संत विचारातील निष्काम कर्मयोग

08 Dec 2024 05:45:00
संत प्रबोधन
कोणतेही कर्म निष्काम भावनेने करावे. कर्म करताना ते सर्वशक्तिमान ईश्वराला साक्षी मानून करावे. त्या कर्माचा स्वतःकडे कर्तेपणाचा अभिमान घेतला नाही तर त्या कर्माची बाधा होत नाही. फळाची आशा न ठेवता कर्म करीत राहिले, तर दुःख होत नाही. कर्म करावे, त्यामागे मीपणाची भावना नसावी, असा Saint Tukaram संत तुकारामांचा निष्काम कर्मयोग आहे.
 
 
karmayog
 
ब्रह्मस्वरूपाची कर्मे ब्रह्मरूप |
विरहित संकल्पे होती जाती ॥
ठेविलिया दिसे रंगा ऐशी शिळा |
उपाधी निराळा स्फटिक मणि
नाना भाषामते आळविती बाळा |
प्रबोध तो मुळा जननीठायी ॥
तुका म्हणे माझे नमन जाणतीया |
लागतया पाया वेळोवेळा ॥ गा. १५१३)
Saint Tukaram : कर्मातीतपणा समजण्यासाठी फलाशारहित जो कर्माचरण करतो, परंतु मी हे कर्म केले, असे मानीत नाही. नदीकाठावर उभे राहून पाण्यातील स्वतःचे प्रतिबिंब तो पाहतो. परंतु, त्यापेक्षा मी निश्चितपणे वेगळा मानतो. त्याचप्रमाणे मी जे कर्म करीत आहे ते स्वतःकडे न घेता मी कर्मकर्ता नाही, असे तो समजतो. त्याला कर्मबोध झाल्याचे असे संत तुकाराम सांगतात. कर्मसंन्यास करण्यास त्यांनी सांगितला नाही तर कर्मफलसंन्यास सांगितला आहे. कर्म हे अटळ असून देहधारी जीवात्मा एक क्षणभरही कर्मावाचून राहू शकत नाही. म्हणून जाणत्या व्यक्तीने कधीही कर्मत्याग करू नये. कर्मबंधनातून मिळणारी मुक्ती हीच खरी मुक्ती होय. या मुक्ती प्राप्तीसाठी भगवंताचे भजन व स्मरण आवश्यक आहे, असा संत तुकारामांनी दिला आहे. त्यांचा निष्काम कर्मयोग सदासर्वदा आदर्शच आहे. त्याचप्रमाणे कर्म अटळ असल्यामुळे देहधारी जीवात्म्याने कर्मत्याग करणे उचित नाही.
 
 
 
