- प्रकरण दडपण्याचा प्रयत्न पोलिसांनी पाडला हाणून
यवतमाळ,
येथील जामनकरनगरातील विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, 15 फेब्रुवारी रोजी घडली. पतीसह नातेवाईकांनी कुठलीही वैद्यकीय तपासणी न करताच परस्पर अंत्यविधी उरकवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी डायल 112 वर तक्रार प्राप्त होताच अंत्ययात्रा थांबवून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला असून, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. Deepali Mishra दीपाली उर्फ नंदिनी मिश्रा (वय 26) असे मृत महिलेचे नाव आहे. मृत महिला पती व दोन लहान मुलांसह जामकरनगरात वास्तव्यास होती. गुरुवारी पहाटेच्या सुमारास महिलेचा झोपेतच आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना पुढे आली. ही बाब पतीने नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांना सांगितली. दीपालीच्या अचानक मृत्यूने परिसरातील सर्वच नागरिक अवाक झाले. अशा स्थितीत पतीसह कुटुंबियांनी दीपालीच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली. दीपालीचा मृत्यू संशयास्पद असल्याने दुपारच्या सुमारास अवधूतवाडी पोलिसांना डायल 112 वर तक्रार देण्यात आली.
दरम्यान Deepali Mishra दीपालीचा मृतदेह घरातून अंत्यसंस्कारासाठी नेत असतानाच अवधूतवाडी पोलिसांचे पथक घटनास्थळाकडे रवाना झाले. पोलिसांनी बाजोरियानगरमध्ये अंत्ययात्रा थांबवून घराकडे परत घेतली. त्यानंतर मृत महिलेच्या घराजवळ पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. मृतक महिलेच्या डोळ्यांसह गळ्यावर खुणा मृतक महिला व तिच्या पतीमध्ये बुधवारी रात्री वाद झाला होता, अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. पोलिसांनी पतीची कसून चौकशी सुरू केली. त्याने पत्नीला हृदयविकाराचा झटका आल्याचे, तर चिमुकल्या मुलांनी आई चक्कर येऊन पडल्याचे सांगितले.
महिलेच्या मानेला व दोन्ही डोळ्यांखाली खुणा आढळून आल्या. त्यामुळे घातपाताचा संशय पोलिसांना होता. उत्तरीय तपासणी अहवाल आला असून दिपालीचा गळा आवळून मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी महेश मिश्रा याला अटक केली असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. अवधूतवाडी पोलिस ठाणेदार ज्ञानोबा देवकते अधिक तपास करीत आहेत.