गडचिरोली,
Vice-Chancellor Dr. kawale : विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी परिसंवाद हे दिशादर्शक असतात, असे मत गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी व्यक्त केले.
शासकीय विज्ञान महाविद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या विदर्भ युनिव्हर्सिटी विद्यार्थी परिसंवाद स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पोस्टर प्रेजेंटेशन व सेमिनार प्रेजेंटेशन स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, प्राचार्य डॉ. प्रशांत जाखी, विदर्भ युनिव्हर्सिटी फिजिक्स टीचर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. किशोर रेवतकर तसेच सचिव डॉ. जितेंद्र रामटेके, कोषाध्यक्ष डॉ. देवेंद्र नंदनवार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रा. डॉ. सुभाष कोंडावर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंडवाना विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभाग, विदर्भ युनिव्हर्सिटी फिजिक्स टीचर असोसिएशन व शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली यांच्या वतीने या दोन दिवसीय विद्यार्थी परिसंवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे म्हणाले, भौतिकशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेली ही स्पर्धा विद्यापीठाद्वारे प्रथमच घेण्यात आली. ही बाब फारच कौतुकास्पद असून निश्चितच यामधुन विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना मिळणार असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविक भौतिकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्रा. डॉ. नंदकिशोर मेश्राम यांनी केले. संचालन सहाय्यक प्रा. डॉ. अपर्णा भाके यांनी तर आभार सहाय्यक प्रा. विकास पुनसे यांनी मानले. याप्रसंगी डॉ. मोहरकर, गणित विभागाचे प्रा. डॉ. सुनील बागडे, प्रा. डॉ. प्रितेश जाधव यासह विद्यार्थी उपस्थित होते. दोन दिवसीय परिसंवादादरम्यान विद्यार्थ्यांना डॉ. सुधीर टिपले यांनी टेलिस्कोपद्वारे चंद्र व ग्रह यांचे निरीक्षण करवून मार्गदर्शनही केले. स्पर्धेमध्ये विदर्भातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तसेच गोंडवाना विद्यापीठातील 28 महाविद्यालयातील 140 विद्यार्थी सहभागी झाले होते. यशस्वीतेसाठी भौतिकशास्त्राच्या सहाय्यक प्राध्यापकांनी सहकार्य केले.