मराठमोळे संघ स्वयंसेवक ठरले अबू धाबीतील मंदिराचे ‘विश्वकर्मा’
- असंख्य आव्हाने झेलत साकारले भव्य वास्तूशिल्प
दिनांक :20-Feb-2024
Total Views |
सोनाली ठेंगडी
नागपूर,
Architect Bhalchandra Kulkarni : असे म्हणतात की, जेव्हा इतिहास घडणार असतो, तेव्हा प्रचंड उलथापालथ होते, असंख आव्हाने समोर उभी ठाकतात आणि क्षणोक्षणी कठीण कसोट्यांना पार करीत शेवटी काहीतरी भव्य दिव्य घडते. हे भव्य दिव्य घडणे म्हणजेच इतिहास असतो. असाच एक इतिहास अबू धाबी येथे पहिल्यांदाच भव्य मंदिराच्या रूपात घडला आणि विशेष म्हणजे, याच्या उभारणीचे विश्वकर्मा ठरले मराठमोळे वास्तूविशारद भालचंद्र कुळकर्णी.
या मंदिराच्या उद्घाटनाचा क्षण जसजसा जवळ येत होता, तसे त्याच्या घडवणुकीत गुंतलेल्या प्रत्येकाच्या काळजाचे ठोके वाढत होते. या मंदिराची उभारणी करणार्या दुबईतील कॅपिटल इंजिनीयरिंगचे भालचंद्र कुळकर्णी यांच्याशी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न होत होता. मात्र, अगदी उद्घाटनाच्या दिवसापर्यंत ते प्रचंड कामात गुंतले होते. Architect Bhalchandra Kulkarni त्यामुळे जेव्हा उद्घाटन पार पडले आणि जगभरासाठी हे मंदिर खुले झाले, तेव्हा कुळकर्णी आणि त्यांच्या टीमने मोकळा श्वास घेतला.
24 महिने दिवस आणि रात्रींचा हिशेबच नव्हता. सुमारे पाच लाख कामगारांचे हात सातत्याने एक भव्य दिव्य कलाकृती साकारण्याच्या प्रयत्नात गुंतले होते आणि ही कलाकृती ज्यांच्या संकल्पनेतून, वास्तूशिल्प ज्ञानातून आणि प्रचंड मोठ्या अनुभवातून घडली, ते वास्तूशिल्पकार भालचंद्र कुळकर्णी हे सलग चार वर्षांपासून यासाठी झटत होते.
मूळचे नाशिकचे असणारे भालचंद्र खंडेराव कुळकर्णी गेेल्या 17 वर्षांपासून दुबईत कार्यरत आहेत. त्यांनी अकोल्यातील शिवाजी इंजिनीयरिंग कॉलेजमधून आर्किटेक्चरची पदवी घेतली. ज्या कॅपिटल इंजिनीयरिंगकडे अबू धाबीच्या मंदिराचे ड्राईंग, डिझाईनिंग आणि एकूणच बांधकामाची जबाबदारी होती, तेथे ते 2006-07 पासून कार्यरत आहेत. Architect Bhalchandra Kulkarni भालचंद्र कुळकर्णी हे कॅपिटल इंजिनीयरिंगचे चीफ आर्किटेक्ट आहेत. शेकडो आर्किटेक्टचा स्टाफ त्यांच्या हाताखाली काम करतो आहे. एक मराठी माणूस दूर आखाती देशात एका मोठ्या आर्किटेक्चर फर्मचे यशस्वीपणे नेतृत्व करतो, ही प्रत्येकच मराठी माणसाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.
(क्रमश:)
(काय होती मंदिराच्या उभारणीतील आव्हाने...वाचा उद्याच्या अंकात)