...होता भाषाशुद्धीचा ध्यास

25 Feb 2024 06:00:00
- डॉ. सच्चिदानंद शेवडे
 
ज्येष्ठ अभ्यासक
 स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुण्यतिथी दिन आणि लगोलग साजरा होणारा मराठी भाषा गौरव दिन हे विचारमंथनाचे एक उत्तम औचित्य म्हणावे लागेल. आपल्या ओजस्वी आणि प्रभावी लेखणीने जनमन ढवळून काढणार्‍या, प्रतिभेच्या उत्तुंग आविष्काराने मनामनात देशभक्ती रुजवणार्‍या आणि शब्दांच्या आभेने साहित्यविश्वाचा एक कोपरा उजळून टाकणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे शब्दतेज नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. राष्ट्रप्रेमाबरोबरच त्यांच्या मातृभाषा प्रेमाचाही आपल्याला जवळून परिचय आहे. त्यांच्या उत्तमोत्तम रचना आजही आपल्या ओठांवर आहेत. मराठी भाषेच्या अस्मितेप्रती त्यांची तळमळ सर्वज्ञात आहे. त्यामुळे Bhasha Shuddhi  भाषाशुद्धी आणि सावरकर हा विषय चिंतनीय ठरतो.
 
 
Vinayak ji
 
सावरकरांनी मराठी भाषेला अनेक नव्या शब्दांची देणगी दिली. त्याचप्रमाणे जुनेच पण नव्याने व्यवहारात येऊ शकणारे काही प्रतिशब्दही दिले. रत्नागिरीच्या स्थानबद्धतेच्या काळात अस्पृश्योद्धाराच्या कार्यासोबतच सावरकरांनी भाषाशुद्धीची चळवळ जोमाने चालवली.
 
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी।
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी।
हे असे असंख्य खेळ पाहते मराठी।
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी।
असे सुरेश भट यांनी आपल्या काव्यात म्हटले आहे. आज याचीही आठवण झाल्याखेरीज राहात नाही.
नवे शब्द देताना सावरकरांना बरीच टीका सहन करावी लागली. काहींनी विकृत मराठी विडंबन शब्द सावरकरांच्या नावे खपवण्याचा उपद्व्यापही केला. उदा. रेल्वे सिग्नलला म्हणे सावरकरांनी ‘अग्निरथ गमनागमसूचक ताम्र हरित लोक पट्टिका’ हे नाव सुचवले. ही तद्दन थाप आहे. सावरकरांनी अतिशय समर्पक प्रतिशब्द सुचवले आहेत. 1938 मध्ये साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना सावरकरांनी Bhasha Shuddhi  भाषाशुद्धीबद्दल आग्रही मत मांडले. आज त्यांनीच रूढ केलेले दूरध्वनी, महापौर, दिनांक, संकलन, चित्रपट आदी शब्द आपण सर्रास उपयोगात आणतो. पण त्याचे निर्माते सावरकर आहेत हे कोणाच्या गावीही नसते. दरवर्षी साहित्य संमेलने होत असतात, पण कोणताही अध्यक्ष पूर्वाध्यक्षांचे स्मरण करताना सावरकरांचा नामोल्लेखही करत नाही! (क्वचित अपवाद वगळता)
 
 
आता सांगतो आहे ती हकिकत गणपतराव नलावडे यांच्याबद्दलची आहे. सावरकरांना मानणारे नलावडे पुणे शहराचे ‘मेयर’ झाले. ही वार्ता कळल्यावर दोन दिवसांनी त्यांच्याकडे सावरकरांकडून अभिनंदनाचे पत्र आले. त्यात म्हटले होते, ‘पत्र पाठविण्यास विलंब होत आहे त्याबद्दल क्षमस्व. पण ‘मेयर’ या शब्दाला प्रतिशब्द काय असावा याचा विचार करत होतो. आता तो शब्द मिळाला. ‘महापौर’ हा शब्द अधिक योग्य वाटतो.’ सदर पत्र मिळताच गणपतराव आपल्या कार्यालयाबाहेर धावले. त्यांनी शिपायाला ‘मेयर ऑफ पुणे’ची पाटी काढायला सांगितली आणि लगोलग ‘महापौर’ची पाटी तयार झाली. तेव्हापासून हा शब्द सहज रुळला.
 
