1 ते 3 मार्च रोजी ताडोबा महोत्सवाचे आयोजन

डॉ. जितेंद्र रामगावकर व विनय गौडा यांची माहिती

    दिनांक :28-Feb-2024
Total Views |
उद्घाटनाला रवीना टंडन येणार
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर, 
Organized Tadoba Festival महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय व्याघ्र प्रकल्प आणि 90 पेक्षा जास्त वाघांचे निवासस्थान असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातर्फे वन्यजीव संरक्षण, शाश्‍वत पर्यटन आणि स्थानिक वारसा यांना चालना देण्यासाठी तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य वनसंरक्षक तथा ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर तसेच जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी येथे दिली. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी मुंबई येथे ताडोबा महोत्सव-2024 ची घोषणा केली होती. दोनशेहून अधिक वाघांचा अधिवास असलेल्या चंद्रपूरमधील चांदा क्लब मैदान आणि आगरझरी येथे 1 ते 3 मार्च या कालावधीत या भव्य महोत्सवाचे आयोजन होणार आहे.
 

tadoba 
 
वन्यजीव सद्भावना दूत आणि चित्रपट अभिनेत्री रवीना टंडन या उद्घाटन समारंभाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तीन दिवस चालणार्‍या या महोत्सवात वन्यजीव संवर्धनावर चर्चासत्र, स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा, छायाचित्रांचे प्रदर्शन, कवीसंमेलन आणि जागतिक कीर्तीच्या कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
या महोत्सवाला अनेक परदेशी पाहुणे येणार आहेत. त्यामध्ये विविध देशांच्या वाणिज्य दूतावासातील वरिष्ठ अधिकार्‍यांचा समावेश आहे. जगभरातील ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धकही ताडोबा महोत्सवाला भेट देऊन ‘वाघ वाचवा’ हा संदेश देणार आहेत.
 
पहिल्या दिवशी श्रेया घोषाल संगीतसंध्या
पहिल्या दिवशी विविध सत्रे आणि प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहेत. सुरुवातीस ग्राम परिस्थितिकी विकास समितीचे सदस्य, सरपंच आणि उपसरपंच यांची मानव-प्राणी संघर्ष कमी करण्याबाबत चर्चा आणि निसर्ग प्रश्‍नमंजुषा होणार आहे. तर संध्याकाळी भव्य उद्घाटन सोहळ्यात पारंपारिक नृत्य, स्वागतपर भाषणे, लघुपट आणि श्रेया घोषाल यांची संगीतसंध्या सादर होणार आहे.
 
दुसर्‍या दिवशी कुमार विश्‍वास यांचे कवी संमेलन
दुसर्‍या दिवशी फोटोग्राफी वर्कशॉप, संवर्धन दौड, चर्चासत्र, वनभवन व ताडोबा भवनाचे भूमीपूजन, विश्‍वविक्रमाचा प्रयत्न याबरोबरच कुमार विश्‍वास यांचे कवी संमेलन व रिकी केज यांची संगीतसंध्या होणार आहे.
 
तर तिसर्‍या दिवशी हेमा मालीनी यांचा नृत्याविष्कार
ट्रेझर हंट, सायक्लोथॉन, चित्रकला स्पर्धा, सीएसआर परिषद, प्रश्‍नमंजूषा इत्यादी कार्यक्रम होणार असून, संध्याकाळी समारोपाच्या सत्रात विविध पुरस्कारांचे वितरण व ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांचा गंगा बॅलेट नृत्याविष्कार पहायला मिळणार आहे.
 
महाराष्ट्र वनभुषण म्हणून चैतराम पवार पुरस्कृत होणार
या महोत्सवात चैतराम पवार यांना पहिला महाराष्ट्र वनभुषण पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप 20 लाख रूपये, सन्मान व मानचिन्ह असे आहे.