‘दूरसंचार’ देणार रोजगार, अदानी गपगार!

    दिनांक :08-Dec-2024
Total Views |
अर्थचक्र
- महेश देशपांडे
'Telecommunication' provides employment : महागाई, रिअल इस्टेट, रिझर्व्ह बँकेचे फतवे या नेहमीच्या विषयांपलीकडच्या काही बातम्या सरत्या आठवड्यामध्ये नजरेत भरल्या. त्यामुळे त्या दखलपात्र भासल्या. भारतीय मंडळी ग्रीसमध्ये सर्वाधिक मालमत्ता खरेदी करीत असल्याची माहिती अलिकडेच समोर आली. अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट नव्हे, तर अरामकोचा नफा जगात सर्वाधिक असल्याची वार्ताही भुवया उंचावून गेली. ‘मूडीज’ने अदानींचा मूड खराब लक्षवेधी बातमीही अशीच. दरम्यान, दूरसंचार क्षेत्रात एक लाख नवीन नोकर्‍या निर्माण होणार आहेत.
 
 
telecomunication
 
भारतात मालमत्तेचे दर गगनाला भिडत आहेत. देशातील टॉप पाच शहरांमध्ये घर घेण्याचा विचार केल्यास दर ऐकून चक्कर येऊ शकते; मात्र त्यानंतरही देशातील लोक केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही मोठ्या प्रमाणावर मालमत्ता खरेदी करीत आहेत. ‘मनी कंट्रोल’च्या सर्वाधिक भारतीय ग्रीसमध्ये मालमत्ता खरेदी करतात. या बाबतीत तुर्कस्तान दुसर्‍या स्थानावर आहे. या देशातही भारतीय लोक मालमत्तेत मोठी गुंतवणूक करीत आहेत. तुर्कस्तानमध्ये जवळपास ९९ टक्के लोक इस्लाम धर्म मानतात. तिसर्‍या क्रमांकावर कॅरेबियन देश आहेत, जिथे भारतीय मालमत्तांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करतात. याशिवाय माल्टा आणि स्पेनमध्येही भारतीय मोठ्या प्रमाणावर घरे खरेदी आहेत. इतर देशांमध्ये मालमत्ता खरेदी करताना गोल्डन व्हिसा हा भारतीयांचा पहिला विचार असतो. याशिवाय भारतीयांचे नेहमीच परदेशातही स्वतःचे घर असण्याला प्राधान्य असते. कोणत्याही देशाने घर खरेदी करण्याची संधी दिल्यास भारतीय तेथे गुंतवणूक करतात. ब्रिटन आणि सौदी अरेबियासारखे देश याची उत्तम उदाहरणे आहेत. सर्वसामान्य भारतीयांशिवाय बड्या स्टार्सनीही या देशांमध्ये घरे केली आहेत. ग्रीसने २०१३ मध्ये ‘गोल्डन व्हिसा प्रोग्राम’ सुरू केला. यानुसार रिअल इस्टेट, सरकारी रोखे किंवा इतर मंजूर साधनांमध्ये किमान २ कोटी २१ लाख ७५ हजार २५० रुपये गुंतवणूक करणार्‍या कोणत्याही परदेशी व्यक्तीला ग्रीक सरकार गोल्डन व्हिसा जारी करते. ग्रीसव्यतिरिक्त संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया, अमेरिका यासारखे देश छोट्या गुंतवणुकीवर व्हिसा देतात.
 
 
'Telecommunication' provides employment : आता अशीच एक खास बातमी. जगातील सर्वात जास्त नफा कमावणार्‍या कंपन्यांची चर्चा होते, तेव्हा आपल्या मनात अ‍ॅपल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या कंपन्यांचे नाव येते. त्यानंतर आपण विचार करतो की, ज्या देशाची अर्थव्यवस्था मोठी, जो देश सर्वात पॉवरफूल त्याच देशाची कंपनी सर्वात जास्त नफा कमावत असेल; परंतु असे नाही. अरेबियाची अरामको ही कंपनी जगात सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी आहे. तेल उत्पादन करणारी ही कंपनी सौदी अरब येथील धाहराण येथे स्थित आहे. या कंपनीने नफ्याच्या बाबतीत जगातील बड्या कंपन्यांनाही मागे टाकले आहे. अ‍ॅपल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यादेखील याबाबत या मुस्लिम देशातील कंपनीची बरोबरी करू शकत नाहीत. ‘प्रॉफीट स्टॅटिस्टक’च्या अहवालानुसार तेल ऊर्जा क्षेत्रात काम करणारी सौदी अरब सरकारच्या सौदी अरामको कंपनीने २०२३ मध्ये २४७.४३ अब्ज डॉलर नका कमावला आहे. या यादीत दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या अ‍ॅपल कंपनीने ११४.३ अब्ज डॉलर नफा कमावला आहे. तिसर्‍या क्रमांकावर बर्कशायर हॅथवे ही कंपनी आहे. या कंपनीने २०२३ मध्ये १००.३ अब्ज डॉलरचा नफा कमावला. या यादीत टेक कंपनी मायक्रोसॉफ्टचा क्रमांक चौथा आहे. मायक्रोसॉफ्टने २०२३ मध्ये ९५.०२ अब्ज डॉलर नफा कमावला आहे.
 