 
आणखी एक कथा ‘हंस पिक्चर्स’च्या विनायकराव पेंढरकरांची! एकदा स्वा. सावरकर कोल्हापूरला आपल्या स्टुडिओमध्ये बसले होते. बोलता बोलता चित्रपटसृष्टीत नामावलीपासून इंग्रजी शब्द उपयोगात आणले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर विनायकरावांनी त्यांना प्रतिशब्द सुचवण्यास सांगितले. सावरकरांच्या तोंडातून लगेचच मूळ इंग्रजी शब्द आणि त्याला मराठी प्रतिशब्द बाहेर पडू लागले. विनायकरावांनी ते भराभर लिहून घेतले आणि पुढे उपयोगातही आणले. त्यामुळे स्टुडिओ, शूटिंग, सिनेहाऊस, फोटोग्राफर, डायरेक्टर, एडिटर, रेकॉर्डिस्ट आदी शब्दांना कलामंदिर, चित्रण, चित्रपटगृह, छायाचित्रण, दिग्दर्शक, संकलन, ध्वनिलेखक असे प्रतिशब्द रूढ झाले.
सावरकरांंना Bhasha Shuddhi भाषाशुद्धीची प्रेरणा शिवरायांच्या चरित्रामुळे मिळाली असावी. शिवरायांच्या काळी फारसी शब्दांचा उपयोग जास्त केला जात असे. याला उत्तर म्हणून राजांनी रघुनाथपंत हणमंते यांना आज्ञा करून राज्यव्यवहारकोश निर्मिला. त्या काळी या कोशाचे स्वागत झाले नव्हते. उलट, काहींनी रघुनाथपंतांवर टीकासुद्धा केली होती. पण त्यांना उद्देशून रघुनाथपंत म्हणतात...
 
किं अस्य अज्ञजनविडंबनै: र्विपश्चित समस्यास्य।
रोचते किं क्रमेलाकाय मधुरड्दली फलम्॥
(हे शब्द वापरताना अज्ञजनांकडून त्याचे विडंबन होईल तरी पर्वा नाही. कारण उंटाला केळे आवडणे शक्य आहे का?)
थोडक्यात सांगायचे, तर सावरकरांच्या Bhasha Shuddhi भाषाशुद्धीची टवाळी करणारे त्या काळीसुद्धा होते आणि आजही आहेत. आजच्या मराठी वृत्तपत्रांमधून, पुस्तकातून आणि मराठी वाहिन्यांवरील मालिकांमधून अकारण भरमसाट इंग्रजी शब्द वापरले जातातच. भाषेचा दुस्वास नसावा असे वरकरणी योग्य वाटणारे कारण यावेळी दिले जाते. अन्य भाषेतले शब्द आपल्या भाषेत आल्यामुळे भाषा अधिक समृद्ध होते, असेही म्हटले जाते. पण त्यामुळे मूळ अर्थाचे शब्द मरतात त्याचे काय? याची चिंता कोणालाच वाटत नाही.
 