नियतं कुरु कर्मत्व कर्म ज्यायो ह्यकर्मणः |
शरीर यावारऽपि च ते न प्रसिध्दयेद कर्मणः ॥
(गीता ३/८)
कर्तेपणाचा अभिमान सोडून कर्म करणे, हाच खरा निष्काम कर्मयोग होय. कर्मावाचून फळ या मनुष्यलोकामध्ये कोणीही नाही. म्हणून फक्त कर्मच तेवढे आपल्या हाती आहे.
वाचूनि देते घेते आणिक | निभ्रांत नाही सम्यक ॥
एथ कर्मची फळसूचक | मनुष्यलोकी ॥
(ज्ञाने. ४/७३)
चित्तशुद्धी होण्याकरिता साधकाने कर्ममार्गाचे पालन करणे आवश्यक आहे. त्याज्य कर्मांचा त्याग करून योग्य कर्माचे आचरण केले पाहिजे. जसे कर्म तसे फळ, सिद्धांतानुसार कर्माप्रमाणे फळ हे निश्चित मिळणारच. सर्व जमिनीवर पाऊस सारखाच पडतो. पण, बीजाप्रमाणे फळाची निर्मिती होत असते. त्यासाठी निष्काम बुद्धीने कर्माचरण हे सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून नियत कर्म करीत राहावे. योग्य ते फळ मिळणारच. फक्त त्याची आसक्ती नको.
कर्मण्येवाधिकारस्ते | मा फलेशु कदाचन ॥
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संड्.गोऽस्त्वकर्मणि ॥
(भ.गी.
सर्व योगांमध्ये कर्मयोग श्रेष्ठ आहे. कारण विहित मार्गाने आचऱण केल्यास निश्चितपणे फलप्राप्ती होते. सोबतच योग्य कर्माचरणाने भगवंताचीसुद्धा कृपादृष्टी प्राप्त होते. Saint Tukaram संत तुकारामांनी सांगितलेला निष्काम कर्मयोग हा सर्व काळात आदर्श आहे. त्यांनी दाखविलेला आदर्श आचरणाचा मार्ग मनुष्य जीवनाचे कल्याण साधणारा आहे. त्यांच्या मार्गाने गेल्यास कर्माची बाधा न लागता कर्मबंधनातून मनुष्य होतो. कर्मबंधनातून मुक्त झालेल्या व्यक्तीला परमेश्वरप्राप्ती होते. महिपतीबाबांनी तुकारामांच्या परोपकारी व निष्काम वृत्तीबद्दल लिहिलेले आहे -
तुयाची तो निष्काम वृत्ती | प्राप्त व्हावया रुक्मिणीपती ॥
परोपकारी वेचितसे शक्ती | कैशा रीती ते ऐका ॥
कोणी पांथस्थ वाटेवरी | अकस्मात गाठ पडली जरी ॥
त्याचे ओझे घेऊनी शिरी | विसावा त्यासी द्यावा ॥
पर्जन्य मार्गी लागता सबळ | पांथस्थ गावात पाहती स्थळ ॥
तयासिं दाखवी चावडी देऊळ | नातरी तत्काळ ने घरा ॥
पंथ क्रमीताची लवलाहे | यात्रेकर्‍यांचे सुजले पाय ॥
मग उष्ण पाणी करोनि पाहे | रगडीत देह निजांगे ॥
(महिपतीबाबा)
 