 
या यादीत पाचवा क्रमांक अल्फाबेट कंपनीचा आहे. गुगलची पॅरेंट कंपनी असलेल्या अल्फाबेटने २०२३ मध्ये ७८.७८ अब्ज युएस डॉलरचा नफा कमावला आहे. सौदी अरामको ही कंपनी सौदी अरब सरकारच्या मालकीची आहे. सौदीच्या अर्थव्यवस्थेचा ती कणा जाते. सौदी अरामकोचे संपूर्ण नाव सौदी अरेबियन ऑईल कंपनी असे आहे. ही जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादन आणि ऊर्जा कंपन्यांपैकी एक आहे. अरामको तेल गॅस उत्पादन, संशोधन आणि वितरणाशी संबंधित कामे करते. या कंपनीचे संचालन आणि व्यवस्थापन सौदी अरब सरकार करते. २०१९ मध्ये या कंपनीचा छोटा भाग सार्वजनिक केला आणि रियाद स्टॉक एक्सचेंजवर लिस्टिंग केले गेले. आजच्या तारखेला या रियाल स्टॉक एक्सचेंजमध्ये याच्या शेअरचा भाव सुमारे २७.५० सौदी अरेबियन रियाल इतका आहे.
 
 
'Telecommunication' provides employment : आता एक कटाक्ष अदानींच्या साम्राज्याकडे. भारतापासून अमेरिकेपर्यंत सर्वत्र गौतम अदानींसाठी वाईट बातम्या येत आहेत. आता न्यू यॉर्कमधून वाईट बातमी आली आहे. ‘मूडीज’ या रेटिंग एजन्सीने अदानींच्या कंपन्यांचे क्रेडिट रेटिंग स्थिर ते नकारात्मक केले. असे करण्यासाठी ‘मूडीज’ने समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि इतरांवर लाचखोरीच्या आरोपाचा दाखला दिला. ‘फिंच रेटिंग्ज’ने समूहाचे काही बाँड्स नकारात्मक श्रेणीत ठेवले आहेत. ‘मूडीज’ने ‘अदानी पोर्टस् अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड’, ‘अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड’चे दोन मर्यादित प्रतिबंधित गट, ‘अदानी ट्रान्समिशन स्टेप-वन लिमिटेड’, ट्रान्सपोर्टेशन रिस्ट्रिक्टेड ग्रुप १’ (एईएसएल आरजी १), ‘अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड’ आणि ‘अदानी इंटरनॅशनल कंटेनर’ या सातही कंपन्यांची श्रेणी घटवली आहे. ‘अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड’चे अध्यक्ष गौतम अदानी आणि अनेक वरिष्ठ व्यवस्थापन अधिकार्‍यांच्या विरोधात अमेरिकी अ‍ॅटर्नी ऑफिसच्या फौजदारी आरोपामुळे अदानी समूहाचा वित्तपुरवठा कमकुवत होऊ शकतो आणि त्याचा भांडवली खर्च शकतो, असे ‘मूडीज’ने म्हटले आहे. ‘मूडीज’च्या मते कायदेशीर कार्यवाही कोणत्याही नकारात्मक क्रेडिट प्रभावाशिवाय संपुष्टात आल्यास रेटिंगचा दृष्टिकोन स्थिर ठेवला जाऊ शकतो. बाजारातील वादळात अदानींनी २८८ अब्जाधीश गमावले. याव्यतिरिक्त ‘फिंच’ने ‘अदानी एनर्जी’ आणि ‘अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई’चे रेटिंग नकारात्मक वॉच लिस्टमध्ये ठेवले.
 
