आहे. अल्पसंख्यकांना मारणे आणि धाकात ठेवणे यातच बांगलादेशीयांना पुरुषार्थ वाटत असेल तर अल्लाहदेखील त्यांचे करू शकत नाही, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. 
Powered By Sangraha 9.0