 
सावरकरांच्या काळात पुस्तके छापण्यासाठी छापखान्यात अक्षरांचे टंक वापरले जात. संपूर्ण लिपीसाठी किमान दोनशे टंक लागत. हे लक्षात घेत सावरकर केवळ प्रतिशब्द देऊनच थांबले नाहीत, तर त्यांनी नवी लिपीसुद्धा निर्माण केली. या लिपीच्या वापरासाठी फक्त साठ टंकांची गरज भासू लागली. जसे की, अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ या स्वरांसाठी त्यांनी अन्य अक्षरांची योजना केली. पल्ला, पक्का यासारख्या जोडाक्षरांसाठी पल्ला, पक्का अशा अक्षरांची निर्मिती केली. साहजिकच टंक कमी लागून वेळ वाचू लागला. प्रतिकार केला, स्वीकार केला अशा शब्दांऐवजी एकेरी एकच क्रियापद ठेवून प्रतिकारले, स्वीकारले असे स्वतंत्र शब्द तयार केले. आज यातले अनेक शब्द आपण वापरतो. पण त्याचे जनकत्व सावरकरांकडे आहे, हे आपणास ठाऊक नसते.
मराठीवर उर्दू, पर्शियन आणि इंग्रजी भाषेचे प्रचंड आक्रमण झाले. मात्र आपली भाषा हा अमोलिक वारसा असतो. तो जपायला हवा याचे भान सावरकरांनी दिले. आज ब्राझिलसारखे लॅटिन अमेरिकेतील अनेक देश आपल्या भाषेच्या पुनरुज्जीवनासाठी झगडत आहेत. इस्रायलने तर हिब्रुला जणू कबरीतून वर काढले आणि आपली राष्ट्रभाषा बनवले. असे असताना आपल्याला मात्र मराठी भाषा मरू घातल्यावर जाग येणार काय, हा प्रश्न उरतो.
 
 
1925 च्या एप्रिल आणि मे महिन्यात सावरकरांनी ‘केसरी’मधून भाषाशुद्धीवर लेखमाला लिहिली होती. तिचे तीव्र पडसाद उमटले होते. लगेच त्यांनी विरोधकांच्या आक्षेपांना सणसणीत उत्तरे देणारी आणखी एक लेखमाला सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालखंडात लिहिली. त्यामुळे बर्‍याच जणांचा विरोध मावळू लागला. महाराष्ट्र साहित्य परिषदेने तर जळगावच्या अधिवेशनात Bhasha Shuddhi  भाषाशुद्धीचे तत्त्व मान्य केले. डॉ. माधवराव पटवर्धन अर्थात माधव ज्युलियन यांच्या काव्यामध्ये फारसी शब्दांची भरपूर उधळण असे. आरंभी ते भाषाशुद्धीचे टीकाकार होते. पण नंतर मात्र निस्सीम उपासक बनले. इतके, की त्यांनी आपल्या कविता शुद्ध मराठीत पुन्हा लिहून काढल्या. ते आणि प्रा. ना. सी. फडके यांच्याबद्दल एक किस्सा सांगितला जातो. महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रमावेळी केलेल्या भाषणात प्रा. फडके म्हणाले की, ‘साहित्य हा एक वृक्ष मानला तर त्यातील शब्द म्हणजे त्या वृक्षाला फुटलेली पालवी आहे.’ एकंदरीत, कोणत्याही भाषेतील शब्द चालतील असा त्यांचा सूर होता. त्याला उत्तर देताना माधव ज्युलियन म्हणाले, ‘उपमा अगदी योग्य पण वृक्षाला फुटणारी पालवी ही त्याच्याच अंत:प्रेरणेने निर्माण होते. आंब्याला आंब्याचीच आणि पेरूला पेरूचीच पाने येणार! एका झाडाची पाने दुसर्‍या झाडाला येणार नाहीत. तसेच भाषेचेही आहे. ज्या भाषेत साहित्य निर्माण होते, त्या त्या भाषेतील शब्दच शोभून दिसतील.’
 
 
अशा प्रकारे सावरकरांची Bhasha Shuddhi  भाषाशुद्धीची चळवळ हळूहळू लोकांच्या पचनी पडू लागली. पुढे तर ‘हिंदिस्थानी’ या नावाखाली धुमाकूळ घालणार्‍या उर्दूला बाजूला सारून घटना समितीने देवनागरी लिपीतील हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून मान्य केली. शुद्धतेच्या बाबतीत सावरकर हे केवळ मराठीपुरतेच आग्रही नव्हते. त्यांना हिंदीसह सर्व भारतीय भाषा शुद्ध रूपात हव्या होत्या, हे महत्त्वाचे.
Powered By Sangraha 9.0