 
‘टीमलीज सर्व्हिसेस’चे मुख्य स्ट्रॅटेजी ऑफिसर सुब्बुराथिनम पी. यांच्या मते ब्रॉडबँड आणि ‘फाईव्ह जी’ नेटवर्कचा पुढील पाच वर्षांमध्ये वेगवान विस्तार होणार आहे. फायबर स्थापना, देखभाल आणि दुरुस्ती क्षेत्रात सुमारे एक लाख नवीन रोजगार निर्माण होतील. येत्या काळात भारताची दूरसंचार बाजारपेठ झपाट्याने वाढणार आहे. भारताची दूरसंचार बाजारपेठ २०२४ मध्ये ४८.६१ अब्ज डॉलरची असण्याचा अंदाज आहे. २०२९ पर्यंत ती ७६.१६ अब्ज वाढू शकते. दरवर्षी ती सुमारे ९.४० टक्के दराने वाढत आहे. २०२३ पर्यंत देशभरात सुमारे सात लाख किलोमीटर ऑप्टिकल फायबर केबल्स टाकण्यात आल्यामुळे डिजिटल पायाभूत सुविधांच्या विस्तारात या यंत्रणेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सुब्बुराथिनम सांगतात, भारतात ब्रॉडबँड आणि ‘फाईव्ह जी’ नेटवर्कच्या वेगवान विस्तारामुळे फायबर ऑप्टिक तंत्रज्ञांच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. या क्षेत्रातील रोजगाराची मागणीही वाढेल. भारतातील टेलिकॉम टॉवर्सच्या वाढीव फायबरायझेशनमुळे रोजगाराच्या अंदाजे एक लाख नवीन संधी निर्माण होऊ शकतात. सध्या भारतात ‘फोर जी’, ‘फाईव्ह जी’ आणि ब्रॉडबँड योजनांना समर्थन देण्यासाठी वेगाने वाढणार्‍या फायबर ऑप्टिक नेटवर्कचा विस्तार करण्यात पाच लाखांहून अधिक फायबर तंत्रज्ञ कार्यरत असल्याचा अंदाज आहे. नोकियाला ‘भारती एअरटेल’कडून ‘फाईव्ह जी’ विस्ताराचे प्रचंड मोठे कंत्राट मिळाले आहे. सुब्बुराथिनम म्हणाले की, ‘फाईव्ह जी’तंत्रज्ञान २०३० पर्यंत त्याच्या शिखरावर पोहोचेल. ते वेगवान इंटरनेट गती, कमी विलंब आणि चांगली कनेक्टिव्हिटी प्रदान करेल.
 
 
'Telecommunication' provides employment : टेलिकम्युनिकेशन, आयटी, बांधकाम आणि उत्पादन यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये फायबर तंत्रज्ञांची नियुक्ती केली जात आहे. तिथे हे व्यावसायिक विशेषत: शहरी आणि भागात नेटवर्क विस्तार आणि पायाभूत सुविधा सेट अपवर काम करीत आहेत. फायबर तंत्रज्ञांचा उलाढाल दर खूपच जास्त आहे. तो वार्षिक ३५-४० टक्क्यांपर्यंत पोहोचतो. यामागील कारणांमध्ये कामाच्या दीर्घ तासांमुळे येणारा थकवा, पगारवाढीचा अभाव आणि कंपन्यांमधील कर्मचार्‍यांचे ‘पोलिंग’ यांचा समावेश आहे. नजिकच्या काळात फायबर अभियंते, स्पिसर्स, फायबर टर्मिनेशन इक्विपमेंट टेक्निशियन, इन्स्टॉलेशन रिपेअर, फॉल्ट रिझोल्यूशन टीम्स, फायबर सेलसाईट इंजिनीअर्स आणि फील्ड टेक्निशियन यांच्या नोकर्‍या वाढतील. भारतात डिजिटल आणि टेलिकॉम पायाभूत सुविधांच्या विस्तारामुळे फायबर तंत्रज्ञांसाठी नोकरीच्या संधी वाढतील. तथापि, उच्च उलाढाल आणि पगारवाढीच्या समस्यांमुळे कर्मचार्‍यांना कायम ठेवणे हे आव्हान बनू शकते.
 
(लेखक आर्थिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)