सुमतीताईंचे जीवन विचार व संघटनेसाठी समर्पित

    दिनांक :25-Feb-2024
Total Views |
-नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
-बालजगतमध्ये कार्यकर्ता दिन

नागपूर, 
सुमतीताई सुकळीकर यांनी आपले विचार व संघटनेसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांचे कर्तृत्व, नेतृत्व कधीच विसरू शकत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. दीनदयाल शोध संस्थान, बालजगत व ताई सुकळीकर सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यकर्ता दिन आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे अध्यक्षस्थानी होते. Nitin Gadkari नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू योगानंद काळे व शालिनी खरे यांचा सत्कार करण्यात आला.
 
 
Nitin ji
 
Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले की, सुमतीताईंचे संपूर्ण जीवन सर्वांनाच परिचित आहे. ताईंनी प्रवाहाच्या विरोधात मान्यता नसताना, प्रतिष्ठा नसताना संघ व भारतीय जनसंघाचा विचार घेऊन अतिशय संघर्षातून सामाजिक व राजकीय कार्य केले. या कामात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ताईंचा स्वभावच मूळ संघर्षशिल होता. 
 
 
ताईंना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. ताईंना जनता व कार्यकर्ते न्याय देऊ शकले नाहीत. याचे नेहमीच वैषम्य वाटते. आज शहराच्या कुठल्याही कोपर्‍यात गेले की 5-6 हजार कार्यकर्ते गोळा होतात. पण, त्यावेळी अशी स्थिती नव्हती. लोक दगडं मारायचे. ताईंचे सगळे जीवन संघर्षातच गेले. अतिशय प्रतिकुल काळात त्यांनी विचारधारा व संघटनेसाठी त्याग केला. कौटुंबिक, सामाजिक व राजकीय जीवनात त्यांना बरीच किंमत चुकवावी लागली. पण, त्यांना याचे कधीच वैषम्य वाटले नाही. जे करतेय ते देश व समाजासाठी करतेय, अशी त्यांची भावना होती.
 
 
एक आठवण सांगून डॉ. विलास डांगरे म्हणाले की, सुमतीताईंच्या अंतःकरणात गोरगरिबांप्रति, समाजाप्रति, राष्ट्राप्रति, मानवतेप्रति विशाल उंचीचा, शुद्ध भाव होता. लोकांनी त्यांना जे प्रेम दिले ते भारतरत्नापेक्षाही मोठे आहे. ताईंच्या निःस्वार्थी आयुष्यात ‘मला काही मिळावे’ असा भाव ताईंच्या अंतःकरणात कधीच नव्हता.
 
 
सुमतीताईंच्या कन्या व कुटुंब न्यायालयाच्या निवृत्त न्या. मीरा खडक्कार यांनी प्रास्ताविक तसेच शालिनी खरे यांचा परिचय करून दिला. योगानंद काळे यांचा परिचय विवेक तरासे यांनी करून दिला. महेश जोशी यांनी गीत सादर केले. मैत्रेयी लोहित हिच्या पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला. संचालन सोनल लोहित, आभार प्रदर्शन प्रशांत देशपांडे यांनी केले. प्रभाकरराव मुंडले, सुधाताई सोहनी, डॉ. उदय बोधनकर, ज्येष्ठ विधिज्ञ आनंद परचुरे, विनय देशपांडे, संजय बंगाले, दिलीप दिवे, प्रमोद तभाने, नरकेसरी प्रकाशन लि.चे प्रबंध संचालक धनंयज बापट आदींसह अनेक महिला-पुरुष कार्यक्रमाला उपस्थित होते.