 
संतांचा परिश्रमाचा आदर्श
असाध्य ते साध्य | सायास ॥
कारण अभ्यास| तुका म्हणे ॥ (तु.गा. २९८)
Saint Tukaram : संत तुकारामांच्या या उक्तीनुसार परिश्रमाने कोणतीही गोष्ट साध्य करता येते. त्यासाठी परिश्रम करण्याची तयारी पाहिजे. ‘कर्म हीच पूजा’ या उक्तीप्रमाणे कर्माला ईश्वर मानून त्यामध्ये शोधा, अशी महत्त्वपूर्ण शिकवण संत तुकारामांनी समाजाला दिलेली आहे.
कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः |
लोकसंग्रहमेवापी संपश्यन ॥ (गीता ३/२०)
 भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी असे सांगितले आहे की, ज्ञानी पुरुषालासुद्धा लोकसंग्रहाकरिता कर्माची आवश्यकता असते. कारण याच कर्माच्या अधिष्ठानामुळे समाजामध्ये उचित कर्मे व परिश्रमाची मूल्य रुजतात व वाढीस लागतात. याच मूल्यांची आवश्यकता कोणत्याही काळातील समाजाला आहे. श्रमाची महती त्या समाजातील लोकांना कळली म्हणजे समाज योग्य मार्गाने आपली जीवनकर्मे असतो. हीच कर्मे पुढील असंख्य पिढ्यांना मार्गदर्शक ठरतात. संत ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे की, आंधळ्या मनुष्याला जशी डोळसाची मदत लागते. त्याप्रमाणे अज्ञानी माणसाला ज्ञानी माणसाने आचरण करून दाखवावे. समाजाला योग्य दिशा दाखवावी. समाजामध्ये श्रेष्ठ पुरुष जे कर्म करतात, ज्या गोष्टींचे आचरण करीत असतात, इतर सामान्य लोक त्यांचेच अनुकरण करीत असतात. ज्ञानी पुरुषांनी त्यांना सन्मार्ग दाखवावा. संतांनी त्यांची चित्तशुद्धी करावी.
एथ वडिल जे जे करीती | तया नामु धर्मु ठेविती ॥
तेचि येर अनुष्ठिती | सामान्य सकळ ॥
हे ऐसे असे स्वभावे | म्हणोनी कर्म न संडावे |
विशेषे आचरावे | लागे संती ॥ (ज्ञाने. ३/१५८-५९)
Saint Tukaram : कर्म करताना त्याचा कोणताही न वाटू देता, सत्कर्म तेवढे करावे. त्या कर्मातूनच आपले संचित निर्माण होत असते. सत्कर्मांना देव मानल्यास त्यातून ईश्वरभक्तीचे समाधान मिळू शकते. फक्त विहित कर्म करताना विचारांची शुद्धता आवश्यक आहे, असे संत तुकाराम सांगतात. जगातील सर्वश्रेष्ठ कामे परिश्रम व योग्य कर्मांनीच झालेली आहेत. सर्व कार्ये कर्मांनीच शक्य होतात. कर्म आपण शकत नाही. कर्मामुळे प्रत्येक मनुष्याची ओळख असते. कर्मच कोणालाही विश्वविजेतेपदावर बसवितात किंवा त्याला भिकारी बनवू शकतात. म्हणून कर्म हा ईश्वर आहे.
तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा |
वेगळा धर्मा अकर्मासी ॥ (तु. गा. ५५६)
‘कर्मे ईशू भजावा’ या उक्तीनुसार कर्मालाच ईश्वर मानून त्याची मनापासून उपासना करावी, असे संत सांगतात-
तैसा कर्तृत्वाचा मदु | आणि कर्मफळाचा आस्वादु ॥
या दोहींचे नाव बंधु | कर्माचा की ॥ (ज्ञाने. १८/२०५)
कर्म करताना कर्तृत्वाभिमान व कर्मफलाशेने मनुष्य कर्मफलाच्या बंधनात अडकतो. कारण कधी कधी तो कर्मकर्ता मीच कर्ता आहे, असे समजतो व त्या समजुतीमुळे कर्मबंधनात अडकतो अन्यथा तो मुक्तच आहे. संत तुकारामांनी सिद्धांत प्रस्तुतच्या अभंगातून व्यक्त केला आहे. -
मुक्त होत परी बळे झाला बद्ध |
घेऊनिया छंद माझे माझे ॥
पाप पुण्य अंगी घेतले जडून |
वर्म नेणे कोण करिता तो ॥
तुका म्हणे वाया गेले विण |
जैसा मृगशीण मृगजळीं ॥ (तु. गा. १५६२)
संत ज्ञानेश्वरांनीही कर्मबंधनाच्या त्या विचाराला पुष्टी दिलेली आहे.
देखे पुढीलांचे ओझे | जरी आपुला माथा घेईजे ॥
तरी सांगे कां न दाटीजे | धनुर्धरा ॥
तैसी शुभाशुभे कर्मे | जिये निपजती प्रकृतीधर्मे ॥
तिये मूर्ख मतिभ्रमें | मी कर्ता म्हणे ॥
(ज्ञाने.- ३/१७७-१७८)
 
 
जे स्वधर्मे निष्कामता | अनुसरले पार्था ॥
ते कैवल्यपद तत्त्वता | जगी ॥ (ज्ञाने.- ३/१५१)
Saint Tukaram : अशा प्रकारे निष्कामबुद्धीने स्वधर्म कर्माचे जो आचरण करतो, तो मोक्षपदास जातो, असे भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात. या सर्वांवरून असे लक्षात येते की, कर्मयोग हा सर्व योगांमध्ये सर्वश्रेष्ठ योगमार्ग आहे. या मार्गावरून जो मार्गक्रमण करीत राहतो, तो जीवनामध्ये सर्व प्रकारचे सुख-समाधान प्राप्त करतो. फक्त त्यासाठी त्याला आशा न ठेवता निष्कामपणे कर्म करणे आवश्यक आहे. संत तुकारामांनी सांगितलेल्या या श्रमप्रतिष्ठा मूल्यांची रुजवणूक समाजामध्ये झाल्यास, लोकांना कर्ममार्गाची जाण होऊन सहज किंवा फसव्या मार्गाने ते पैसा, सत्ता किंवा यश मिळविणार नाहीत. त्यामुळे कष्टमार्गाने समाजात सदाचार निर्माण होऊन श्रमास प्रतिष्ठा प्राप्त होईल.
 
- प्रा. डॉ. हरिदास आखरे
- ७५८८५६६४००
 
Powered By Sangraha 9.0